राम - माझा आणि तुमचा
प्रथमच सांगतो की, मी तसा अ-राजकीय मनुष्य आहे. राजकारणाचा आणि माझा सुतराम संबंध नाही. २२ जानेवारीच्या निमित्ताने माझ्या विचारांना एक ट्रिगर मिळाला एवढेच.
माझ्या जीवनात रामाचा प्रवेश झाला तो रामरक्षेतून. एकत्र कुटुंबामध्ये, आजी आणि इतर भावंडांसोबत म्हणता म्हणता, वाचता येत नसताना देखील, बुधकौशिक ऋषींनी रचलेली रामरक्षा पाठ झाली. (पुढे शाळेत संस्कृत शिकताना, आदिष्टवान आणि लिखितवान ही कर्तरि प्रयोगाची उदाहरणे म्हणून लिहिताना पुन्हा एकदा रामरक्षा आठवली).
त्यानंतर ऐकले ते बाबूजी सुधीर फडके यांचे गीत रामायण. याने तर मला वेडच लावले होते. प्राथमिक शाळेत असताना, चान्स मिळेल तेव्हा मी वर्गात, घरात, शेजारी पाजारी - 'कुश लव रामायण गाती' म्हणून घेत असे. त्यानंतर आला तो संपूर्ण रामायण हा सिनेमा. तो मी एकूण तीनदा पाहिला. त्यानंतर कितीतरी दिवस मी हातात खेळातले धनुष्य बाण घेऊन, घराभोवती फिरत, खर, दूषण, वाली, कुंभकर्ण, रावण वगैरे शत्रुपक्षाचा वध करत फिरत होतो. राम या व्यक्तिविशेषाने पछाडून टाकले गेलेले पहिले समर्थ रामदास, आणि दुसरा मी.
पुढे या विषयावर मी पुष्कळ वाचन केले. त्यातून काही स्वतः ची मते बनवली. तेव्हा, राम आणि रामायण यावर माझे काही निश्चित असे विचार बनले. ते इथे मांडायचा प्रयत्न करतो.
१. रामाचा जन्म इक्ष्वाकु कुळात झाला. याच कुळात सगर, रघु वगैरे मोठे राजे होऊन गेले. इक्ष्वाकु पासून रामापर्यंत सदुसष्ट पिढ्या होतात. या सर्व पिढ्यांची नावे आणि इतर तपशील हा लिखित स्वरूपात (documented) उपलब्ध आहे. त्यामुळे, 'राम काल्पनिक होता' वगैरे आक्षेप हे चुकीचे ठरतात. काल्पनिक लोकांची इतकी अचूक आणि तपशीलवार नोंद केली जात नाही.
२. रामायण हा मूळ ग्रंथ वाल्मिकी ऋषींनी लिहिला. तेव्हापासून ते अगदी अलीकडे मोरोपंत-वामनपंडित यांच्यापार्यंत, अनेक कवींनी, अनेक भाषांमध्ये रामायण विषयावर आपापले काव्य लिहिले आहे.
३. भारताबाहेर थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया या देशांमध्ये देखील रामायण कथा जाऊन पोचलेली आहे. थायलंड मध्ये तर अयोध्या (उच्चार - अयुध्या) या नावाचे शहर देखील आहे.
४. याव्यतिरिक्त, नृत्य नाट्यादि कला (Performing Arts) यातून देखील राम आणि रामायण जनमानसापर्यंत जाऊन पोचलेले आहे. भारत सोडा, पण बाली बेटांमध्ये केचक नावाचा नृत्यप्रकार असतो. अशोकवनात बसलेल्या सीतेला हनुमान जाऊन भेटतो, आणि तिला खुणेची अंगठी देतो - या कथेवर हा नृत्य प्रकार बेतलेला असतो.
५. एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झालेला, देशकालाच्या सीमा ओलांडून गेलेला, आणि जन मानसाला वर्षानुवर्षे भुरळ घालत आलेला राम, आणि रामायण - हे काल्पनिक असेल असे संभवत नाही. त्यात कुठेतरी सत्याचा अंश हा असलाच पाहिजे.
६. रामावर अनेक आक्षेप घेतले जातात. तो खुज्या व्यक्तिमत्वाचा होता, मर्यादित पुरुषोत्तम होता वगैरे. इथे एक लक्षात घ्यायला हवे की, कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीचे मूल्यमापन हे काळाच्या संदर्भातच करावे लागते. काही हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या व्यक्तींकडे आपण आजच्या काळातल्या चष्म्यातून नाही बघू शकत. राम ज्या काळात होता त्या काळातली समाज रचना, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्ये, विचारसरणी, मानसिकता आणि नीतिमत्ता यांचा विचार केला, तर राम अत्यंत आदर्श आणि लोकोत्तर पुरुष होता. रामाचे विचार आणि वर्तन हे त्या काळाशी सुसंगत असेच होते. तेव्हा, आजच्या काळातील नीतिमत्तेचे मापदंड लावून रामाच्या चुका काढत बसण्याचा उद्योग करू नये.
७. राम हा पूजनीय आहे का? याचे उत्तर, रामाच्या नंतर हजारो वर्षां नंतर श्रीकृष्णाने दिलेले आहे (क्लेशोधिकतरस्तेषां अव्यक्तासक्त चेतासां). म्हणजे, अव्यक्त अशा ईश्वराच्या स्वरूपाचे आकलन सामान्य व्यक्तीला होणे कठीण. त्यासाठी, मूर्तिरूपाची कल्पना पुढे आली. आपणास योग्य वाटेल त्या देवतेची मूर्ती करून, तिची पूजा करणे हाही एक पुण्यकारक मार्ग मानला गेला. त्या दृष्टिकोनातून, राम (जो एक आदर्श आणि सद्गुणांचा समुच्चय होता) हा पूजनासाठी एक अत्यंत उत्कृष्ट देव मानला गेला. शेवटी देव देव म्हणजे तरी काय? जे जे उत्तम, उदात्त, उन्नत - अशा सर्व सद्गुणांचा समुच्चय. रामाचे पूजन म्हणजे त्याच्या सद्गुणांचे पूजन - या दृष्टिकोनातून देखील, राम हा नक्कीच पूजनीय आहे.
असो. समर्थांनी मनाला 'मना सज्जना' म्हटले आहे. त्यांचे मन सज्जन होते. आमचे मन तितकेसे सज्जन नाहीये याची जाणीव आहे. तरीही, आमच्या मनातले काही श्लोक इथे देत आहे.
समुच्चय असे राम तो सद्गुणांचा
करी नाश तो सर्वथा दुर्गुणांचा
असो चित्त द्यावे तयाच्या ठिकाणी
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ।
जनी मंदिरी राम तो साठवावा
मनी मानसी राम तो आठवावा
जगा जागवावे तयाच्या गुणांनी
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ।
No comments:
Post a Comment