Saturday, February 25, 2023

असाही एक सूर्यास्त

असाही एक सूर्यास्त 

.. दुपार केव्हाच टळली होती.  सूर्य हळूहळू अस्ताचलाकडे चालला होता. सर्वत्र धूळ, धूर, अग्नी, रक्त यांचेच साम्राज्य. योद्धे एकमेकांच्या नरडीचा घोट घ्यायला धावत होते. बाणांचा, अस्त्रांचा वर्षाव होत होता. आणि या सर्व गदारोळात, अर्जुन जयद्रथाला शोधत होता. 

आदल्याच दिवशी झालेल्या चक्रव्यूहाच्या युद्धात अर्जुनाचा प्रिय पुत्र अभिमन्यू धारातीर्थी पडला होता. अभिमन्यू चक्रव्यूहात एकटा सापडला होता. संशप्तकांशी युद्ध करण्यात अर्जुन गुंतून पडला होता. त्यामुळे तो अभिमन्यूच्या मदतीला येऊ शकला नाही. त्याचे दुःख होतेच. पण त्याही पेक्षा, जयद्रथाने अभिमन्यूच्या मृत शरीराची जी विटंबना केली होती त्याचा राग जास्त होता. आजचा दिवस मावळण्यापूर्वी जयद्रथाचा वध करीन, अन्यथा अग्निकाष्ठ भक्षण करीन - अशी प्रतिज्ञा त्या सर्वश्रेष्ठ धनुर्धराने केली होती. आणि म्हणूनच तो जयद्रथाला शोधत होता. 

दुपार टळून गेली तरी अजून जयद्रथ सामोरा येत नव्हता. जंग जंग पछाडून देखील, तो सापडत नव्हता. काहीसा निराश होऊन अर्जुन म्हणाला, " हे केशवा, जयद्रथ काही सापडत नाही रे. त्याला सर्व कौरवांनी असे काही संरक्षित केले आहे, की समोर दिसतोय पण माझी अस्त्रे त्याच्यापर्यंत पोहोचतच नाहीत."

श्रीकृष्ण म्हणाला, "हे पार्था, अशी जगावेगळी प्रतिज्ञा तू केलीसच कशी? जयद्रथाचा वध तुला तसा देखील करता आलाच असता. त्याकरता अशी उघड प्रतिज्ञा करायची आवश्यकता नव्हती". 

"होय मित्रा. पण काय करू? शेवटी क्षत्रिय रक्त आहे माझे. उफाळून आले. आणि रागाच्या भरात...". 

"क्रोधातभवति संमोहः संमोहातस्मृतिविभ्रम: - पहिल्याच दिवशी मी केलेला उपदेश विसरलास, पार्था. तुझ्या प्रतिज्ञेमुळे कौरव अधिकच सतर्क झाले आहेत. त्यांनी मोठ्या कौशल्याने जयद्रथाला संरक्षण दिले आहे. कर्ण, अश्वत्थामा, कृपाचार्य, दुर्योधन... सर्व जण जणू जयद्रथाभोवती कवच बनून उभे आहेत. त्यांना माहित आहे की, अर्जुनाने अग्निप्रवेश केला, की युद्ध जिंकण्याची त्यांची शक्यता अनेक पटीने वाढेल". 

"दिवस मावळायला आता फार काळ उरला नाही. ज्या पद्धतीने युद्ध चालले आहे, त्यावरून, आज जयद्रथाचा वध करता येईल असे वाटत नाही. काहीतरी मार्ग काढायला हवा, कृष्णा". 

"हो. बरं एक सांग पार्था. तू जयद्रथाला युद्धासाठी कसे आवाहन करतो आहेस?"

"शंखनाद करून", गोंधळून अर्जुन म्हणाला. "माझ्या शंखाचा नाद तो बरोबर ओळखतो. नादाच्या दिशेने तो पाहतो. मी दिसलो की लगेच सुरक्षा कवचाच्या मागे लपतो". 

