कार्तवीर्य जरासे हसून म्हणाले, "सांग, काय म्हणत आहेत आपले मित्र भार्गव?"
"महाराज, ते आपले मित्र... "
"आहेत की नाहीत ते नक्की नाही असेच ना?"
"होय महाराज. आपल्यावर कुरघोडी करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. गेल्या महिन्यात आपण केलेला प्रस्ताव देखील त्यांनी ... "
"फेटाळून लावला असेच ना? माहित आहे. पण तू गेला होतास त्याचे काय झाले?"
"काय होणार महाराज? त्यांनी काहीही ऐकून घेतले नाही. आणि आजकाल ते भार्गव कोणालाही घाबरत नाहीत."
"कारण?"
"महाराज, त्यांच्यातला तो परशुराम".
"त्याचे काय?"
"महाराज, तो ब्राम्हण असून देखील शस्त्रविद्या जाणतो. पूर्ण पारंगत आहे. आणि तो इतर ब्राह्मणांना देखील शस्त्रविद्या शिकवत आहे. एकूणच हे भार्गव प्रबळ होत चालले आहेत. आणि यावेळी मी एकटाच गेलो होतो. फार काही बोलू पण शकलो नाही".
"हं समजलो. आपले हैहय राज्य आणि हे भार्गव. यांच्यातला संघर्ष काही नवीन नाही. गेली कित्येक वर्षे आपण बघत आहोत. दोन्हीकडून संधी होण्याची शक्यता दिसत नाही. आता पुढल्या वेळेस जाशील तेव्हा आपले सशस्त्र सैनिक घेऊन जा. वेळप्रसंगी उपयोग होईल. "
"होय महाराज."
सुस्कारा सोडून कार्तवीर्य महाराज म्हणाले, "हा संघर्ष लवकर संपुष्टात येवो. निदान त्याला ब्राम्हण - क्षत्रिय संघर्ष असे स्वरूप तरी न येवो. "
****
अनर्त देशातील आपल्या आश्रमात परशुराम आपल्या आवडत्या परशु ला धार काढत होते. तिथे आलेल्या आपल्या मित्राला, विष्णुवर्धनाला ते म्हणाले, "मित्रा, काल तो हैहय राज्यातला दूत येऊन गेला ना? मी इथे नव्हतो त्यावेळी. काय बोलणे झाले?"
"काय वेगळे असणार होते, मित्रा? नेहमीचेच. हे करू नका, ते करू नका. आपल्या प्रदेशात आपण काय करावे हे सांगणारे हे कोण?"
"अरे, क्षत्रिय हे राज्यकर्ते असल्यामुळे, ते असेच वागणार. आपण त्यांना किती सहन करायचे तो आपला प्रश्न आहे."
"पण, आपण तरी काय करू शकतो, राम?"
"काय म्हणजे? आपण ब्राम्हण आहोत, आणि शस्त्रसज्ज देखील. शापादपि शरादपि ... "
"म्हणजे संघर्ष करायचा. मग त्याला ब्राम्हण - क्षत्रिय संघर्षाचे स्वरूप यायला कितीसा वेळ लागणार?"
"विष्णू मित्रा, प्रत्येकाने आपला धर्म ओळखून वागावे हे निश्चितच आहे. पण कोणी अधर्माने वागत असेल, बळजोरी करत असेल, तर त्याला विरोध करणे हा देखील धर्मच आहे. अहिंसा तर मी मानतोच. पण आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी हिंसा करावी लागली तरी ती देखील समर्थनीयच ठरेल, असे मी मानतो".
विष्णूवर्धन काही बोलणार एवढ्यात दुरून एक कुमार धावत आला, आणि सांगू लागला, "गुरुजी, त्या हैहय राजाचे काही सशस्त्र सैनिक आमच्या मठात शिरले होते, आणि त्यांनी... "
त्याला थांबवून परशुराम म्हणाले, "नको सांगूस. मला समजले". विष्णुवर्धनाकडे वळून ते म्हणाले, "मित्रा, आपल्या शेजारी दोन्ही बाजूंना क्षत्रिय राज्ये आहेत. ते लोक क्षत्रिय असले तरी, हैहय राजासारखे दुष्ट नाहीत. त्यांच्याशी चांगले संबंध ठेवणे आवश्यक आहे. या हैहय राजाचे लक्षण काही ठीक दिसत नाही. संघर्ष झालाच तर आपण तसे पुरे पडणार नाही. इतर क्षत्रियांचे साहाय्य लागेल आपल्याला".
*****
माहिष्मती नगरीत, मंत्री महिष्मान, कार्तवीर्य महाराजांच्या महालात महाराजांशी चर्चा करत होते.
"महाराज, या भार्गवांशी कसे वागायचे ते समजत नाही. ते शस्त्रसज्ज तर आहेतच, आणि ते आता इतर क्षत्रिय राज्यांशी देखील संगनमत करत आहेत असे ऐकतो."
"इतर राजांची आपल्याला तितकीशी भिती बाळगायचे कारण नाही, मंत्री महोदय". आपण त्यांच्याशी सहज लढू शकू. पण या भार्गवांना एकदा जरब बसवणे आवश्यक आहे.".
