धनुष्य कोटीच्या सागर किनाऱ्यावर सुग्रीव, नल आणि नील उभे होते. समुद्राला भरती आलेली होती. फेसाळत, उफाळत किनाऱ्यावर धडकणाऱ्या लाटांकडे पहात सुग्रीव म्हणाला, "हा सिंधू सागर आता पार करून जाणे आवश्यक आहे. कसे कोणास ठाऊक".
नल म्हणाला, "होय महाराज". त्याच्याकडे पाहून सुग्रीव म्हणाला, "तुझ्याकडून ह्यापेक्षा वेगळ्या उत्तराची अपेक्षा होती. तू स्थापत्य ज्ञानी आहेस. सेतू बांधण्याची विद्या तुला ज्ञात आहे. तो कसा बांधायचा ह्याबद्दल तुझ्या काही कल्पना असतीलच".
सुग्रीवाच्या बोलण्याचा रोख समजून नल म्हणाला, "होय महाराज. आजपर्यंत अनेक रस्ते, सेतू यांचे आराखडे तयार केले. पण समुद्रावर, आणि एवढ्या लांब अंतराचा सेतू बांधणे... "
त्याला मध्ये थांबवून सुग्रीव म्हणाला, "प्रभू श्रीरामांना मी वचन दिले आहे. मित्र म्हणून मला ते पाळलेच पाहिजे. पण आता तूच असं म्हणालास तर मग कठीणच आहे. माझा वचनभंग होईल.... आणि तुला एक सेतू बांधता येत नसेल, तर मग काय उपयोग तुझ्या ज्ञानाचा?"
रागावर नियंत्रण ठेवत नल म्हणाला, "महाराज, असं म्हणू नका. पल्ला खूप मोठा आहे. शिवाय हा समुद्र. त्याची खोली खूप जास्त. त्याच्यावर सेतू बांधायचा तर त्याचा पाया घालायला किती खोल जायला लागणार. त्याचे तंत्र आपल्याजवळ नाही. आपल्याला माहित असलेल्या जगात असा सेतू आजवर कोणी बांधलेला नाही."
सुग्रीव रागाने म्हणाला, "मला अडचणी सांगू नकोस. तुला जमणार नसेल तर तसं सांग".
"आणि नसेल जमणार तर? दुसरा काय पर्याय आहे, महाराज?" आता नल देखील चिडला होता.
सुग्रीव ओरडून काही बोलणार, इतक्यात प्रभू श्रीरामांचा आवाज आला "मित्रांनो, शांत व्हा". ते सुग्रीवाकडे वळून म्हणाले," मित्र सुग्रीवा, नल म्हणतोय ते खरंच आहे. असा सेतू बांधणे कठीण आहे. तुम्ही दोघेही प्रक्षुब्ध झालेले दिसता. पण असं एकमेकांवर ओरडून काहीच साध्य होणार नाही. शांतपणे आपण विचार करून यातून मार्ग काढू आपण".
तेव्हा एक कपी म्हणाला, "अहो पण हनुमान गेलाच होता तिकडे, तेव्हा त्यानेच सीता मातेला इकडे का नाही आणले? आपल्याला तिकडे जायची गरजच पडली नसती".
श्रीराम म्हणाले, "सीतेचं बरोबर आहे. आपल्या पतीने समक्ष येऊन आपली सुटका करावी असं कोणत्याही स्त्रीला वाटणे स्वाभाविक आहे. आणि पतिव्रता स्त्रीने अशी परपुरुषाबरोबर जाणे हे तिला प्रशस्त वाटले नसणार".
एवढ्यात एक वृद्ध कपी म्हणाले, "हे सगळं शूर्पणखेच्या प्रसंगामुळे झालं आहे. बंधू लक्ष्मणाने तिचे नाक कापले नसते तर.... "
ताड्कन वीर लक्ष्मण म्हणाला, "मग काय करायला हवं होतं मी? सीता मातेवर हल्ला करत होती ती शूर्पणखा. अशा वेळी मी काय तिचा नुसता निषेध करत बसणार होतो का? की उपोषण करून तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करणार होतो?"
वाद वाढत जाऊन त्याला फाटे फुटणार असे दिसू लागले. पुन्हा एकदा श्रीराम म्हणाले, "लोक हो, शांत व्हा. काय झालं, का झालं, याचा विचार करण्यात आता अर्थ नाही. ज्या परिस्थितीत जे योग्य वाटतं तेच आपण करत असतो. तेव्हा आता यापुढे काय करायचं त्याचा विचार करूया".
