Saturday, November 2, 2024

कहत सदारंग

नियामत खान 'सदारंग' हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातले एक महत्वाचे रचनाकार (त्याला संस्कृतमध्ये वाक-गेयकार असा शब्द आहे) होते. त्यांचा जीवनकाल  १६७० ते १७४८ असा मानला जातो. मोहम्मद शाह रंगीला या मोगल बादशहाच्या दरबारी (१७१९ नंतर), सदारंग याना मोठे स्थान होते. त्यांनी सुमारे दोनशे बडे आणि छोटे खयाल (बंदिश) रचले. त्यांनी प्रेम, भक्ती, निसर्ग, सौंदर्य अशा अनेकविध विषयांवर रचना केल्या. त्यांच्या रचना या तत्कालीन प्रचलित हिंदी बोलीभाषेत असत, आणि त्यातले संदर्भ हे सर्वमान्य आणि लोकप्रिय असत (उदाहरणार्थ, राधा आणि कृष्ण - यांच्यावर आधारीत, गोकुळ गांव का छोरा बरसाने की नार - ही मुलतानी मधली बंदिश). क्वचितप्रसंगी त्यांनी पंजाबी भाषेत देखील काही रचना लिहिल्या.सरळ सोपी भाषा, रचनेतली गेयता आणि शास्त्रीय संगीताची मोठी जाणकारी या गुणांमुळे, सदारंग यांच्या रचना अतिशय लोकप्रिय झाल्या. अगदी आजदेखील सगळ्या घराण्यांतील गायक गायिका, सदारंग यांच्या रचना आवर्जून गातात. त्या काळी, प्रत्येक रचनेत कवी आपले नाव (किंवा टोपणनाव) टाकत असे. त्याला अनुसरून, सदारंग यांच्या रचनांत देखील त्यांचे 'सदारंग' हे नाव टाकलेले दिसते. 

चला तर, सदारंग यांच्या काही बंदिशींवर एक नजर टाकूया. मला कल्पना आहे, विषय फार मोठा (अगदी प्रबंध लिहिण्यायोग्य) आहे. पण मी, माझ्या अल्पमतीला जमेल तसा प्रयत्न करणार आहे. हे एक स्मरणरंजन आहे, शोधनिबंध नाही. 

अनेक रचनांमधले शब्द बदललेले असू शकतील. दोन अडीचशे वर्षांत अनेक गायकांनी अनेक प्रकारे गायलेल्या या बंदिशी आहेत. त्यात काही बदल अपेक्षित आहेत. खाली दिलेल्या रचना या, मी जशा ऐकल्या तशा दिलेल्या आहेत.  

यातील जवळजवळ सर्व रचना गायनस्वरूपात, आंतरजालावर सापडतील. 

१. इतना जोबन पर मान ना करीये - जवळ जवळ प्रत्येक गायन क्लासात शिकवली जाणारी पहिलीवहिली बंदिश.  म नी वर्जित असलेल्या भूप रागातली. जीवनातले साधे तत्वज्ञान तितक्याच साध्या शब्दात कसे मांडले आहे, पहा. 

इतना जोबन पर मान ना करीये, डरिये प्रभू सो आज आली. 

जो कोई आवे अपने घरवा, तासो गर्व ना किजीये, सदारंग यही रीत माने. 


२. जा जा रे अपने मंदिरवा - भीमपलास रागातली ही अतिशय रंजक आणि लोकप्रिय बंदिश. आपल्या प्रियकराकडे (नवऱ्याकडे ?) लाडिक तक्रार करणाऱ्या स्त्रीची भावना यात व्यक्त केलेली आहे. 

जा जा रे अपने मंदिरवा, सुन पावेगी सास ननदीया 

सुन हो सदारंग तुमको चाहत है, क्यूँ तुम हमको थगन दिया 


३. बालम रे मोरे मन के - विहंग किंवा बिहाग रागातली ही अतिप्रसिद्ध बंदिश आहे. परदेशी गेलेल्या प्रियकराच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या प्रेयसीची मनोवस्था इथे वाक्य केलेली आहे.  

