Saturday, November 9, 2024

अफ़झलखान वध

सन १६५८ चा सुमार. शिवाजी राजांनी आदिलशाही मुलुखात थैमान घातले होते. आदिलशाहाचे अनेक किल्ले त्यांनी काबीज केले होते. आदिलशहाने त्यापूर्वी पाठवलेल्या, फत्तेखान सारख्या सरदारांना महाराजांनी पराभूत केले होते. आदिलशाहीचा कारभार त्यावेळी बडी बेगम साहिबा पाहत होती. महाराजांचा  बंदोबस्त करायला कोणाला पाठवायचे हा मोठा प्रश्न तिच्यासमोर होता. त्यावेळी अफ़झलखान हे नाव पुढे आले. हा आदिलशहाचा मोठा सरदार होता. तो शूर आणि तितकाच क्रूर आणि पाताळयंत्री होता. तो वाई इथे अनेक वर्षे सुभेदार असल्याने, त्याला हा मुलुख परिचित होता. तो तीर्थरूप शहाजी राजांचा द्वेष करत असे. महाराजांचा थोरला भाऊ संभाजी याला याच खानाने दगलबाजी करून मारले होते.  थोडक्यात, महाराजांच्या बंडखोरीचा बिमोड करायला तो अतिशय योग्य असा सरदार होता. 

खानाने मोठे लष्कर गोळा केले. सुमारे बावीस हजार सैनिक, त्याव्यतिरिक्त तोफखाना, पासष्ट हत्ती, आणि उंट अशी प्रचंड फौज घेऊन, खान विजापूरहून निघाला.  त्याचे पहिले लक्ष्य होते - तुळजापूर. तिथे आल्या आल्या त्याने महाराष्ट्राची कुलदैवत असलेल्या तुळजाभवानीचा भंग केला. आणि समोरच एक गाय मारली. जणू तो भवानीला आव्हान देत होता: काय करणार आहेस तू? दाखव तुझी शक्ती. पुढे वाटचाल करताना वाटेतली मंदिरे भंग करतच तो पुढे जात होता. हा सगळा खटाटोप, महाराजांना लढाईसाठी उद्युक्त करण्याचा होता. मंदिरे पाडली तर चिडून जाऊन शिवाजी बाहेर येईल आणि आपल्या हातात सापडेल, असा खानाचा अंदाज होता. पण.. 

महाराजांनी हा डाव ओळखला होता. खानाशी समोरासमोर लढाई करण्यात अर्थ नाही हेही ते जाणून होते. दुसरीकडे खानाने अन्य मार्गांनी महाराजांवर दबाव आणायला सुरुवात केली. फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर हे महाराजांचे नातेवाईक, सईबाईंचे बंधू. त्यांना खानाने कैदेत टाकले. दुसरीकडे, त्याने मावळातल्या सगळ्या देशमुखांना, शिवाजीला मदत करू नये अशी दमदाटीची पत्रे पाठवली.   

ही सर्व परिस्थिती पाहून, खानाशी तह करावा असे ठरले. पण तह केल्याने स्वराज्याचा लचका तोडला जाणार होता हे निश्चित होते. तसेच, तह करून देखील खान दगा फटका करणार नाही, याची खात्री नव्हती. पूर्वी, शिरेपट्टण इथल्या कस्तुरीरंग या राजाला देखील याच खानाने, तह करायच्या निमित्ताने बोलावून दगा दिलेला होता. उघड मैदानात उतारण्यापेक्षा, खानाला शक्य तेवढे आत, सह्याद्रीच्या जंगलात आणायचे असा त्यांचा विचार होता. महाराजांनी प्रतापगडावर जावे, आणि तिथूनच पुढील हालचाली कराव्यात असे ठरले. 

