Sunday, May 5, 2024

स्वरगंधर्व

स्वरगंधर्व - अर्थात, बाबूजी (सुधीर फडके) यांचा जीवनपट. बाबूजी हे बहू आयामी व्यक्तिमत्व. संगीतकार, गायक आणि तितकेच प्रखर देशभक्त देखील. जवळजवळ ४०-५० वर्षांची कारकीर्द गाजवणारा हा कलाकार. त्याच्या जीवनावर चित्रपट काढणे हे मोठे आव्हानच होते. त्यातून, बायोपिक हा जरा धाडसाचा विषय. कथानायकाच्या सर्व पैलूंना वाव मिळाला नाही, तर बॅलन्स जाऊन चित्रपट कलंडतो. पण  मला वाटतं, योगेश देशपांडे आणि टीमने हे आव्हान समर्थपणे पेलले आहे. 

पटकथेचा प्रवाह हा एकरेषीय (linear) नसून, बहुरेषीय आहे. दूरदर्शनवर डॉ. अशोक रानडेंनी बाबूजींची मुलाखत घेतली होती (youtube वर उपलब्ध आहे). त्या मुलाखतीचा धागा पकडून, अनेक फ्लॅश बॅक्स मधून हा जीवनपट उलगडत जातो. जवळ जवळ अर्धा चित्रपट हा, बाबूजींचे सुरुवातीचे खडतर आयुष्य दाखवण्यात जातो. या खडतरपणामुळे आलेली आर्तता जणू बाबूजींच्या संगीतात उतरली आहे. या कालखंडात बाबूजींना आलेले बरेवाईट अनुभव, भेटलेले मित्र, झालेली फसवणूक, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. हेडगेवारांसारख्या महनीय व्यक्तींची भेट अशा अनेक गोष्टींना स्पर्शून कथानक पुढे सरकते, ते प्रभात फिल्म कंपनीकडे. 

प्रभात मध्ये बाबूजींना पहिला वहिला ब्रेक मिळतो. इथेच त्यांची भेट होते ग दि माडगूळकरांशी. आणि मग सुरु होते ती फडके-माडगूळकर जोडीची अजरामर संगीत यात्रा. चित्रपटाचा उत्तरार्ध हा याच सुरेल यात्रेमुळे रंगतदार झाला आहे. माडगूळकरांच्या अखेरच्या दिवसांतला एक प्रसंग फारच हृद्य आहे. आपले हे कदाचित अखेरचेच गीत असणार याची जाणीव असलेले गदिमा बाबूजींना गीत लिहून देतात - एकटी पथ चालले, दोघांस आता हात द्या - या सुखांनो या. शेवटचा दिस असा गोड करण्याचे भाग्य तरी किती जणांना लाभते?

चित्रपट संगीताबरोबरच, गीत रामायण हा तर बाबूजींच्या क्रियाशीलतेचा एक उच्चांकच. गीत रामायणाची जन्मकथा, लोकप्रियता आणि विस्तार, या चित्रपटात योग्य रीतीने दाखवला आहे. शेकडो हजारो रसिकांना तृप्त करणारा हा कार्यक्रम अनेक मान्यवरांसमोर सादर करण्याचे भाग्य बाबूजींना लाभले. खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकर,गोळवलकर गुरुजी, अटलबिहारी जी. किती नावे घ्यायची? 

बाबूजींच्या व्यक्तिमत्वाचे तीन महत्वाचे पैलू म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, दादरा नगरहवेली मुक्तिसंग्राम, आणि अर्थातच सावरकर. चित्रपटामध्ये या तिन्ही गोष्टी सविस्तर चित्रित केलेल्या आहेत ही समाधानाची बाब. बाबूजी तरुणपणापासूनच संघ स्वयंसेवक होते. त्यापायी त्यांना बराच मनस्ताप देखील झालेला होता. पण त्यांची संघनिष्ठा जरासुद्धा ढळली नाही. १९८३ मध्ये पुण्याजवळ तळजाई इथे झालेल्या संघ शिबिरात ते स्वतः सहभागी झाले होते आणि जमलेल्या काही हजार स्वयंसेवकांकडून त्यांनी एक गीत बसवून म्हणून देखील घेतले होते. हा सर्व भाग चित्रपटात विस्ताराने मांडला आहे. 

तीच कथा दादरा नगरहवेली मुक्तिसंग्रामाची. बाबूजींनी या संग्रामात बाबासाहेब पुरंदरे आणि इतरांसोबत सशस्त्र भाग घेतला होता. हाही भाग इथे व्यवस्थित चित्रित केलेला आहे. 

सावरकरांवर त्यांची अपार निष्ठा होती. उभी हयात चित्रपट सृष्टीत काढल्यानंतर, आपल्या दैवतावर चित्रपट काढावा असे बाबूजींना वाटले यात नवल नाही (आणि असा चित्रपट काढावा असे त्यापूर्वी कोणालाही वाटले नाही हाच खरेतर नवलाचा भाग आहे. असो. ). बाबूजींनी आपले सर्वस्व पणाला लावून सावरकर चित्रपट पूर्ण केला. आपण काढलेला चित्रपट बाबूजींनी तिकीट काढून पाहिला होता. त्यावेळी बाबूजींच्या चेहऱ्यावर आलेले कृतार्थतेचे समाधान बरच काही सांगून जाते. 

एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाची पत्नी होणे ही देखील तितकीच खडतर तपश्चर्या. बाबूजींच्या एकूण वाटचालीत, ललिताबाईंची देखील महत्वाची भूमिका आहे. तिला इथे पुरेसा वाव आणि न्याय दिलेला आहे. अनेक वेळा, अनेक ठिकाणी ललिताबाई बाबूजींच्या मागे सावलीसारख्या उभ्या राहिल्या आहेत. उदाहरणच द्यायचे तर, एका गीत रामायणाच्या कार्यक्रमात बाबूजी आपला चष्मा न्यायला विसरले होते. त्यामुळे त्यांना गीतांचे लिहिलेले शब्द दिसेनात. याप्रसंगी, ललिताबाईंनी सगळी गीते मोठ्या अक्षरात लिहून बाबूजींना दिली होती. 

आता वळूया कलाकारांकडे. बाबूजींच्या भूमिकेत सुनील बर्वे १०० %. बाबूजींची बोलण्याची, पेटीची एक बाजू मांडीवर घेऊन बसण्याची आणि गाण्याची लकब, त्यांचे हावभाव सुनीलने अचूक दाखवले आहेत. मी स्वतः अनेकवेळा बाबूजींना समोरासमोर प्रत्यक्ष बोलताना, गाताना पाहिले आहे. त्यामुळे मी हे छातीठोकपणे सांगू शकतो, की सुनीलने बाबूजींना पूर्णपणे न्याय दिला आहे. तरुण बाबूजींच्या भूमिकेत अधीश वैद्य या तरुणाने कमाल केली आहे. ललिता बाईंची महत्वाची भूमिका मृण्मयी देशपांडेने फारच सुरेख केली आहे. डॉ. हेडगेवारांच्या भूमिकेत शरद पोंक्षे आहेत. ऋषिकेश जोशीने अटलजी साकार केले आहेत. 

लेखक आणि दिग्दर्शक म्हणून योगेश देशपांडे याना फुल मार्क्स. सर्व कलाकारांकडून त्यांनी उत्कृष्ट कामे करून घेतली आहेत. आणि इतके बारकावे (डिटेल्स) दाखवले आहेत त्यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, आशा ताईंचे काम करणारी अपूर्वा मोडक. आशाबाईंच्या, गाताना होणाऱ्या हाताच्या, मानेच्या हालचाली इतक्या अचूक आहेत. आणि लताबाई? चेहरा देखील न दिसता, फक्त दोन वेण्या आणि पांढरी साडी एवढ्या दोन गोष्टींवर लताबाई समोर उभ्या राहतात. तसेच, वर उल्लेखलेल्या, या सुखांनो या - या गाण्याचे रेकॉर्डिंग. माडगूळकरांचे अखेरचे गीत असल्याची जाणीव झाल्याने आलेली उदासी - बाबूजी आणि आशाबाईंच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसते. 

तांत्रिक बाजू उत्तम आहेत. संगीत संयोजन देखील उत्कृष्ट आहे. बाबूजींची गाणी डॉल्बी वर ऐकण्याची मजा काही और आहे. 


सर्वांग सुंदर झालेला हा चित्रपट, थेटर मध्ये जाऊनच बघावा. 



  

No comments:

Post a Comment