Sunday, April 10, 2022

मी.. वसंतराव

 मी वसंतराव (मला उमजलेले)... वसंतराव देशपांडे हे एक वादळी आणि गुंतागुंतीचे व्यक्तिमत्व होते.व्यक्तिगत आयुष्यामध्ये गृहस्थाश्रमाचे सर्व संकेत काटेकोरपणे पाळणारे वसंतराव गायनामध्ये मात्र सगळे रूढ संकेत झुगारून देऊन, मनाला पटेल तसे गाणारे, कमालीचे स्वच्छंदी गायक होते. कोणत्याही घराण्याचा टिळा कपाळी न लावता, जिथे जिथे चांगले गाणे दिसेल तिथून ते वेचून, आत्मसात करून, 'माझे घराणे माझ्यापासून सुरु होणार आहे' असे ठणकावून सांगणारे, आचार्य अत्र्यांच्या भाषेत 'स्वरभोगी' गायक होते. एव्हढ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वावर चित्रपट काढणे हे अतिशय कर्मकठीण काम. पण राहुलने हे आव्हान स्वीकारले आणि पेलले देखील. इथे, राहुलला एकवचनी संबोधन करतो, ते केवळ आपुलकीच्या हक्काने. एरवी, आदरार्थीच बोलायचे ठरले, तर मग त्याला अनेक अनेकवचने लावावी लागतील.  

वसंतरावांच्या आयुष्यातले नाट्य सुरु होते तेच मुळी त्यांच्या जन्मापासून. त्यांची आई चांगल्यापैकी गाणारी होती. वसंतरावांचा जन्म होण्याच्या वेळी ती अभिमन्यूच्या धावा म्हणत असते. अभिमन्यूला चक्रव्यूहाचे ज्ञान जन्मापूर्वीच प्राप्त झाले होते, याचा इथे संदर्भ द्यायचा प्रयत्न असावा. पुढे कौटुंबिक कलहामुळे लहानग्या वसंताला घेऊन त्यांची आई घर सोडून नागपूरला निघून जाते. पुढे केवळ योगायोगानेच वसंताला त्याचे पहिले गुरु, सप्रे गुरुजी भेटतात. नंतर त्यांची गाठ दीनानाथ राव मंगेशकरांशी पडते. आणि मग ते दीनानाथांना आपले गुरु मानतात. दीनानाथ राव हे कितीतरी मोठे गवई होते, तरीही त्यांच्यावर नाटकवाला हाच शिक्का बसलेला. त्यांना शास्त्रीय गायन ऐकवायची खूप इच्छा होती, पण रसिकांना त्यांच्याकडून फक्त नाट्य संगीतच ऐकायचे होते. ही खंत ते वसंतरावांना बोलून दाखवतात. पुढे काही प्रमाणात वसंतरावांनाच्या बाबतीतही तेच घडते. हा सर्व भाग खूप सुरेख घेतलेला आहे. 

नंतर वसंतराव मामांबरोबर लाहोरला जातात. तिथे त्यांना उस्ताद असद अली खान साहेब यांची तालीम मिळते. सहा महिने फक्त मारवा शिकवल्यानंतर या तालमीत खंड पडतो. पण खऱ्या अर्थाने वसंतरावांची हीच खरी तालीम ठरली. तसे पाहिले तर, कुठले नागपूरचे वसंतराव आणि कुठले लाहोरचे असद अली साहेब... यथा  काष्ठम च काष्ठम च.. 

 पुढे मग नागपूर मार्गे पुणे - सरकारी नोकरी - लग्न आणि संसार. या प्रवासात वसंतरावांचे गाणे थोडेसे मागे पडते. वाटेत त्यांची भाई (पु ल देशपांडे) यांच्याशी गाठ पडते. गायक वसंतराव आणि पेटीवाले भाई हा जणू समसमा संयोगच. मग पुढे वसंतरावांची नेफा इथे बदली होते. केवळ संसार चालवायचा म्हणून वसंतराव नाईलाजाने तिकडे जातात. मग तिकडे त्यांची अधिकच कुचंबणा होते. शेवटी वसंतराव नोकरी सोडून देतात, आणि  'आता तंबोरा आणि मी' असा निश्चय करतात. अर्थात ही वाट सोपी नसतेच. नुसते गायन करून पोट भरणे कठीण. त्यातून, वसंतरावांची स्वच्छंद, कोणत्याही चौकटीत न राहणारी  गायकी श्रोत्यांना अजिबात आवडत नाही. मग पुढे सुरु होते ती अपरिहार्य ओढगस्ती, हलाखी, मानहानी.. 

