परवा, सिनिअर सिटीझन साठी असलेल्या एका कार्यक्रमात, मी 'या कातरवेळी' हे गीत गायचे, असं ठरलं होतं. तत्पूर्वी, एकदा ते गीत नीट ऐकून घेऊ असं म्हणून, ऐकू लागलो... आणि....
या कातरवेळी पाहिजेस तू जवळी
आयुष्याची कातरवेळ झाली आहे. ज्याच्याबरोबर इतकी वर्षं संसार केला, आयुष्यातले चढ उतार पाहिले, बऱ्या वाईट प्रसंगांना तोंड दिले, तो जोडीदार आत्ता इथे नाहीये.. दूर गेला आहे. त्याची आठवण दाटून येतेय. तो जोडीदार क्षणभर का होईना, पण जवळ असावा असं आतून वाटतंय.
दिवस जाय बुडुन पार
ललित नभी मेघ चार
पुसट त्यास जरीकिनार
उसवी तीच सांज खुळी
आयुष्य सरत आले. चार दिवस उरले आता. 'आता दिस चार, खेळीमेळी' असं म्हणायची थोडी फार आस आहे, म्हणा अजून. पण.. पण ही दाटून आलेली संध्याकाळ आणि एकलेपण - त्या आशेला सुद्धा जणू झाकोळून टाकतेय. ढगांना असलेली चंदेरी किनार जशी सांजसावल्यांमध्ये झाकोळून जाते, तशी.
शेष तेज वलय वलय
पावे तमि सहज विलय
कसले तरी दाटे भय
येई तूच तम उजळी
थोडा फार उजेड राहिला आहे तसा अजून. पैलतीर अजून स्पष्टपणे दिसत नाहीये. पण हा उरला सुरला उजेड देखील, हळूहळू दाटून येणाऱ्या अंधारात शनै: शनै: नाहीसा होतोय. जलाशयावर दिसणारी पाण्याची वलये, जशी एक एक करून थांबतात... आणि नंतर? फक्त शांत शांत. .. त्यात भर टाकणारा हा एकलेपणा. लवकरच होवू पाहणाऱ्या अंधाराचे, अज्ञाताचे भय दाटून येत आहे.
अशातच जर का तो आला, तर हा अंधार उजळून जाईल, आणि ही उदासी क्षणार्धात नाहीशी होईल. जोडीदाराचे नुसते अस्तित्व देखील एवढे परिणामकारक असू शकते...
येई बैस ये समीप
अधरे हे नयन टीप
दोन ज्योती एक दीप
मंद प्रभा मग पिवळी
ये जिवलगा, ये असा जवळ बस. माझे ओलावलेले नेत्र तुझ्या ओठांनी टिपून घे. आपण दोघे वेगळे कुठे आहोत? एकाच दिव्याच्या दोन ज्योती. दोघे एकत्र आलो तर... आपल्या जीवनाचा दीप पुन्हा एकदा, मंदपणे का होईना, पण उजळून निघेल.
मोजक्या शब्दांत, एवढ्या उत्कट भावना व्यक्त करण्याची किमया - ग दि माडगूळकरांच्या शब्दांची तर आहेच, पण त्याला बाबूजी (सुधीर फडके) यांचं संगीत, आणि आशा ताईंचा स्वर यांचे कोंदण आहे हेही तितकेच खरे.
ऊनपाऊस चित्रपटातलं हे गीत दिग्दर्शकाने (राजा परांजपे) मोठ्या कौशल्याने चित्रित केले आहे. पडद्यावर हे गीत एक तरुणी म्हणते. तिचे context अर्थातच वेगळे असते (शाब्दिक अर्थ किंवा वाच्यार्थ). पण आतल्या खोलीत बसलेल्या आजी (सुमतीबाई गुप्ते), हेच गीत वर लिहिलेल्या context मध्ये, म्हणजे लाक्षणिक अर्थाने घेतात. गाणं ऐकताना सुमतीबाईंचा पडलेला चेहरा, दाटून आलेला कंठ आणि डोळे टिपणे .... फक्त तीन भावमुद्रा ... बरंच काही सांगून जातं.
मी हे गीत चार चौघांत गाऊच शकणार नाही. नुसतं ऐकताना सुद्धा हुंदका येईल की काय असं वाटत होतं. दहा वीस वर्षांपूर्वी मी हेच गीत ऐकले होते तेव्हा इतकं काही वाटलं नव्हतं. पण आज? वयाबरोबर हळवेपणा वाढत जातो असं म्हणतात. खरंच असणार ते.
ढळला रे ढळला दिन सखया.
© नरेंद्र जोशी
No comments:
Post a Comment