Friday, December 16, 2022

जीव

जीव -

आपल्या वाहनाला गंतव्य स्थानाचा संकेत देऊन त्याने बाजूला पडलेला फास जवळ घेतला, आणि एकदा  जरा झटका देऊन तपासून पाहिला. 'गडबड व्हायला नको'.. तो मनाशी म्हणाला. एव्हाना मर्त्य मानवाला घरघर लागलेली होती. नातेवाईकांना फोन करून झालेले होते. अनुभवी मंडळी 'पुढच्या' तयारीला लागलेली होती. 'तो' तिथे पोहोचला होताच. यथावकाश त्याला अपेक्षित संकेत मिळाले, आणि सराईतपणे त्याने फास टाकला. क्षणार्धात मर्त्य मानवाचा जीव फासात अडकला, आणि पार्थिवातून बाहेर पडला. 

बराच वेळ शांततेत गेल्यावर जीव त्याला म्हणाला, "नमस्कार. तुम्ही यमराज आहात ना?". 

तो शांतपणे म्हणाला, "तुला पाहिजे ते नाव दे मला". 

"हो. नक्कीच यम. आमच्या धर्मात असेच सांगितले आहे.खरे तर तुमचे वाहन रेडा असायला हवे. सत्यवान सावित्री सिनेमात तसेच दाखवले होते. पण आत्ताचे तुमचे हे वाहन जरा वेगळे दिसतेय". 

"हूं". त्याने नुसताच हुंकार दिला. 

"आता तुम्ही मला चित्रगुप्ताकडे घेऊन जाणार. मग तो माझ्या पाप पुण्याचा हिशोब करेल. आणि मग मी स्वर्गात जायचे की नरकात याचा निर्णय करेल". 

"तू गरुड पुराण वाचून आलेला दिसतोस". 

"नाही पण असे ऐकले होते देवा". 

"अरे जीवा, स्वर्ग आणि नरक या तुम्ही मानवांनी बनवलेल्या कल्पना आहेत. जगातल्या जवळ जवळ सर्व मानव समूहांत या कल्पना अगदी सारख्याच आहेत. आणि निवाडा करणारा कोण तो म्हणालास..."

"चित्रगुप्त". 

"हो तोच. दुसऱ्या एका मानव समूहात त्याला सेंट पीटर म्हणतात". 

"होय यम देवा. पण हे सगळे खरे आहे ना?"

उत्तर देण्यात त्याला रस नव्हता. 

"तुम्हा मर्त्य लोकांत हा चित्रगुप्त भलताच लोकप्रिय दिसतो. तुमच्या शेजारी राहणारे काही जण तर स्वतः ला चित्रगुप्ताचे वंशज मानतात". 

"हो ना देवा. म्हणूनच बहुधा त्यांची आडनावे, चित्रे आणि गुप्ते अशी असतात". 

"अरे जीवा, मर्त्य लोक सुटला, पण अजून तिथल्या फालतू सवयी मात्र सुटल्या नाहीयेत तुझ्या. आडनावे, त्यावरून त्या त्या लोकांबद्दल समजुती करून घेणे..". 

"सॉरी देवा. रागावलात?"

"राग, लोभ वगैरे तुमच्या भावनांबद्दल बोलत असशील, तर नाही. आम्हाला तश्या भावना माहित नाहीत".

"भावना नाहीत? म्हणजे आमच्या भावना खोट्याच की काय?"

"तुमच्या भावना म्हणजे तुमच्या मेंदूत चालणाऱ्या रासायनिक प्रक्रियांची परिणती आहे". 

"हो बरोबर. म्हणूनच केमिकल लोच्या हा शब्द प्रयोग आला". 

"आम्हाला तुमच्या सारख्या भावना नाहीत.  पण नीर क्षीर विवेक मात्र आहे". 

"म्हणजे नीतिमत्ता वगैरे.. बरोबर?"

"नीतिमत्ता! नीतिमत्तेचे मापदंड, कसोट्या हे सगळे तुम्हा मर्त्य मानवांचे खेळ आहेत.... जे सतत स्थल कालाप्रमाणे बदलत राहतात". 

"मग तुमच्यात हे असं ... "

"असतं ना. पण आमचे मापदंड हे त्रिकालाबाधित आहेत. कधीही बदलत नाहीत". 

"तुम्ही कोणती भाषा बोलता, देवा?". 

"अरे जीवा, भाषा ही देखील मर्त्य मानवाची संकल्पना आहे. आम्हाला भाषा नाही". 

"नाही? पण मग आपण आता कसे काय बोलतोय?"

"तुम्ही ज्या अर्थाने बोलणे म्हणता, त्या अर्थाने आपण बोलताच नाही. आपण... आपण विचारांची देवाण घेवाण करत आहोत". 

"पण कशी? कोणतेही माध्यम नसताना..."

