Saturday, June 1, 2024

ओळख

 "हरे राम".. म्हणत, त्याने सोफ्यावर देह टेकवला.  

"काय झालं, बाबू?" बाबी बोलत बोलत खोलीत आली. "नाही झालं ना काम? वाटलंच होतं. जाऊ दे रे. जास्त विचार नको करुस. हे जगच तसं आहे."

"मला बरं वाटावं म्हणून तू हे बोलतेयस बाबी. तुझी देखील निराशा झालेली आहे. बरोबर ना?"

... "काही नाही रे. थांब मी चहा टाकते". बाबीने विषय टाळला. 

"बाबी, चाळीस वर्षे लोटली आपल्या लग्नाला. मला वाटतं मी तुला बऱ्यापैकी ओळखतो. तुझी मनस्थिती मला बरोबर कळते."

"हो, मग कोकणातल्या आपल्या घराबद्दल माझे विचार.... " 

तिचं वाक्य अर्धवट तोडून तो म्हणाला, "झालं. काढलास तो विषय?"

बाबी समजुतीच्या स्वरात म्हणाली, "बाबू, मला पूर्ण माहित आहे, तुला हा विषय नको असतो. आपण एकमेकांना तेवढं नक्कीच ओळखतो. पण असं बघ. इथे तरी काय ठेवलंय असं? हा दोन खोल्यांचा फ्लॅट आपल्या नावावर आहे इतकंच. एक तरी गोष्ट सुकर आहे का इथे? मुलं आपापल्या संसारात. वर्ष दीड वर्षांनी कधीतरी येतात. दोन दिवस रहातात. मग आहेच पुन्हा. त्यापेक्षा कोकणातलं आपलं घर काय वाईट आहे? लहान आहे. फारशा सोयी नाहीत. पण आपल्याला दोघांना पुरेसं आहे. आपण एकमेकांना धरून, सांभाळून राहू शकतो."

बाबू काही बोलला नाही. बाबीने केलेला चहा पिऊन तो म्हणाला, "कोकणात गावी तो आपला गडी होता तो आहे का ग अजून? त्याला सांगून आपलं घर जरा साफ करून घेता येईल का?" 

बाबी समाधानाने हसली "मला वाटलंच होतं ...  तू तयार होशील.. "

****

बाबू आणि बाबी कोकणात घरी राहू लागले होते. चार-सहा महिने राहून बघू - अशा बोलीवर बाबू तयार झाला होता. त्याची प्रकृती फारशी ठीक ठाक नव्हतीच. पण तरीही बाबीच्या साठी म्हणून तो तयार झाला होता...  अनेक अटी घालून. फारसे पैसे जवळ ठेवायचे नाहीत. पोट भरेल इतकं अन्न तिथल्या जमिनीत पिकत होतंच. आणि काय लागतंय आता या वयात? जवळ होतं ते सगळं देऊन टाकून, दोघे इथे गावी आली होती. जवळ जवळ सर्वसंग परित्याग केला होता त्या दोघांनी. 

एक दिवस बाबू बाहेर खळ्यात फेऱ्या मारत होता. त्याची नजर एका चमकदार वस्तूवर पडली. कुतूहलाने त्याने पाहिले, तर एक सोन्याचा तोडा पडलेला होता. कोणाचा होता, तिथे कसा आला? कळायला मार्ग नव्हता. त्याने घाईघाईने तो तोडा बाजूला पडलेल्या लाकडांच्या ढिगाखाली सारून टाकला. बाबीने पाहिले तर नसेल ना.. असा विचार करत, काहीशा अपराधी मनानं तो आत येऊन बसला. 

थोड्या वेळाने बाबी आत आली. तिच्या हातात तो तोडा होता. "तूच सारलास ना हा तोडा तिकडे?" 

"हो". तो मान खाली घालून म्हणाला. 

"का?"

" तू मागशील. तुला मोह पडेल... उभ्या आयुष्यात फार काही दागिने देऊ शकलो नाही तुला..."

"अरे पण मी तक्रार केली होती का रे, कधी?" बाबी कळवळून म्हणाली. "आपण सगळं सोडून इथे आलो, आणि अजूनही तुला सोनं आणि माती यातला फरक समजतो? आणि या वयात मला सोन्याचा मोह पडेल असं वाटलं तुला? एवढी वर्षं संसार करून तू मला एव्हढंच ओळखलंस ? वाईट त्याचं वाटतंय रे "

तो काहीच बोलला नाही. 

***

पुढे त्याची प्रकृती जास्तच खालावत गेली. त्याने अंथरूण धरले होते. एक दिवस बाबी एक औषधाची बाटली घेऊन आली. 

"गावातल्या वैद्य बुवांनी हा काढा दिलाय. तो घे बघू". 

"काही उपयोग नाहीये ग बाबी. कशाला उगाच?"

"माझ्या समाधानासाठी तरी घे."

त्याचा नाईलाज झाला होता. 

असेच काही दिवस गेले. काढ्यामुळे असेल किंवा काय, पण तो बरा होऊ लागला. दोन आठवड्यात तो हिंडू फिरू लागला. बाबीला आश्चर्य वाटत होते. 

एक दिवस तो बाबीला म्हणाला, "मी बरा होतोय याचा तुला आनंद होतोय की आश्चर्य?"

"अर्थातच आनंद... " ती तोंड लपवत म्हणाली. 

"पण मला तरी वाटतंय की, तुला आश्चर्य जास्त वाटतंय. हो ना?"

बाबी अपराधी स्वरात म्हणाली, "बाबू, आता या वयात, आयुष्याच्या या स्टेजला मला खोटं बोलायची इच्छा नाही."

बाबूने प्रश्नार्थक चेहरा केला. 

"मी आणलेल्या औषधाचा काहीही परिणाम होत नाहीये हे मला दिसत होतं. आणि माझ्या समाधानासाठी म्हणून तू ते घेत आहेस हेही मला कळत होतं. तुझी ढासळणारी प्रकृती, तुझी मनस्थिती, तुझे होणारे हाल... मला बघवत नव्हते रे. म्हणून.. "

"म्हणून काय?"

"म्हणून रोज मी तुला औषध देताना त्यात विषाचा एक थेम्ब टाकत होते. निदान तुझी सुटका तरी होईल... " पुढचे शब्द तिला बोलवेनात. 

थोडा वेळ शांत बसून तो म्हणाला, "बाबी, आपण खरोखरच एकमेकांना ओळखलेलं नाही ग."

थोडं थांबून तो म्हणाला, "त्या औषधाचा काही उपयोग नव्हताच. तुझ्या समाधानासाठी, मी ते औषध... "

"त्याचं काय?" 

"ते औषध तुझ्या हातून घेत होतो. आणि तुझी पाठ वळताच,  मी ते खिडकीतून बाहेर ओतून टाकत होतो. त्यामुळे, त्यातल्या विषाचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. मी बरा झालो तो केवळ नैसर्गिक कारणाने .. किंवा तुझ्या सदिच्छेने."

थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. मग शांत पणे बाबी म्हणाली, "आपण दोघांनीही एकमेकांचा पूर्ण ओळखलेलं नाहीये रे". 


 


No comments:

Post a Comment