प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एक तरी असा क्षण येतोच, की त्यामुळे त्याचे सगळे जीवनच बदलून जाते. वसंतरावांनाही असेच एक नवीन नाटक मिळते. 'कट्यार काळजात घुसली' या पुढे इतिहास घडवणाऱ्या नाटकाची ही जन्मकहाणी आहे. तिथेही वसंतरावांचे लेखक दारव्हेकरांबरोबर मतभेद होतातच. पण शेवटी दारव्हेकर-देशपांडे वाद मिटतो, आणि हे नाटक रंगमंचावर येते. कट्यार नाटकाचे कथानक (खांसाहेबांच्या वेगळ्या धर्तीच्या गायकीपेक्षा, लोकांना पंडितजींची पारंपरिक गायकीच जास्त पसंत असणे, आणि त्यापायी खांसाहेबांची उपेक्षा होणे) हे वसंतरावांना आपल्या स्वतःच्या जीवनाशी समांतर वाटावे यात काहीच नवल नाही. 

आता या एव्हढ्या नाट्यमयतेने भरलेल्या त्यांच्या आयुष्यातले, चित्रपटात काय काय घ्यायचे आणि काय नाही, हे ठरवणे हेच मुळी जिकिरीचे काम. त्यामुळे अनेक गोष्टी राहून गेल्या आहेत असे वाटते. वसंतरावांचे अनेक गुरु होते, जसे सुरेशबाबू माने, अमान अली खान साहेब. त्यांचा उल्लेख नाही. वसंतराव आणि वझेबुवा यांचाही असाच एक किस्सा आहे. तीच गोष्ट बेगम अख्तर यांची. वसंतरावांची आणि बेगम साहेबांची गाठ नागपूरला ताजुद्दीन अवलियांच्या उरुसात पडली होती. पुढे या दोघांची मैत्री पुष्कळ वर्षे चालली. अनेक भेटी गाठी, पत्र व्यवहार झाला. याचा फक्त ओझरता उल्लेख आहे. 

वसंतराव हे नाट्यसंगीताची पाळे मुळे माहित असलेले अभ्यासू व्यक्तिमत्व (आठवा - शाकुंतल ते मानापमान). याचा इथे कुठेच उल्लेख नाही. तसेच ते नुसतेच वसंतराव नसून डॉ. वसंतराव देशपांडे होते. या 'डॉ'. चाही उल्लेख नाही. तसेच, फक्त कट्यार या एकाच नाटकाचा उल्लेख आहे. त्यांनी काम केलेल्या 'हे बंध रेशमाचे', 'वीज म्हणाली धरतीला', 'संशय कललोळ', 'मेघ मल्हार' यांचा उल्लेख नाही. 

असो. या सर्व त्रुटी असल्या तरीही, जमेची बाजू देखील पुष्कळ मोठी आहे. संगीत तर या चित्रपटाचा आत्माच. चित्रपटात, पूर्व प्रसिद्ध गाण्यांव्यतिरिक नवीन गाणी देखील आहेत. त्यापैकी, 'ललना ना भेटली' हे भावगीत उल्लेखनीय आहे. त्याकाळात जी आणि जशी भावगीते म्हटली जायची, त्यांच्याशी हे सुसंगतच आहे. चित्रपटाचे जणू थीम सॉंग असलेली लोरी (राम राम जप करी सदा) छान जमलेली आहे. शेवटचे समेवर येणारे 'कैवल्यगान' उत्तमच. नाट्यगीतांपैकी दीनानाथ रावांची गीते, आणि  'मालिनी कण वाही' सुरेख. वसंतरावांची हलाखीची परिस्थिती अधोरिखित करण्यासाठी, मृच्छकटिक नाटकातल्या चारुदत्ताच्या तोंडी असलेले 'जन सारे मजला म्हणतील की .. दारिद्र्याने बहुतची छळिले...' हे नाट्यगीत चपखल बसवले आहे. 

आता शास्त्रीय संगीताबद्दल बोलूया. 

वसंतराव म्हणजे मारवा, आणि मारवा म्हणजे वसंतराव. वसंतरावांबद्दल बोलायचे म्हणजे त्यांच्या मारवाचा उल्लेख करणे अपरिहार्यच आहे. चित्रपटातही एक मारवा बंदीश आहेच. असद अली साहेब मारवा शिकवतात ती बंदिश. वसंतरावांची नेहमीची 'ये मदमाती चली चमकत दामिनीसी मनभावन' ही इथे असेल असा माझा अंदाज होता. पण इथे 'काहु की रीत कोऊ करे सखी री' ही दुसरी एक बंदिश घेतली आहे (रशीद खान). दुसरी उल्लेखनीय बंदिश म्हणजे 'सनद पिया' यांची परज रागातली बंदिश 'पवन चलत आली की हो चंद्रिकेत'. इथे ती चपखल बसली आहे. मी मूळ वसंतरावांनी गायलेली ही बंदीश ऐकलेली आहे. तुलना करायचा हेतू नाही, पण राहुलने ती अतिशय तन्मयतेने म्हटली आहे. 


सर्व कलाकारांनी आपापली कामे चोख केली आहेत. सर्व नवीन गाणी छान बसली आहेत. आदित्य ओक (ऑर्गन) आणि प्रसाद पाध्ये (तबला) यांचा विशेष उल्लेख करणे आवश्यक. 

एकूण, चित्रपट उत्कृष्ट जमला आहे. त्याबद्दल राहुल, आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे. 


- नरेंद्र जोशी 

No comments:

Post a Comment