Tuesday, March 23, 2021

आज अचानक

निसटून जाई संधीचा क्षण
सदा असा संकोच नडे..

संकोच... कसं विचारू? काय विचारू? कोणाला काय वाटेल? या सगळ्या प्रश्नांचा अर्थ एकच... संकोच. हा संकोच आपल्याला जिथे तिथे.. खरं म्हणजे नको तिथे नडतो. संकोच आणि संधी - कधीच जमणार नाही. संधी फार क्वचित येते. आणि संकोचापोटी तीही आपण दवडून बसतो. आणि तो संधीचा क्षण तरी कसा?

नयन वळविता सहज कुठे तरी
एकाएकी तूच पुढे

ध्यानीमनी नसताना, सहज, बेसबब,  नजर फिरवली, तर तूच समोर.. तीच तीच तू. तशीच. दुरावा निर्माण होण्यापूर्वीची.. जशी लक्षात होतीस तशीच.
अन् तुला बघून मनाची अवस्था तरी काय होते..

दचकून जागत जीव निजेतच
क्षणभर अंतरपट उघडे

वीज चमकून गेल्यावर निद्रिस्त मन जणू दचकून जागे होते आणि.. आणि.. गत जीवनातल्या आठवणींचा पटच जणू काही उलगडू लागतो.
कुठे, कधी भेटलो? काय बोललो? कोणत्या आणाभाका दिल्या, घेतल्या? सगळ्या क्षण चित्रांची मालिकाच जशी मनचक्षूंसमोर तरळून जाते.
आणि मग... तू खूण करतेस. तुझी खूण म्हणजे... एक गूढच. तेव्हाही, आणि आताही. कळणे आणि न कळणे यांच्या सीमारेषेवरची खूण.. तेव्हा नाही कळली.. आणि आता.. आता.
गूढ खूण तव कळून ना कळून
भांबावून मागे मुरडे

कवी अनिल यांच्या लेखणीतून उतरलेले हे काव्य. कुमार जींसारख्या तितक्याच संवेदनशील कलाकाराने दिलेली आणि गायलेली चाल. गाण्यात, पाठीमागे सतत ऐकू येत राहतात ते गुंजन करणारे दोन तानपुरे. गाण्यातला प्रत्येक सुर त्या गुंजनातून ऐकू येतो.
... आज अचानक गाठ पडे ..

No comments:

Post a Comment