बालम रे मोरे मन के चीते होवन दे रे, होवन दे रे मीत पियरवा 

सदारंग तुम जाये बिदेसवा , सुख निंदरिया सोवन दे रे 


४. तू है मोहम्मद शहा दरबार - वर म्हटल्याप्रमाणे, सदारंग हे मोहम्मद शाह रंगीला या मोगल बादशहाच्या दरबारी होते. तेव्हा त्यांनी आपल्या अन्नदात्याचे गुणगान करण्यासाठी काही बंदिशी रचल्या. त्यातलीच ही एकतालात रचलेली बंदिश आहे. 
तू है मोहम्मद शहा दरबार निजामुद्दीन सुजान 
जो ही जो रिझावे सो ही फल पावे सदारंग तोरे गुन गावे 

५. जा जा रे पथिकवा - मिया की तोडी रागातली ही प्रसिद्ध बंदिश. लेकिन या चित्रपटात याचा समावेश होता. विरहाने व्याकुळ झालेली प्रेयसी, एका वाटसरूबरोबर आपल्या प्रियकराला एक निरोप देत आहे. 

जा जा रे पथिकवा मोरे पियासे कही देवो संदेसवा 
उनबिना तुम कहियो जावो रम राखो ध्यायी 
 उनबिना सदारंग अब जली जात छतीया 

६. चुडियां बार बार खनकावी - बागेश्री रागातली ही एक थोडी शृंगारिक बंदिश. 
चुडियां बार बार खनकावी, रे सुरजनवा बलमा तुमरे मिलन कारण तुम बिन छतिया धडकावी 
तन मन धन न्योछावर कर दू, जीवन प्राण सदारंग हरखायी    

७. मोरा रे तुमसंग लागी हो - मारवा रागातली ही रंजक बंदिश आहे. वैशिष्ट्य हे, की स्थायीमध्येच सदारंग हे नाव येते, जे सहसा अंतऱ्यामध्ये येते. 
मोरा  रे तुमसंग लागी हो, मीत पिहरवा प्यारे सुरजनवा के आवो 
बलमा सदारंग मोसे झूठी बतिया करो ना 
घडी घडी पल पल चीन चीन निसदिन 
करत मोसो गुमान करिये 
बलमा सदारंग मोसे झूठी बतिया करो ना 

८. मंदरवा बाजो रे बाजो रे - पुन्हा एकदा, आपला धनी मोहम्मद शहा याचा नामोल्लेख करणारी ही प्रसिद्ध बंदिश, शुद्ध कल्याण रागात आहे.  
  
मंदरवा बाजो रे बाजो रे, कौन घनीरा 
मोहम्मद शहा पिया मन के दरसवा 
सदारंग घर काजो रे 

इथे एक गोष्ट नमूद करतो. साधारणपणे अशीच बंदिश याच शुद्ध कल्याण रागात म्हटली जाते. ती सदारंग यांची नसावी, कारण त्यात त्यांचे नाव नाहीये. ग्वाल्हेर-जयपूर घराण्याचे गायक ही निराळी बंदिश गातात. 
परंतु किराणा घराण्यातले बहुतेक सर्व गायक, ही इथे दिलेली सदारंग बंदिश गातात.

९. गोकुल गाव का छोरा - सदारंग यांना रचना करण्यासाठी कोणताही कोणताही विषय वर्ज्य नव्हता. श्रीकृष्ण आणि राधेचे प्रेम या विषयावर देखील त्यांनी रचना केलेली आहे. मुलतानी रागातला हा बडा खयाल पहा. 
गोकुळ गाव  का छोरा, बरसानेकी नार रे 
इन दोनो मन मोह लियो रे, रहे सदारंग निहारा रे 

तर मंडळी, सदारंग यांच्या रचनांवरील हा ब्लॉग त्यांच्या या सुप्रसिद्ध रचनेने करतो. 

१०. रस भीनी भीनी आये - पुन्हा एकदा, शुद्ध कल्याण याच रागातली ही बंदिश पहा. 
रस भीनी भीनी आये, तेरो नयन का संग जागे 
भार झुके और हार टूटो, जाके जोबन लूटो 
कहत सदारंग 

धन्यवाद. 

स्रोत: आंतरजाल 

No comments:

Post a Comment