अखेर, तहाची बोलणी सुरु झाली. महाराजांच्या वतीने गोपीनाथ पंत बोकील, आणि खानाचे वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे बोलणी करू लागले. महाराज बाहेर पडून बोलणी करायला घाबरतात, तेव्हा खान साहेबानी येऊन महाराजांना अभय द्यावे आणि मग बोलणी करावी असा धोशा पंत वकिलांनी लावला. खानाला यात काही वावगे वाटले नाही. ठरल्याप्रमाणे तो आपले लष्कर घेऊन जावळीच्या खोऱ्यात आला. महाराज यावेळी प्रतापगडावरच होते.  भेटीचा तपशील ठरला. जागा ठरली. प्रतापगडाच्या अर्ध्या उंचावर एका पठारावर शामियाना तयार करण्यात आला. दोन वकिलांच्या व्यतिरिक्त खान आणि महाराज दोघांनीही प्रत्येकी दहा अंगरक्षक आणायचे असे ठरले. दुसरीकडे, महाराजांनी आपल्या फौजेला हुकूम दिले. खानाची भेट झाल्यानंतर, इशारतीची तोफ उडाल्यावर खानाच्या फौजेवर कसे आक्रमण करायचे याचा पूर्ण तपशील महाराजांनी तयार करून फौजेला दिला होता. 

अखेर, तो दिवस उजाडला - गुरुवार मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, शके १५८१ (१० नोव्हेंबर १६५९). महाराजांनी अंगात चिलखत आणि डोक्यावर जिरेटोप घातला होता. शिवाय वाघनखे आणि बिचवा होताच. महाराज आपल्या अंगरक्षकांसमवेत शामियान्याजवळ आले. एक एक अंगरक्षकाने खानाच्या एकेक अंगरक्षकावर नजर ठेवायची असे ठरले. खान आधीच तिथे येऊन बसलेला होता. महाराजांना येताना पाहून तो उभा राहिला आणि समोर आला. महाराजांनी तत्क्षणी ओळखले. पण, त्याच्या दृष्टीने आपण तर एक सामान्य जमीनदार. मग तो उभा राहून समोर येऊन आपल्याला एवढा मान का देत आहे? नक्कीच त्याच्या मनात काळेबेरे आहे. तो दगलबाज आहे यात शंकाच नव्हती. आता तर खात्रीच पटली. पुढे होऊन खानाने महाराजांना आलिंगन देण्याच्या निमित्ताने त्यांना बगलेत पकडून त्यांच्यावर कट्यार चालवली. अर्थात, चिलखत असल्याने त्याचा काही उपयोग झाला नाही. तत्क्षणी महाराजांनी आपल्या वाघनखानी खानावर वार केला. तो वार जरी प्राणघातक नसला, तरी खानाला दुखापत झाली, आणि त्याची पकड ढिली झाली. त्याच वेळी संधी साधून महाराजांनी अस्तनीत लपवलेला बिचवा खानाच्या पोटात खुपसला. खानाची आतडी बाहेर आली. त्याच्या आरडा ओरड्याने त्याचे अंगरक्षक आत आले. पण, महाराजांच्या रक्षकांनी त्यांना गाठले आणि गारद केले. इकडे महाराज झपाट्याने प्रतापगडावर निघून गेले. 

इशारतीची तोफ होताच घाटात लपून बसलेले महाराजांचे सैन्य खानाच्या फौजेवर तुटून पडले. घनघोर लढाई झाली आणि खानाचा पूर्ण पाडाव झाला. 

त्यानंतर .... 

त्वरित महाराजांनी पुढील हालचाली सुरु केल्या. कोकणात दाभोळ या बंदरात, अफझलखानाची तीन गलबते नांगरलेली होती. ती ताब्यात घेण्यासाठी महाराजांनी दोरोजी या आपल्या सरदाराला पाठवले आणि ती गलबते ताब्यात घेतली. दुसरीकडे त्यांनी नेताजी पालकर याना थेट विजापूर पर्यंतचा मुलुख काबीज करण्यासाठी पाठवले आणि महाराज स्वत: कोल्हापूर प्रांतात पन्हाळा किल्ल्याच्या दिशेने निघाले. 

अनेक इतिहासकारांच्या मते, वर दिलेला स्वराज्य विस्ताराचा विचार हा आधीपासूनच ठरलेला होता. अफझलखान हा त्यातला एक अडसर होता इतकेच. तो महाराजांनी दूर केला. 

काहीही असो. अफझलखान या स्वराज्यावरील संकटाचा महाराजांनी बुद्धी चातुर्याने आणि शौर्याने सामना करून, पूर्ण पाडाव केला. 

No comments:

Post a Comment