Saturday, March 25, 2023

फुलराणी

 फुलराणी - एखादी कलाकृती किती लोकप्रिय होऊ शकते, याचे हे एक अस्सल उदाहरण. जॉर्ज बर्नार्ड शॉ चे मूळ नाटक पिगमेलियन. त्यावर अॅलन जे लर्नर याने स्वरसाज चढवला, आणि त्याची माय फेअर लेडी झाली. आधी संगीतिका आणि मग चित्रपट. मग जगभर त्याच्या आवृत्या निघाल्या. आपल्याकडे तर या विषयावर तब्बल पाच हिंदी चित्रपट निघाले. (बाय द वे, त्या पाचपैकी तीन चित्रपटांचा नायक देव आनंद होता. आणि उरलेल्या दोन चित्रपटांची नायिका हेमा मालिनी होती. वो किस्सा फिर कभी). नाट्य स्वरूपात हे नाटक प्रथम गुजराथी रंगभूमीवर आले, ते संतू रंगीली या नावाने, आणि मग मराठीत, अर्थातच, ती फुलराणी. 

एवढ्या लांबलचक प्रवासानंतर फुलराणी मराठी पडद्यावर येत आहे, याचे प्रथम स्वागत आणि कौतुक. सौन्दर्य स्पर्धा (ब्युटी कॉन्टेस्ट) हा विषय घेऊन पटकथेची मांडणी केली आहे. विक्रम राजाध्यक्ष याचे ग्रूमिंग सेंटर असते, आणि त्याने ग्रूम केलेल्या मुली गेली पाच वर्षे सतत प्रीटी प्रिन्सेस ही कॉन्टेस्ट जिंकत आलेल्या असतात. या गोष्टीचा त्याला गर्व असतो. अशाच एका कॉन्टेस्ट नंतर तो त्याच्या मित्राला अशी बढाई मारतो, की मी अगदी कोणत्याही मुलीला ग्रूम करून पुढच्या वर्षी कॉन्टेस्ट मध्ये जिंकून दाखवीन. त्याच वेळी, केवळ योगायोगाने शेवंता ही फुलवाली मुलगी तिथे आलेली असते. आणि, नशेच्या (आणि अहंकाराच्या) भरात, विक्रम तिच्याकडे बोट दाखवून, हिला ब्युटी क्वीन बनवून दाखवीन अशी बढाई मारतो. अर्थात, विक्रमाचे समाजातील स्थान आणि लौकिक लक्षात घेता, ही गोष्ट लवकरच व्हायरल होते. त्याच वेळी याच गोष्टीच्या अनुषंगाने एक बिझिनेस डील देखील चालून येते. आता विक्रमला हे चॅलेंज घेणे भागच असते.

 आता, शेवंता ही कोळीवाड्यात राहणारी, फुलं विकणारी, 'झगामगा आणि मला बघा' या कॅटेगरीतली मुलगी. डोक्याने भडक, आणि जिभेने तिखट. तिचा बाप दारुड्या आणि रिकामटेकडा असतो. विक्रम तिला आपल्या ग्रूमिंग सेंटर मध्ये आणून तिला ब्युटी क्वीन बनवण्याच्या उद्योगाला लागतो. अर्थात, हा प्रवास सोपा नसतो. शेवंताची बोली भाषा, तिची एकूण वागणूक ही ब्युटी क्वीन च्या आसपासही जाणारी नसते. एका क्षणी ती हे सगळं सोडून जाते. पण विक्रम तिचे मन वळवण्यात यशस्वी होतो. याच खडतर प्रवासा दरम्यान, विक्रममध्ये आपला जीव गुंतला आहे, याची तिला जाणीव होते. अर्थात, विक्रमच्या दृष्टीतून, सुरुवातीला तरी, शेवंताचे स्थान हे केवळ एक पैज (आणि एक बिझिनेस डील) यापलिकडे काही नसते. 

पुढे काय होते? ती ब्युटी क्वीन होते का? आणि पैजेचे काय? हे सगळे प्रत्यक्ष पडद्यावरच पहा. 

आता, मूळ नाटक इतके लोकप्रिय झालेले असल्याने, त्याच्याशी तुलना होणे स्वाभाविक आहे. सतीश दुभाषी यांच्या जागी सुबोध भावे ही योजना तशी चपखल आहे. सुबोधने अहंकारी, गर्विष्ठ, Living-by-choice विक्रम मोठ्या तोऱ्यात सादर केला आहे. शेवंताच्या दारुड्या बापाच्या भूमिकेत मिलिंद शिंदेने धमाल केली आहे. विक्रमचे, ब्रिगेडियर असलेले शिस्तप्रिय आणि तरीही खूप प्रेमळ वडील, दिवंगत विक्रम गोखले यांनी अतिशय सुरेख रंगवले आहेत. 

आणि शेवंता झालेली प्रियदर्शिनी इंदलकर. तिने या मध्यवर्ती भूमिकेत कमाल केली आहे. फारशी न शिकलेली, पण परिस्थितीने शहाणी झालेली झगामगा शेवंता, ब्युटी क्वीन व्हायची स्वप्ने बघणारी, त्यापायी खूप कष्ट घेणारी, आपल्यावर सतत खेकसणाऱ्या विक्रमवर चिडणारी, पण नंतर त्याच्याच प्रेमात पडलेली, ब्युटी कॉन्टेस्टची बेगडी दुनिया आणि त्यातला फोलपणा लक्षात आल्यावर निराश झालेली शेवंता - या सगळ्या रंगछटा तिने फार सुरेख दाखवल्या आहेत. शेवटचे तिचे भाषण - ज्यात ती म्हणते की आता ब्युटी क्वीन झाले तरी पुढे काहीही भवितव्य नाही, आणि नंतर यु-टर्न घेऊन परत पूर्वीचे जीवन देखील जगता येणार नाही - हे आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. अभिनयाबरोबरच तिने इथे नृत्य देखील फार सुंदर केले आहे. मला वाटते, ही तिची पहिलीच मोठी भूमिका आहे. 

इतर कलाकारांनी (अश्विनी कुलकर्णी, सुशांत शेलार) आपापली कामे व्यवस्थित केली आहेत. 

चित्रपटात मोजकी पण सुरेल गाणी आहेत. हिरवे हिरवे गार गालिचे ही बालकवींची कविता नव्या चालीवर ऐकायला मिळते - संगीत निलेश मोहरीर यांचे. तसेच चढविला पट्टा कमरेवरी ही लावणी देखील फर्मास जमली आहे. 

लेखक गुरु ठाकूर आणि विश्वास जोशी यांना शंभर टक्के मार्क द्यायला हवे. घट्ट पटकथा आणि चटपटीत संवाद ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. शेवंताच्या तोंडी असलेले, वरवर अडाणी भासणारे संवाद, खूप काही सांगून जातात. मूळ नाटकापासून पटकथा जरी थोडी दूर जात असली तरी, खूप काही फारकत घेतली आहे असे अजिबात वाटत नाही. विश्वास जोशी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील अतिशय नेटके केले आहे.  तांत्रिक दृष्ट्या चित्रपट सफाईदार आहे. 

खूप दिवसांनी एक चांगला मराठी चित्रपट पाहायला मिळाला. 

1 comment: