Tuesday, March 26, 2024

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट

 स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - हा फक्त चित्रपट नसून, एक अनुभव आहे. अनुभव एका धगधगत्या व्यक्तिमत्वाचा, आणि त्याच्या तितक्याच धगधगीत विचारसरणीचा. सावरकरांबद्दल काही बोलण्याचा मी प्रयत्न देखील करणार नाही. तेवढी माझी योग्यता नाही आणि अभ्यास देखील नाही. तेव्हा मी हा ब्लॉग चित्रपटापुरताच मर्यादित ठेवतो. 

सावरकर चित्रपट सुरु होतो तो १८९६ च्या प्लेग पासून. त्यावेळी जनतेवर झालेले अत्याचार, त्यातून झालेली रँडची हत्या, लोकमान्य टिळकांचे विचार - या सगळ्यातून तरुण सावरकरांच्या मनाची जडण घडण होत जाते. नंतर फर्गसन कॉलेजात गेल्यावर विदेशी वस्तूंची होळी, अभिनव भारत संस्थेची स्थापना हा सर्व कथाभाग येतो. 

पुढे सावरकर लंडनला कायद्याचा अभ्यास करायला जातात. अर्थात, वकिल होऊन हजारो रुपये मिळवणे हा त्यांचा हेतू मुळीच नव्हता. हे इंग्रजांचे राज्य नक्की चालते तरी कसे, याचे निरीक्षण करणे हाच त्यामागचा हेतू. पुढे इंडिया हाऊस या होस्टेल वजा ठिकाणी राहताना त्यांची गाठ मदनलाल धिंग्रा यांच्याशी पडते. समविचारी मित्रांच्या साथीने मग बॉम्ब तयार करण्याची माहिती गोळा करून ती अभिनव भारताच्या सदस्यांना पाठवणे, पुस्तकात लपवून पिस्तुले पाठवणे हेही उद्योग सुरु होतात. पुढे मदनलाल हा कर्झन वायली या गोऱ्या अधिकाऱ्याची हत्या करतो, आणि इंडिया हाऊस मधील सावरकरांचे वास्तव्य धोक्यात येते. त्यांना अटक होते. मग येते ती मार्सेलिस बंदराच्या जवळ त्यांनी समुद्रात मारलेली उडी. ते पोहून फ्रान्सच्या किनाऱ्यावर जातात, आणि पुन्हा अटकेत पडतात. मग त्यांची रवानगी होते ती अंदमानात,  काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी. मध्यंतरापर्यंतचा हा कथाभाग सविस्तर रित्या चित्रित केलेला आहे. 

चित्रपटाच्या उत्तरार्धात, अंदमानात झालेले त्यांचे हाल, सुटकेसाठी प्रयत्न, सुटका आणि स्थानबद्धता हा भाग येतो. नंतरचा भाग थोडा झटपट घेतलेला वाटतो. पण तसे करणे अपरिहार्य होते, अन्यथा चित्रपट लांबलचक झाला असता. 

एकूण, सावरकरांचा राजकीय प्रवास यात उत्कृष्ट रित्या दाखवला आहे. सावरकरांचे दोन महत्वाचे पैलू म्हणजे त्यांचे काव्य आणि त्यांची प्रखर अशी विज्ञान निष्ठा. या दोन पैलूंचा फारसा उल्लेख दिसत नाही. 

पटकथा आणि संवाद या दोन्ही बाजू बळकट आहेत. चित्रपट ऐतिहासिक दृष्ट्या अचूक करण्याचा आटोकाट प्रयत्न दिसून येतो. 

रणदीप हुडा या कलाकाराने इथे कमाल केली आहे.  सावरकरांच्या भूमिकेत तो पूर्णपणे शिरला आहे. दिग्दर्शन देखील त्याचेच आहे, आणि ते खरोखरच उल्लेखनीय आहे. 

चित्रपटातील उल्लेखनीय अशा काही खास गोष्टी - अंदमानात जेलर असलेला बॅरी, आणि त्याचे क्रौर्य. अंगावर येते. 

गांधीजी रत्नागिरीला सावरकरांना भेटायला येतात, आणि परत जाताना सावरकरांच्या पत्नीच्या पाया पडतात. तो प्रसंग फारच सुरेख.

सावरकर, हिंदू या शब्दाची त्यांची व्याख्या सांगतात तो प्रसंग - १०० टक्के.  

शेवटी, लियाकत अली भारतात येतात तेव्हा सावरकरांना झालेली अटक आणि त्याचे दिलेले हास्यास्पद कारण. आणि सावरकरांनी त्याची उडवलेली खिल्ली.  हा प्रसंग इथे वर्णन करून सांगता येणार नाही. प्रत्यक्ष पडद्यावरच पहा. 

असो. चित्रपट अतिशय इंटेन्स, परिणामकारक आणि प्रामाणिक झाला आहे. त्यात कुठेही कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीचे चुकीचे किंवा विकृत असे चित्रण केलेले आहे, असे मला वाटत नाही. आणि त्यामुळेच हा प्रॉपगॅन्डा आहे असे मला अजिबात वाटले नाही. 

 सर्वानी हा चित्रपट जरूर बघावा. माफीवीर आणि इतर गलिच्छ विशेषणे लावून सावरकरांची हेटाळणी करणारी एक जमात आपल्याकडे आहे (कुठे फेडाल रे हे पाप !). त्यांनी तर आवर्जून बघावा. डोक्यात काही प्रकाश पडण्याची शक्यता आहे. 


No comments:

Post a Comment