"हं. आता असं कर अर्जुना. थोडा वेळ शंख वाजवू नकोस. इतरत्र, इतर वीरांशी लढत रहा. म्हणजे जयद्रथ थोडा गाफील राहील". 

अर्जुनाने तंतोतंत तसे केले. काही क्षणांनंतर श्रीकृष्ण म्हणाला, "पार्था, आता लवकरच जयद्रथ तुझ्यासमोर येईल."

"कसा? तुझा नक्की काय विचार आहे?" 

"सरळ मार्गाने जयद्रथाचा वध होणार नाही. तेव्हा वाममार्ग..."

"पण हे धर्मयुद्ध आहे, कृष्णा". 

"अनेक सशस्त्र योध्यांनी मिळून एकट्या, निशस्त्र अभिमन्यूला मारले, तेव्हा कुठे गेला होता त्यांचा युद्धधर्म? तो भूरिश्रवा, निशस्त्र सात्यकीला मारायला धावला होता. तेव्हा तो देखील अधर्मच होता ना? त्याचा हात तू वरच्या वर तोडला नसतास तर, सात्यकी हा अधर्मानेच मारला गेला असता. धर्म पालन न करणाऱ्या लोकांशी धर्माने वागण्यात काहीच अर्थ नसतो. "

".."

"जयद्रथ समोर आला, की तू तुझे धनुष्य उचल, त्याला बाण लाव आणि सरळ जयद्रथाचा कंठवेध कर. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव. त्याला वर मिळाला आहे, की त्याचे शीर जमिनीवर पाडणाऱ्या व्यक्तीला तात्काळ मृत्यू येईल. तेव्हा, त्याचा शिरच्छेद केल्यानंतर, त्याच्या शिरावर एकामागोमाग एक बाण मार, आणि ते शीर कुरुक्षेत्राजवळ तप करत बसलेल्या वृद्धक्षत्राच्या मांडीवर जाऊन पडेल असे कर. बाकी सगळे मी पाहून घेतो". 

अर्जुन स्मित करून म्हणाला, "कृष्णा, धनुष्य मी उचलतो. बाण मी चढवतो आणि जयद्रथाचा वध मीच करतो. त्याचे शीर देखील मीच इष्ट स्थळी नेऊन टाकतो. मग, बाकी सगळे म्हणजे नक्की काय करणार आहेस तू?"

श्रीकृष्ण स्मित करून म्हणाला, "अर्जुना, असाच प्रश्न तू मला पांचालीच्या स्वयंवरप्रसंगी देखील विचारला होतास". आणि क्षणातच तो प्रसंग अर्जुनाच्या डोळ्यांसमोर तरळून गेला. सुवर्ण स्थालीत ठेवलेल्या पाण्यात पडलेले प्रतिबिंब पाहून, मत्स्य वेध करायचा होता. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला होता की, "योग्य पवित्रा घेऊन, स्थिर चित्ताने माशाचे प्रतिबिंब एकदा नीट बघून घे. त्यावरचे लक्ष ढळू न देता, धनुष्याला बाण लाव, आणि पाण्यात पहात अचूक नेम साध. बाकी सगळे मी पाहून घेतो". तेव्हाही अर्जुनाने हाच प्रश्न केला होता: "पवित्रा मी घ्यायचा. प्रतिबिंब मी पाहायचे. धनुष्य मी धरायचे. बाण मी लावायचा. नेम मी साधायचा. मग तू  बाकीचे सगळे म्हणजे नक्की काय करणार?" त्यावर श्रीकृष्ण म्हणाला होता:" मी थाळीतले पाणी स्थिर ठेवतो".

अर्जुन काही बोलला नाही. श्रीकृष्ण पुढे म्हणाला, "अर्जुना, आता तुझा शंख मला दे."

"तो कशाकरता"? अर्जुन अधिकच गोंधळला. 

"तुझ्या शंखाचा नाद झाला की जयद्रथ तुझ्याकडे पहातो. मला त्याने माझ्याकडे पाहायला हवे आहे". 

"पण.. त्याने काय साध्य होणार आहे?"

"तू बघशीलच"

"संमोहन? दृष्टिभ्रम? की तुझे योगसामर्थ्य?"

