Tuesday, June 24, 2025

इंद्रायणी काठी एप्रिल ०७, २०२४

 बहुत काय लिहिणे? 

इंद्रायणी काठी या कार्यक्रमाबद्दल (खरे तर उपक्रमाबद्दल) थोडे बोलायचे आहे. मी स्वतः या वारीचा वारकरी असल्याने, अर्थातच 'आतला' असल्याने,  बाहेरून तटस्थपणे काही लिहू शकेन की नाही अशी शंका होती. पण, एकूण कार्यक्रम आणि मिळालेला प्रतिसाद बघता, आतले आणि बाहेरचे असे काही उरलंच नव्हतं. सर्व प्रेक्षक हे आतले आणि आपलेच झाले होते. सर्वांचीच अवस्था - ब्रम्हानंदी लागे टाळी - अशी झाली होती. म्हणून, आपली आपण करी स्तुती, तो येक मूर्ख - ही समर्थांनी केलेली संभावना स्वीकारून, पुढे जातो. 

'सर्व सुखांचे आगरु' असलेला बाप रखुमादेवीवरु. पांडुरंग विठ्ठल. अवघ्या महाराष्ट्राचं दैवत. आणि त्याचे रूप तरी कसे? समोर की पाठीमोरा नकळे - म्हणजेच, सगुण निर्गुणाच्या सीमेवर असलेले. विठ्ठल, रखुमाई, पंढरपूर, चंद्रभागा आणि पंढरीची वारी - हे शब्द ऐकल्यावर मराठी मन उचंबळून येणारच. इथे तुम्ही आस्तिक आहात की नास्तिक (की, माझ्यासारखे कुंपणावर बसलेले) हा प्रश्न नाही. आणि त्याचे दर्शन तरी काय वर्णावे? दर्पणी पहाता रूप न दिसे वो आपुले - म्हणजे मीपण, अहंकार पूर्णपणे नाहीसे करणारे. 

अशा या  सावळ्या विठोबाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारीची ही कथा आहे. काय नाही या वारीमध्ये? विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागलेली वारकरी मंडळी, त्यांचा भक्तिभाव, त्यांनी सांगितलेल्या कथा.. त्या अनुषंगाने येणाऱ्या ओव्या, अभंग, भजन, कीर्तन, रिंगण... आणि बरेच काही. 

गीतांची निवड अतिशय चोखंदळपणे केलेली होती. सावळ्या विठ्ठलाचे वर्णन, कानडवो विठ्ठलू कर्नाटकू असेही केलेले आहे. हे जणूकाही अधोरेखित करण्यासाठी, वृन्दावनी वेणू हे कानडी ढंगाने म्हटलेले मराठी गीत, किंवा नामदेव महाराज कीर्तन करताना प्रत्यक्ष पांडुरंग तिथे नाचत असतो, हे दर्शवणारे नर्तन कीर्तन घ्या. पंढरपूरला विठ्ठल आणि रखुमाईची मंदिरे वेगवेगळी आहेत. यामागचं कारण सांगणारे, 'रखुमाई रुसली' हे गीत घ्या. 

पण मला वाटतं, या कार्यक्रमाचा हायलाईट म्हणजे, ज्ञानेश्वर-मुक्ताईचा प्रसंग. काय सांगू? संन्याशाची मुलं म्हणून समाजाने वाळीत टाकलेली ही मुलं. खरं तर, उजेडी राहिले उजेड होऊन - असंच ज्यांच्याबद्दल म्हणता येईल अशी - निवृत्ती सोपान मुक्ताबाई, आणि अर्थातच ज्ञानेश्वर. एके दिवशी समाजाने केलेली अवहेलना सहन न होऊन, ज्ञानोबा आपल्या कुटीत दार बंद करून बसतात. त्यांची ही अवस्था पाहून, मुक्ताई त्यांना चार शहाणपणाचे शब्द सांगते. विश्व रागे झाले वन्ही, संत मुखे व्हावे पाणी - तेव्हा, ज्ञानोबा, आपल्या मनाची ताटी उघडा. शेवटी, ज्ञानदेवांचीच धाकटी बहीण ती. हा सर्व प्रसंग इतका उत्कृष्ट झाला होता, की डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणारच नाही. 

