Thursday, January 18, 2024

काही कविता..

१.  माझ्या एका मित्राने मला वडा पाव या विषयावर काही कविता पाठवल्या होत्या... 

तुझी माझी धाव आहे वड्यापासून पावापर्यंत.... वगैरे.

त्यावर मी खालील काव्य लिहिले (विंदा करंदीकर यांची माफी मागून)..


माझ्या मना, हाण रग्गड.

हा पाव फुकट आहे,

फुकट आहे तो वडा

फुकट चटणी त्यावरची,

फुकट्यात आहे ही मिरची.


दिवस रात्र इथे येतात 

खाणाऱ्याचे लाखो थवे

तिखटजाळ वडा खाऊन

डोळ्यापुढे काजवे दिवे

तरी सवय सुटत नाही,

जित्याची खोड जात नाही

पाव हलका, वडा जड,

माझ्या मना हाण रग्गड.


हा रस्ता अटळ आहे 

अटळ आहे हा वास 

टाळू पाहता टळणार नाही 

छातीमध्ये अडकेल श्वास 

पाठ फिरवून जाशील तर 

पाय फिरतील मागेच मग 

म्हणून म्हणतो, डोळे उघड, 

माझ्या मना, हाण रग्गड 


वडा पाव घातक आहे 

सांगतील डॉक्टर शपथेवर 

चरबी आणि कोलेस्टेरॉल 

कार्ब्स वाढतील ढेरीवर 

ऐकू नको त्यांचा स्वर 

कानावरती हात धर

भिऊ नकोस, आगे बढ

 माझ्या मना, हाण रग्गड 


हा रस्ता अटळ आहे,

हा वडापाव रग्गड आहे,

खाणाऱ्या, खाशील किती,

मागणी तरी करशील किती

पोटाला मग लागेल तड..

माझ्या मना हाण रग्गड.

- नरेंद्र जोशी.


२. 

काल वाचलेले ग्रेस यांच्या कवितेचे रसग्रहण (की रसास्वाद ?) म्हणा, किंवा DST चा परिणाम (किंवा दोन्ही), मला पहाटे जाम झोप येत नव्हती. तेव्हा अस्वस्थ होऊन, मी त्याच कवितेला थोडे सकारात्मक वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. कल्पना अशी आहे की, ती जिवावरच्या दुखण्यातून बरी झालेली आहे, आणि लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे. आणि ती घरी येऊन त्याला भेटणार आहे. तेव्हा तिच्या मनात जे विचार येतात ते, काहीसे असे असतील. मूळ कवितेतली गेयता तशीच ठेवण्याचा प्रयत्न केला हे. (आपापल्या जबाबदारीवर) गाऊन पाहिली तरी चालेल.


भय कसले आता नाही, भेटाया तुजला येते.

आनंदे आता गाते, विस्मरली अपुली गीते.


ती नळी प्राणवायूची, श्वासांत नर्तूनी गेली.

ती धमनी नव रक्ताची, मम हृदयी स्पंदन देते.


तो स्पर्श शल्यकर्त्याचा, आयुष्य वर्धूनी गेला.

ही चादर आता वाटे, जणू की भरजरी शेला.


हलकेच दिसे मज आता, ती नदी, आणखी काही.

पल्याड तरुंची राई, निष्पर्ण राहिली नाही.


 - नरेंद्र जोशी.


३. 

उघड्या पाठीची लावणी. 

'पडला पदर, खांदा तुझा दिसतो' या चालीवर म्हणता आली तर पहा.  


भरल्या ज्वानीला दृष्ट नका लावू, 

राया, गोऱ्या पाठीला हात नका लावू ।


चोळी ल्याले मी कशी गोंडेदार, हो 

खाली पन्हळ शोभे झोकदार 

साज शिनगरा धक्का नका लावू, 

दाजी, गोऱ्या पाठीला हात नका लावू ।


धनी माझं तुम्ही तालेवार, हो 

हौस माझी ऐका एक वार 

नुसत्या नजरेचं जाळं नका लावू,

पावणे, गोऱ्या पाठीला हात नका लावू ।


४.

असे भव्य निर्माण हे मंदिराचे 

जनांच्या मनातील त्या भावनांचे 

वसे राम तो अंतरी अंतर्यामी 

नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ।  


जनी मंदिरी राम तो साठवावा 

मनी मानसी राम तो आठवावा 

जगा जागवावे तयाच्या गुणांनी 

नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ।

No comments:

Post a Comment