थोडा शांत होऊन सुग्रीव म्हणाला, "प्रभू, गेले तीन दिवस आम्ही सागर देवाची पूजा मांडली आहे. तो प्रसन्न होऊन आपल्याला काही मार्ग दाखवेल अशी अपेक्षा होती. पण त्याचे साधे दर्शन देखील झालेले नाही. हे कसले देव?".
स्मित करून श्रीराम म्हणाले,"आपल्या आर्य पूर्वजांनी पृथ्वी, सूर्य, वरुण, सागर या नैसर्गिक शक्तींना देव मानले, आणि त्यांची पूजा करण्याचा प्रघात पाडला. यज्ञ यागातून त्या देवांना त्यांचा हविर्भाग दिला जातो. त्यामागे काहीही मागण्याची भावना नसून, आपल्याला जे मिळते आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचीच भावना असावी. आणि त्यात चुकीचं काहीच नाही. खरंच असा कोणी सागर देव असता, तर तो एव्हाना प्रसन्न झालाच असता. पण त्याच्यावर अवलंबून राहणे कितपत योग्य आहे? शेवटी मानवी प्रयत्नवादाला काही अर्थ आहे की नाही? ".
सुग्रीव अधीरतेने म्हणाला, "प्रभू, आपण जर सागरावर बाण मारला तर? नुसती धमकी जरी दिली, तरी मला वाटते सागर देव घाबरून आपल्याला शरण येईल".
आश्चर्य चकित होऊन श्रीराम म्हणाले, "गेले तीन दिवस तुम्ही त्याची पूजा करत आहात. पण आता तो प्रसन्न होत नाही म्हणून लगेच तुम्ही त्याच्यावर शस्त्र उपसायची भाषा करता? काय देवभक्ती आहे का चेष्टा?"
सुग्रीव निरुत्तर झाला. श्रीराम पुढे म्हणाले,"आणि मी त्याच्यावर शस्त्र उपसलेच तर उपयोग काहीच होणार नाही. उलट, त्यातली जीवसृष्टी मात्र निष्कारण नाश पावेल. त्यापेक्षा आपण सेतू कसा बांधता येईल याचा विचार करूया."
एक कपी म्हणाला, "आपण मोठमोठया दगड शिळांचा सेतू करू".
दुसरा एक म्हणाला, "अरे, पण ते दगड समुद्रात बुडणार नाहीत का?"
विचार करून पहिला म्हणाला, "आपण प्रत्येक दगडावर प्रभूंचे नाव लिहू. त्या नावाच्या प्रभावाने दगड देखील तरतील".
स्मित करून श्रीराम म्हणाले, "माझे, किंवा कोणाचेही, नुसते नाव जर इतके प्रभावी असते, तर.. तर आपण आत्ता आहोत या परिस्थितीत पडलोच नसतो".
सुग्रीव हात जोडून म्हणाला, "प्रभू, हे लोक कदाचित श्रद्धेपोटी असे म्हणत असतील".
"ठीक आहे. विचार मंथन करायला काहीच हरकत नाही. पण ते विचार जरा विवेक बाळगून केले तर उत्तम होईल. असो. आता लवकरच सूर्यास्त होईल. आपण सर्वजण उद्या सकाळी पुन्हा इथे जमू, आणि.. आणि विचार मंथन करू" श्रीराम पुन्हा स्मित करून म्हणाले.
सुग्रीवाला हे बोलणे पटले. उद्या सकाळी परत इथेच येऊन शांत चित्ताने विचार विनिमय करायचे मान्य करून सर्वजण परतले.
******
रावणाच्या दरबारात सर्व मंत्रिगण, बंधू विभीषण आणि युवराज इंद्रजीत जमले होते. एक मंत्री उठून हात जोडून म्हणाले, "महाराज, आपल्या दूताने माहिती आणली आहे, की धनुष्य कोटीच्या किनाऱ्यावर राम आणि त्याची वानरसेना जमली आहे".
इंद्रजित म्हणाला, "जमू दे. त्यांना एव्हढा मोठा समुद्र ओलांडून इकडे येणं कदापि शक्य नाही".
मंत्री नम्रपणे म्हणाले, "महाराज, काही दिवसांपूर्वी तो एक जण आलाच होता की".
इंद्रजीत म्हणाला,"हो. तो यःकश्चित वानर. त्याला मी आपल्या शक्तीने सहज बंदी केले होते".
मंत्री म्हणाले," युवराज, जो वानर आपल्या नकळत अशोक वनात सीतेपर्यंत जाऊ शकला, आणि आपण बंदी केल्यानंतरही ज्याने पूर्ण लंकेला आग लावली तो वानर यःकश्चित नक्कीच नव्हता. शिवाय आता त्याला इथली सर्व माहिती झालेली आहे".
इतका वेळ शांत असलेला रावण म्हणाला, "अहो, तो एक वानर आला होता. एवढी मोठी सेना येणे कठीणच".