"तुला पाहिजे ते म्हण. पूर्वी, आपण द्रौपदीचे वस्त्र हरण करतोय, असा भ्रम त्या दुःषासनाला झालाच होता की. वास्तविक, द्रौपदीला स्पर्श करायची देखील त्या दुष्टाची लायकी नाही. तो वस्त्र हरण काय डोंबल करणार होता?" 

".."

"मी सांगतो तसे कर. मी शंखनाद केला, की रथावरून खाली उतर. पुढे काय करायचे ते तुला आपोआपच समजेल". 

श्रीकृष्णाने अर्जुनाचा शंख घेऊन दीर्घ शंखनाद केला. तो नाद ओळखून जयद्रथाने त्या दिशेने पाहिले. शंख अर्जुन नव्हे तर श्रीकृष्ण वाजवतो आहे, हे पाहून तो थोडा स्तिमित झाला. क्षण, दोन क्षण, त्याची आणि श्रीकृष्णाची दृष्टिभेट झाली. आणि... आणि जयद्रथ आनंदाने नाचू लागला. रथावरून खाली उतरून इतस्ततः धावत सुटला. आणि ओरडू लागला: "झाला. सूर्यास्त झाला. अर्जुना, कर आता आपली प्रतिज्ञा पूर्ण. कर आता अग्निकाष्ठ भक्षण". वात झाल्यासारखा तो हसायला लागला. 

सेनेच्या अग्रस्थानी असलेल्या सेनापती द्रोणाचार्यांनी मागे वळून पाहिले. कसला आवाज येतोय? कोण ओरडतोय? काय झालं काय? पाठीमागून धावत येणाऱ्या जयद्रथाला पाहून ते म्हणाले, "अरे याला काय झाले? सूर्यास्त कुठे झाला आहे? सूर्य तर अजून चार अंगुळे वर आहे". 

दुर्योधन म्हणाला, "होय आचार्य. त्याला बहुधा भ्रम झाला आहे. सूर्य मावळला आहे असे त्याला एकट्यालाच वाटत आहे". 

द्रोणाचार्य पुढे म्हणाले, "कोणीतरी जयद्रथाला थांबवा. तो फार पुढे गेला तर अर्जुनापासून त्याला कोणीही वाचवू शकणार नाही."

दुर्योधन म्हणाला,"आचार्य, अर्जुन तर रथावरून खाली उतरला आहे, आणि निशस्त्र आहे". 

द्रोणाचार्य स्मित करून म्हणाले,"दुर्योधना, नीट बघ. अर्जुन खाली उतरला असला, तरी त्याचे धनुष्य बाण रथावरच, त्याच्या हाताला लागतील असे, अगदी जवळ ठेवलेले आहेत. धनुष्य उचलून, बाण लावून सोडायला, अर्जुनाला अर्ध निमिष देखील पुरे होते. माझा शिष्य आहे तो". 

दुर्योधन काही बोलायच्या आधी, जयद्रथ अर्जुनाच्या समोर जाऊन उभा राहिला होता. "सूर्य काही तुझ्यासाठी थांबलेला नाही, अर्जुना. त्याचा अस्त झाला. जा, अग्निकाष्ठ भक्षण करून स्वर्गात जा. अभिमन्यू तिथे तुझी वाट बघतोय". 

इतका वेळ जयद्रथावर खिळून ठेवलेली आपली दृष्टी श्रीकृष्णाने सूर्याच्या दिशेने वळवली. तत्क्षणी... तत्क्षणी जयद्रथाच्या डोळ्यांसमोर सूर्याचा, नव्हे, सहस्र्र सूर्यांचा प्रकाश झळकला. काय झाले हे समजायच्या आधी, श्रीकृष्ण रथावर उभा राहिला. आपली एक तर्जनी सूर्याच्या दिशेने, आणि दुसरी तर्जनी जयद्रथाच्या दिशेने करून तो अर्जुनाला म्हणाला.... 


© नरेंद्र जोशी 


No comments:

Post a Comment