तो आणि ती. सांजवेळ झालेली. समोर अथांग सागर... आणि अर्थातच आजूबाजूला चाललेली कलकल. दोघांमध्ये चाललेला मूक संवाद.
थोड्या वेळाने तो शांततेचा भंग करतो.
"किती दिवस अजून?"
"फार नाही, दोन चार दिवस फार तर. एवढी दिवाळी संपू दे रे".
"काय संबंध? पळूनच जायचे तर त्याकरता मुहूर्त कशाला?"
"अरे, दिवाळीची वर्दळ..."
"तुझ्या घरी तर कोणीच नसते ना ग. तू तर एकटीच राहतेस ना तुझ्या फ्लॅटमध्ये".
"भाड्याचा आहे रे तो फ्लॅट.... . पण तुझ्या घरी तर इतके लोक..."
"मी काही तरी कारण काढून बाहेर पडू शकतो. पुरुष आहे मी. मला कोणी झापणार नाही".
"असू दे हां. लगेच टोमणा नको".
तो हसला.
"आणि येताना काय आणशील? सामान सुमान तर नाही आणता येणार तुला".
"नेसत्या वस्त्रांनिशी येतो. मी आलो की आपण टॅक्सी करून स्टेशनवर.."
"शू . हळू बोल."
"का? समुद्राला कान असतात का?"
"पण आज नक्की ना?"
"हो नक्की. पण तुझा फ्लॅट सापडणे कठीण. तुमची कॉलनी खूप मोठी आहे, आणि सगळ्या इमारती एकसारख्या. त्यावरचे नंबर्स पण नीट दिसत नाहीत."
"माझ्या बाल्कनीत मी तो आकाश कंदील लावून ठेवला आहे - जो तू श्रीलंकेतून माझ्याकरता आणला होतास, अगदी यूनिक आहे त्याचे डिझाईन".
"ठीक आहे. रात्री दहा नंतर येतो".
*****
रात्री साडे अकरा चा सुमार. खरेतर उशीरच झाला होता. तो झपाझप तिच्या कॉलनीकडे चालत होता. कॉलनीत तसा अंधारच होता. कॉलनी नवी असल्याने आत फारसे दिवे देखील लागले नव्हते. क्वचित एखाद्या फ्लॅटमधील ट्यूबलाईट चमकून जात होता. दूर कुठेतरी कुत्रे भुंकत होते. मध्येच एखादा दारुडा बरळत जात होता. 'एकदा दारू प्याल्यावर सगळे सारखेच वागतात - सुटाबुटातले काय, आणि चिंध्या नेसलेले काय' तो विचार करत होता. खरेतर, तो असले फालतू विचार करून आपली भीती बाजूला सरायचा प्रयत्न करत होता. निर्मनुष्य रस्ता. अंधार गुडुप्प. कोणी आपला पाठलाग तर करत नसेल ना? खिशात, रेल्वेच्या तिकिटांपुरते पैसे होते. पण, पण एखादा चोर आला समोर, तर त्याला काय माहित हे? तो धरेलच आपल्याला. त्याला घाम फुटला.
किती वेळ तो चालत होता कोण जाणे. तिच्या घरी तो एकदाच आला होता, तो सुद्धा दिवसा. रात्रीच्या वेळी तिचा फ्लॅट असलेली इमारत कशी काय सापडणार? आकाश कंदिलाची खूण होती म्हणा. त्याची नजर पहिल्या मजल्यावरच्या आकाश कंदिलांकडे भिरभिरत होती.
अखेर त्याला तो आकाश कंदील दिसला. तोच तो, श्रीलंकेतून आणलेला. खरे तर श्रीलंका ही आकाशकंदिलांसाठी कधीच प्रसिद्ध नव्हती. पण त्याला तिथे दिसलेला हा कंदील आवडला होता. वेगळे डिझाईन म्हणून. त्याच्या हृदयाने हुश्श केले. सापडली. आय मीन, सापडला तिचा फ्लॅट. त्याने हलकेच समोरचे लोखंडी फाटक उघडले. त्याचा बारीक करकर आवाज झाला. तेवढ्या आवाजाने देखील तो दचकला. पुढे जाऊन तो विचार करू लागला. लिफ्टने जाऊ? नको. आवाज होईल. त्यापेक्षा चालत चढतो. एकच मजला तर आहे. पण मग पावलांचा आवाज झाला तर? त्यात काय? मांजराच्या पावलाने चढतो. पुन्हा फालतू विचार. शेवटी तो तसाच चालत वर चढला.
जिन्यातून गेल्यावर डावीकडचा पहिलाच फ्लॅट. त्याच्या लक्षात होतं. तो डावीकडे वळला. फ्लॅटचे दार उघडेच होते. स्मार्ट मुलगी. बेलचा आवाज होईल म्हणून तिने दार उघडेच ठेवले होते. तो दार लोटून आत शिरला आणि लगोलग दार बंद करू लागला. त्याच्या लक्षात आले, आत पूर्ण अंधार होता. दार बंद करून तो अंधारात चाचपडत दिव्याचे बटन शोधू लागला. एवढ्यात त्याला एका हाताचा स्पर्श जाणवला. त्यानेही तो हात पटकन धरला. एवढ्या धावपळीनंतर, जीवाच्या उलघाली नंतर त्या परिचित हाताच्या स्पर्शाने त्याला केवढा तरी दिलासा मिळाला होता.
अरेच्या. तिचा हात एवढा केसाळ? आणि हाताची पकड एवढी मजबूत?
"काय? पळून जाणार होतास ना?" एक पुरुषी आवाज. त्याला त्याच्या एका प्रश्नाचे उत्तर मिळाले. आणि अनेक प्रश्न देखील निर्माण झाले.
"कोण? कोण आहेस तू?"
"ते महत्वाचे नाही. ती मुलगी मला आवडलेली. मी फिल्डिंग पण लावली होती. एरवी दिसायला, बोलायला तसा डिसेंट माणूस आहे मी. तिला सहज पटवू शकलो असतो. पण तू मध्ये टपकलास. तेव्हा आता तुला माझ्या मार्गातून बाजूला करणे भाग आहे, ते सुद्धा, तुम्ही पळून जायच्या आधी".
हळू हळू त्याच्या लक्षात येऊ लागले होते.
"पण आम्ही आज पळून जाणार होतो ते... "
"मला कसे समजले? सोपं आहे. समुद्राला कान नसतात, पण किनाऱ्यावर बसलेल्या माणसांनां तर असतात ना? मी म्हणालो तसे, मी सतत फिल्डिंग लावून होतो. तुमच्या बाजूलाच बसलो होतो".
"पण मग तू तिच्या फ्लॅट मध्ये काय करतोयस? की तू तिचाही निकाल..."
"मूर्खा, तिला हासील करायची आहे मला. तिच्या केसालाही धक्का लावणार नाही मी".
"पण हा फ्लॅट?"
"माझा आहे. ती अजून पुढच्या इमारतीत राहते"
"पण मग हा आकाश कंदील?"
"श्रीलंकेत काय आजपर्यंत तू एकटाच गेला आहेस का रे, फुल्या फुल्या? मी नाही जाऊ शकत श्रीलंकेला ?"
..
त्याच्या तोंडातून फक्त एक अस्फुट किंकाळी बाहेर पडली.
No comments:
Post a Comment