मंत्री म्हणाले, "मला वाटते, ते सेतू बांधायचा विचार करत असावेत. त्यांच्या सेनेत नल आणि नील असे दोन स्थापत्य विशारद आहेत असे ऐकतो".
रावण म्हणाला, "मंत्री, आजपर्यंत कोणीही इथे सेतू बांधू शकले नाही, इतका हा सागर खोल आहे. आपली लंका अभेद्य आहे".
मंत्री पुन्हा म्हणाले, "आणि समजा, त्यांनी बांधलाच सेतू, आणि आली सगळी सेना इकडे, तर? त्यापेक्षा आपण त्यांचा सेतू बांधायचा प्रयत्नच हाणून पाडू".
रावण म्हणाला, "अहो मंत्री, ती सेना सेतू बांधून इकडे आलीच, तरी त्यांचा पराभव निश्चित आहे. मग तो सेतू आपल्याला आपोआपच मिळेल. आणि आर्यावर्ताकडे जाणारा मार्ग देखील. आतापर्यंत आपण पुष्पक विमान वापरून उत्तरेकडे जात होतो. आता आपला शत्रूच आपल्याकरता सेतू बांधून देत असेल, तर बरेच आहे की".
मंत्री निरुत्तर झाले.
******
भल्या सकाळी नल आणि नील सागर किनाऱ्यावर चालत होते. श्रीरामांनी शांतपणे विचार करायला सांगितले होते. म्हणजे नक्की काय ते त्यांना उमगत नव्हते. एवढ्यात त्यांना एक मनुष्य दूर समुद्रातून चालत येताना दिसला. त्याला थांबवून ते म्हणाले, "बंधू , तू कोण आहेस? आणि समुद्रातून तू चालत कसा आलास?"
थोडे घाबरलेला तो मनुष्य म्हणाला, "महाराज, मी एक मत्स्य व्यावसायिक आहे. इथे सागरातून मासे पकडून आणतो आणि विकतो".
"पण तुझी नाव कुठे आहे?"
"अहो महाराज, या बाजूला समुद्र काही फार खोल नाहीये. ओहोटीच्या वेळी आम्ही चालत, फार तर कमरेपर्यंत पाण्यात जातो, आणि मासेमारी करून, भरतीच्या वेळी असेच चालत परत येतो. आहे काय आणि नाही काय?"
"थांब थांब. या बाजूला म्हणजे? दिशा कोणती? दक्षिण? की दक्षिण-पूर्व ?"
"महाराज, आम्हाला दिशा वगैरे काही समजत नाही". तो गोंधळून म्हणाला.
"आणि ही समुद्रातली कमी खोली. नक्की कुठपर्यंत आहे? कुठेतरी खोली वाढतच असणार ना?" नळाने चौकशी आरंभली.
"नाही महाराज. आम्ही बरेचदा असे चालत पार लंकेपर्यंत गेलो होतो".
"लंका?"
"महाराज, आता या बाजूला आणखी कोणती भूमी असणार आहे? यवद्वीप आणि सुमंत्र द्वीप तर इथून खूपच दूर आहे. ती लंकाच असणार"
नल आणि नील दोघांनी एकमेकांकडे पाहिले.
"आणि तिकडे तुम्हा लोकांना कोणी पाहिले नाही?"
"लंकेच्या त्या बाजूला फारशी वस्ती नाही".
नल म्हणाला, "आता असं कर, बंधू. पुढच्या ओहोटीच्या वेळी आम्हाला सांग. आम्ही तुझ्यासोबत येऊ".
"ते कशाला?"
"कळेलच तुला".
******
उत्साहाने भारित झालेला नल हात जोडून श्रीरामांच्या समोर आला. "प्रभू, लंकेकडे जाण्यासाठी, समुद्रातला कमी खोलीचा पट्टा सापडला आहे. खाली मोठाले खडक आहेत, आणि चांगले भक्कम आहेत. नील आणि इतर वानरांना मी खुणेचे झेंडे, निशाण, दोर वगैरे घेऊन पाठवले आहे. त्यांनी आखलेल्या मार्गावर आपण जर आधी काही झाडे टाकून मग मोठे खडक टाकत गेलो, तर सेतू नक्कीच बांधता येईल".
.. मार्गाची आखणी करून नील परत आला. मग सुग्रीवाच्या आज्ञेवरून, सर्व वानरदळ सेतूबंधनाच्या कार्यास लागले, मोठमोठी झाडे, खडक घेऊन समुद्रात जाऊ लागले, आणि मोठ्या उत्साहाने गाऊ लागले:
सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी,
सीता वर रामचंद्र की जय
© नरेंद्र जोशी
No comments:
Post a Comment