Wednesday, July 17, 2024

रूप पाहता लोचनी

 

रूप पाहता लोचनी 

अव्यक्त निर्गुण ईश्वर । आकलनासी कैसे येई ।

मूर्त रूप सहजी ठायी । दृष्टीस येतसे ।।


ईश्वराचे निर्गुण रूप हे सामान्य माणसाला समजायला तसे कठीणच. क्लेशोधिक तरस्तेषामाव्यक्ता सक्तचेतसाम् या उक्तीला अनुसरून मग त्याला सगुण, मूर्तिरूप दिले गेले. हा सगुण अवतार तरी कसा? तर, ज्याला जसा हवा तसा. हे अव्यक्त, हे परब्रह्म भीमेकाठी, विटेवर उभे ठाकले - तेच विठ्ठलस्वरूप. हा विठ्ठल कसा दिसतो? कैसे त्याचे रूप? म्या पामरें काय बोलावे? पण संत महात्म्यांना तो कसा दिसला? कसा भावला? बघण्यासारखे आहे. चला तर मग. थोर विभुतींच्या दृष्टीतून विठ्ठल बघण्याचा प्रयत्न करू. 

ज्ञानेश्वर माउलींना तो बाप रखुमादेवीवरु कसा वाटला? तर, माउलीहून मायाळू, चंद्राहूनी शीतळू, कल्लोळ प्रेमाचा. सर्व सुखाचें आगरु, जणू. तो दिसतो कसा? तर म्हणे, पांडुरंग कांती, रत्नकील फाकती प्रभा. पण मग, पाया पडो गेले तर, पाऊलची दिसो नये - ही अवस्था. समोर की पाठिमोरा हेही न कळे. पायाखालची वीट म्हणजेच जणू काही सगुण निर्गुणाची सीमारेषा. म्हणजेच, ईश्वराचे निर्गुण रूप, ज्ञानेश्वर अमान्य करत नाहीत तर. एकदा हे मान्य केल्यावर मग, शब्देविण संवादु घडला, आणि दुजेवीण अनुवादू जाहला तर त्यात नवल ते काय? निर्गुणाचा साक्षात्कार झाल्यावर माऊलीची अवस्था कशी होते? तर - दर्पणी पहाता रूप न दिसे हो आपुले. मी-पणाची जाणीवच पूर्ण नाहीशी झाल्यावर प्रतिबिंब तरी काय दिसावे?


त्यांचे समकालीन संत नामदेव महाराज. ज्ञानोबारायांनी त्यांची,  'कच्चे मडके' अशी संभावना केलेली असली तरी पुढे नामदेव महाराज हे संत शिरोमणी ठरले. त्यांची भक्तीची तऱ्हा निराळीच. ज्ञानेश्वर हे चिद्विलासात रमलेले, तर नामदेव भजन कीर्तनात. त्यांनीही, परब्रह्म निष्काम तो हा मानला असला, तरी त्याचे सगुण रूप (म्हणजेच विठ्ठल) आपल्या कीर्तनात रमतो, नाचतो अशी त्यांची श्रद्धा होती. कधी कधी, भावनेपोटी ते भगवंतावर चिडत देखील. पतित पावन न होशी म्हणुनी जातो माघारा असे म्हणायला देखील ते कमी करत नसत. असे असले तरी, विठ्ठल हे त्यांचे सर्वस्व होते. माता, पिता, बंधू, गोत्र, गुरु - सर्व काही विठ्ठलच. आणि म्हणूनच, विठ्ठल सापडल्यावर (किंवा दिसल्यावर), आता कळिकाळा पाड नाही, असे म्हणून ते मोकळे झाले. 


जगद्गुरू तुकाराम महाराजांना विठ्ठल कसा दिसला? तर राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. सावळे सुंदर रूप मनोहर असे वर्णन करणाऱ्या तुकोबांच्या विठ्ठल भक्तीला अध्यात्माचीही जोड होती. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग - असे, अंतर्बाह्य जग आणि आपले मन यांचे सतत चाललेले युद्ध वर्णन करणारे तुकोबा, शेवटी विठोबाच्या नामाचिया बळे अवघ्यांचे तोंड काळे करतात. अध्यात्माला भक्तीची जोड आहे ही अशी. 


समर्थ रामदास म्हटले की आपल्याला मनाचे श्लोक आठवतात. पण समर्थानी काही अभंग देखील रचलेले आहेत. समर्थ जेव्हा पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेले होते, तेव्हा त्यांना विठ्ठलाच्या रूपात, त्यांचे इष्टदैवत म्हणजे प्रभू श्रीरामच दिसत होते. इथे राम कसा नाहीये, सीता माई कुठे गेली? इथे तर गोपाळ दिसतात. मग वानर दळ कुठे गेले? असे प्रश्न पडणाऱ्या समर्थांना, शेवटी विठ्ठल-राम या द्वैताचा संदेह न रहाता, परमेश्वराच्या अद्वैतस्वरूपाचे आकलन होते. 


तर मंडळी, निर्गुण रूपापासून ते अद्वैत रूपापर्यंतचा हा प्रवास. आषाढीच्या निमित्ताने, निरनिराळ्या थोर संतांना दिसलेल्या विठ्ठल स्वरूपाचा मागोवा घेण्याचा माझा हा एक प्रयत्न. 

बोला पुंडलिक वरदा हारी विठ्ठल. 

No comments:

Post a Comment