Friday, March 13, 2026

माझा संगीत नाटक प्रवास: नांदी

 माझा संगीत नाटक प्रवास: नांदी 

सर्व नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून, सहर्ष सादर करत आहे - 

संगीत नाटक (आणि नाट्य संगीत) ही माझ्या मर्मबंधातली ठेव आहे. कळायला लागल्या पासून (कदाचित त्याही आधीपासून) मी नाट्यसंगीत ऐकत आलो आहे, आणि संगीत नाटके पाहत आलो आहे. आमच्या घरी आई वडिलांना या दोन्ही गोष्टींची अतोनात आवड होती. रेडिओ वर रोज नाट्य संगीताचे कार्यक्रम (नाट्य पराग वगैरे) ऐकले जायचे. आणि संगीत नाटक? 

कल्पना करा, नाट्यगृहातले दिवे मंद होत चालले आहेत. तबला आणि ऑर्गन दोन्हींचा ताळमेळ जमलेला आहे. मखमली पडदा हळूहळू बाजूला सरकत आहे. अशावेळी ऑर्गनच्या भरदार आवाजात रसिकांच्या कानी पडणारा तो नांदीचा स्वर - आपली तर शरण चिठ्ठी लिहून गेलेली आहे इथे. माझ्या प्रस्तावित नाट्य प्रवासाची ही नांदीच आहे असे समजू.

ठाण्यात त्यावेळी बंदिस्त नाट्यगृह नव्हते. नाट्यप्रयोग बहुतेक वेळा मो ह विद्यालय किंवा न्यू इंग्लिश स्कुलच्या खुल्या रंगमंचावर होत असत, अर्थात पावसाळा सोडून. पण त्याची कसर भरून काढायला की काय, आम्ही दादरला शिवाजी मंदिरला जाऊन अनेक नाटके पाहिलेली आहेत (क्वचित पुण्याला बाल गंधर्व), आणि शेवटची गाडी देखील चुकवलेली आहे. अनुभवलेल्या नाट्यानंदाची उजळणी अनेक वेळा दादरच्या निर्मनुष्य प्लॅटफॉर्मवर झालेली आहे.

माझ्या आठवणीप्रमाणे मी पाहिलेली पहिली संगीत नाटके - अनुक्रमे - मृच्छकटिक, मंदार माला, सौभद्र आणि संशय कल्लोळ. यापैकी पहिली दोन शिवाजी मंदिरला, आणि नंतरची दोन ठाण्याला मो ह विद्यालयात. आणि योगायोग असा की, या चारही नाटकांत, प्रमुख भूमिकेत संगीत भूषण राम मराठे हेच होते, आणि वर्गांवर पंडित गोविंदराव पटवर्धन. मला वाटायचे की, बहुधा गोविंदराव हे एकमेव ऑर्गन वादक असावेत. अर्थात, तो समज नंतर दूर झाला. तुळशीदास बोरकर, विष्णुपंत वष्ट, चंद्रचूड असे अनेक मोठे ऑर्गन वादक मी नंतरच्या काळात पाहिले (खरे तर ऐकले). 

राम मराठे हे ठाण्याचे रहिवासी, आणि माझ्या वडिलांचे परिचित. त्यामुळे त्यांचा उल्लेख नेहमी रामभाऊ मराठे असाच मी ऐकत आलो. तसे तर, रामभाऊ, वसंतराव, छोटा गंधर्व ही मंडळी मला कधी परकी वाटलीच नाहीत. 

तर, संगीत मृच्छकटिक.  माझ्या आठवणीप्रमाणे, त्यात मीनाक्षी बाई (यमुनाजळी खेळू फेम), मास्टर दत्ताराम अशी खाशी मंडळी होती. त्यावेळी मला, त्या नाटकाचे कथानक, रामभाऊ म्हणजे कोण, त्यांची गायकी- याबद्दल काहीही माहित नव्हते. तेवढे माझे वयदेखील नव्हते. पण, त्या धीरोदात्त चारुदत्ताच्या भूमिकेत रामभाऊंनी एन्ट्री घेतली मात्र, आणि - सार्थची ते वदती, सौख्य मानुनी बहू, तेचि पुरुष दैवाचे, रजनीनाथ हा - अशा एकाहून एक गाण्यांची उधळण झाली. मी थक्क होऊन ऐकत राहिलो.आजवर रेडिओवर ऐकलेली गाणी प्रत्यक्ष रंगमंचावर इतकी सुरेख कशी काय वाटतात? याचा विचार करता करता, नाटक संपले सुद्धा. आता फार काही आठवत नाही, पण लक्षात राहिलेल्या दोन गोष्टी - एक म्हणजे, चारुदत्त आणि वसंतसेनेला त्रास देणारा तो खलनायक शकार, आणि, ज्याने कधी लता वेलींवरची फुले देखील खुडून काढली नाहीत तो स्त्रीचा वध कसा काय करेल? अशी अवस्था झालेला, वधस्तंभाकडे चाललेला वसंतसेना घातकी चारुदत्त. 

त्यानंतर कधी हे नाटक परत बघण्याचा प्रसंग आलाच नाही. त्याचे फारसे प्रयोगही झाले नाहीत. पण, रंगमंचावर पाहिलेला पहिला वहिला नाट्यप्रयोग म्हणून तो सदैव स्मरणात राहील एवढे नक्की.

धन्यवाद.


No comments:

Post a Comment