"महाराज, त्यांच्या आश्रमात कामधेनू आहे. आपण जर तिचे हरण केले तर? फार लढाई, हत्या होणार नाही, आणि आपण मनात आणले तर.काहीही करू शकतो असा संदेश देखील त्या भार्गवांना दिला जाईल".
"ठीक आहे, मंत्री महोदय. आजच सैनिक पाठवून हे कार्य करा. फक्त त्या परशुरामापासून जरा सावध रहा".
"काळजी नसावी, महाराज. तो आश्रमात नसेल तेव्हाच..."
"ठीक आहे. विलंब नको".
*****
"राम, राम... " विष्णूवर्धनाच्या हाका ऐकून परशुराम भानावर आले. इतका वेळ ते सूर्यदेवतेचे ध्यान करत होते.
"राम, घात झाला. हैहय राज्याचे सैनिक आपल्या आश्रमात शिरले होते. त्यांनी आपली कामधेनू पळवून नेली. आणि.... "
"आणि काय, विष्णू?" क्रोधाविष्ट होऊन परशुराम म्हणाले.
"आश्रम वासियांनी जेव्हा विरोध केला, तेव्हा त्या सर्वांची हत्या... "... विष्णूला पुढे बोलवेना.
परशुरामांच्या क्रोधाला पारावार राहिला नाही.
"चल विष्णू, आपल्या मित्र राजांना संदेश पाठवायचा आहे. त्यांचे आपले भार्गव सैन्य गोळा करून माहिष्मती वर युध्द करायचा माझा मानस आहे".
"पण राम, एकदम युद्ध? आपले काही लोक....".
"त्या नीच हैहय लोकांनी निरपराध ब्राह्मणांची हत्या करून अधर्म केला आहे. त्यांना शासन झालेच पाहिजे. हैहय वंश आणि त्यांना सहाय्य करणाऱ्या एकही क्षत्रिय राजाच्या वंशातला एकही सबल क्षत्रिय पुरुष जिवंत राहता काम नये. हा अधर्म, ही हत्या ... ही एक अनिष्ट प्रवृत्ती आहे. तिचा समूळ नाश व्हायला हवा".
*******
हैहय - भार्गव यांच्यातले प्रदीर्घ युद्ध थांबले होते. हैहय आणि त्यांना सहाय्य करणारे लहान मोठे असे एकूण एकवीस क्षत्रिय राजे नामशेष झाले होते. परशुरामांच्या क्रोधाग्नीमध्ये एकवीस आहुती पडल्या होत्या.
परशुराम आणि त्यांचा परममित्र विष्णुवर्धन, महेंद्र पर्वताकडे वाटचाल करत होते.
"राम, एवढे मोठे युद्ध लढलास. एवढा नरसंहार झाला. त्याबद्दल आता तुझ्या काय भावना आहेत?"
"मित्रा, माझा क्रोध आता शांत झालेला आहे. माझे मन आता वैराग्याकडे झुकले आहे. म्हणूनच मी आता तपश्चर्या करावी या हेतूने महेंद्र पर्वताचा मार्ग धरला आहे".
"एकवीस राज्यकर्ते नामशेष झाले आहेत. त्या राज्यांना आता कोणी कर्ता राहिला नाही."
"मित्रा, कोणत्याही अधर्माने वागणाऱ्या, आणि त्याला सहाय्य करणाऱ्या क्षत्रियाचा नाश करणे हाच धर्म आहे. ते राजे आपल्या कर्माने मेले".
"आणि त्यांची राज्ये... ".
"मला राज्य किंवा भूमी संपादन करण्याची लालसा कधीच नव्हती. जी भूमी जिंकली ती आता मी कश्यप मुनींना दान केली आहे. त्याचे पुढे काय करायचे ते मुनिवर्य ठरवतील."
"पण राज्यकर्ते... "
"जे क्षत्रिय मारले गेले त्यांचे वंशज पुढे राज्य करतील".
"आपल्या काही हितशत्रूंनी असा प्रचार सुरू केला आहे, की परशुरामांनी संपूर्ण पृथ्वी नि:क्षत्रिय केली आहे".
"हे अर्थातच असत्य आहे. एक तर असे करणे हे अयोग्य ठरेल. सगळेच क्षत्रिय राजे काही दुष्ट किंवा अन्यायी नाहीत. जे तसे होते त्यांना मी शासन केले. निरपराध लोकांना मारण्या इतका अविवेकी नाही मी".
"पण राम, पुढल्या सगळ्या पिढ्या असेच म्हणतील ना?"
"मला नाही तसे वाटत. ज्यांना थोडी फार बुद्धि आणि विवेक आहे, ते नक्कीच यावर विश्वास ठेवणार नाहीत. एकदा पृथ्वी नि:क्षत्रिय झाल्यावर देखील अजूनही क्षत्रिय राजे आहेतच की. याचा अर्थ, तो प्रचार मुळातच चुकीचा आहे.
असो. माझी आता महेंद्र गिरीकडे प्रस्थान करण्याची वेळ झाली आहे.
निघतो".
"शुभास्ते पंथान: संतु " विष्णुवर्धन हात जोडून म्हणाला.
परशुराम महेंद्र गिरीकडे जाऊ लागले.
No comments:
Post a Comment