संतांनी फक्त भक्तिमार्ग दाखवला असं नाही, तर समाज प्रबोधन देखील केले, हे दर्शवणाऱ्या दोन रचना - एक म्हणजे राम जोशी यांचा फटका, आणि अंधश्रद्धेचं गारुड दूर करणारं नाथांचं भारूड. या दोन्ही रचना उत्तम जमल्या होत्या. 

आणि सरतेशेवटी पसायदान. त्याबद्दल काय बोलावे? ज्ञानेश्वरांनी स्वतः साठी काहीही मागितलेले नाही. हे विश्वची माझे घर - ऐशी थोर मती असलेला, किंबहुना चराचर आपण जाहलेला संत पुरुष - त्याने जे मागितले ते सर्व विश्वासाठी. दुरितांचे तिमिर जावो ... ही रचना इथे नृत्यासह सादर केली गेली. 

एकूणच आज सादर झालेली सर्वच नृत्ये अप्रतिम होती. त्याबद्दल नृत्य दिग्दर्शिकांना फुल मार्क्स. सोनार कितीही कसबी असला, तरी सोन्याचा देखील स्वतः चा असा एक गुण असतोच. त्याचप्रमाणे, ही नृत्ये रंगमंचावर सादर करणारे सर्व कलाकार देखील तितकेच शंभर नंबरी, आणि कौतुकास पात्र आहेत. 

त्याचबरोबर, नेपथ्य, प्रकाश योजना आणि इतर तांत्रिक बाजू उल्लेखनीय आणि निर्दोष होत्या. 

संपूर्ण कार्यक्रम हा कसा होता? तर, चंद्रमे जे अलांछन - एक देखील डाग नसलेला. 

बहुत सुकृतांची जोडी असावी, म्हणूनच ह्या ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीत सामील होण्याचे भाग्य मला लाभले. 

सर्व कलाकार, दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक आणि ज्या ज्या लोकांचा इथे सहभाग होता त्या सर्वांचे, आणि बे एरिया महाराष्ट्र मंडळाचे  - इथे आभार हा शब्द योग्य ठरणार नाही, थिटा पडेल - म्हणून मन:पूर्वक अभिनंदन करतो, आणि  थांबतो. 

हरी विठ्ठल. 

 - नरेंद्र जोशी


अमेरिका देशी । सिलिकॉन व्हॅली ।  

तेथे मांदियाळी । वैष्णवांची ।।


भक्तांचिये मनी । भक्ती ये दाटूनी ।

पाहूया करुनी । दिंडी वारी ।।


गाणी गाऊनीया । करूया नर्तन ।

कीर्तन भजन । म्हणती सारे ।।


कंबर कसूनी । गोळा होती सारे ।

योजिती सत्वरे । डिटेल वारी ।।


दिंडीची ही कथा । लिहून काढिली ।

पात्रे योजियेली । चतुरपणे ।।


आणि मग त्यात । घातले गायन ।

 नाम संकीर्तन । माऊलीचे ।।


अभन्ग नि ओव्या । भजन कीर्तन

आणिक रिंगण । साजिरेची ।।


नृत्ये आणि गाणी । अचूक वेचली ।

कसून घेतली । कष्टाने ही ।।


नेपथ्य सुंदर । त्यावरी प्रकाश ।

होतसे आभास । पंढरीचा ।।


नट नर्तिकांनी । आणि गायकांनी ।

वारी सजवली । प्रेमभरी ।।


सकळ जनांचा । लागे हातभार ।

सान आणि थोर । कोणी नसे ।।


इंद्रायणी काठी । दिंडी ही पोचली ।

टाळी ही लागली । ब्रम्हानंदी ।।


- नरेंद्र जोशी

No comments:

Post a Comment