"आपले विचार एकमेकांना कळत आहेत ना? मग झालं तर". त्याने उत्तर देण्याचे टाळले. 

थोडा पॉझ घेऊन जीव म्हणाला, "परवा पलीकडच्या घरातला एक मनुष्य वारला. अति श्रीमंत होता". 

"माहित आहे ना. काय उपयोग झाला त्याच्या श्रीमंतीचा?  त्याने देखील शेवटी तसेच आचके दिले होते मिस्टर, जसे तुम्ही दिलेत. काही फरक नाही". 

"मी आचके दिले? मला नाही जाणवले". 

"जस जसा मृत्यू जवळ येतो, तशी मेंदूची संवेदना कमी होत जाते. अखेरच्या क्षणी तुम्ही काय करता, याची तुम्हाला जाणीव होत नाही". 

"हो बर. मी उगाचच घाबरत होतो मृत्यूला"

"घाबरायचं काय त्यात? अटळ आहे ते. जातस्य हि धृवो मृत्यू.. असं तुमचे भगवंतच म्हणाले आहेत ना?"

"आमचा भगवंत म्हणजे? तुमचा भगवंत वेगळा आहे की काय?"

"तुम्ही निर्माण केलेला, आणि मानलेला भगवंत, तो तुमचा भगवंत". 

"आम्ही निर्माण केला? देवा, मघापासून ऐकतो आहे. आपण सारखे म्हणत आहात - तुमची भाषा, तुमच्या भावना, तुमचा भगवंत"

"हो. बरोबरच आहे. तुमची सृष्टी ही तुम्हीच निर्माण केलेली आहे. दुसऱ्या कुणीही नाही". 

"मी समजलो नाही, देवा". 

"एवढेच नाही, तर प्रत्येक मानवाची सृष्टी ही मानव-सापेक्ष असते". 

"म्हणजे?"

"तुला दिसणारे जग, हे तुझी पंचेंद्रिये आणि तुझा मेंदू, यांना जाणवलेले जग आहे. तुला जसे जग दिसते तसे दुसऱ्या कोणालाही दिसणार नाही. प्रत्येक मानवाचे जग त्याचे स्वतःचे, त्याला जाणवणारे असेच असते. म्हणून म्हणालो, हे सर्व व्यक्ती-सापेक्ष आहे. पूर्णपणे निरपेक्ष असे या जगात काहीच नाही". 

"हं. म्हणजे या सगळ्या जगाला काही अर्थच नाही? सगळं मायावी आहे?"

"ते तूच ठरव. मी फक्त सांगितलं". 

थोडा वेळ शांततेत गेला. 

"देवा, माणूस मरणार आहे, याची सूचना तुम्हाला कशी काय मिळते?" मर्त्य जीवाने विषय बदलला. 

"तशी यंत्रणा आहे आमच्याकडे". 

"पण कोण मरणार आणि कधी.. हे कोण ठरवतं? तुम्ही?"

"मी नक्कीच नाही. पण मला तशी सूचना मिळते". 

"पण मग मरणारा माणूस जर दुसऱ्या धर्माचा असेल आणि तो तुम्हाला मानत नसेल तर.... "

"धर्म... ही संकल्पनाच मुळी तुम्ही मर्त्य मानवांनी निर्माण केलेली आहे. आपल्याला ते काही समजत नाही. कोण, कधी, आणि कुठे... एव्हढी माहिती मिळाली की बस्स. आपला फास तर तयारच असतो". तो जरा मोकळेपणाने बोलू लागला. 

"पण मग, एकाच वेळी हजारो माणसे मेली तर?"

"होतं ना असं. मागे हिरोशिमामध्ये झालंच होतं ना? तुम्ही लोक ओव्हर टाइम म्हणता तसा केला होताच ना मी".  

"बरं.. आता आपण कुठे जाणार आहोत? अजून किती लांब? किती वेळ लागेल? चित्रगुप्त... "

"स्थळ - काळ... या मर्त्य मानवाने सोयीसाठी निर्माण केलेल्या संकल्पना आहेत. आता आपण जिथे आहोत तिथे या सगळ्याला तसा काही अर्थ नाही. त्यामुळे मी तुला सांगितले तरी ते तुला आकलन होणार नाही. एवढेच सांगतो की, एका ठराविक मर्यादेपर्यंत तू माझ्याबरोबर जाणार आहेस". 

"आणि पुढे?"

"मला सांगता येणार नाही. किंबहुना सांगण्याची अनुमती नाही". 

"पण मग... "

"त्या मर्त्य मानवाच्या देहात तू होतास. त्यापूर्वी तू कुठे होतास? कुठून आलास? काही आठवतं?"

"नाही ना हो देवा". 

"तुझा भूतकाळ आणि भविष्य काळ यामध्ये एक पडदा आहे. नियतीने तो जाणून बुजून घातलेला आहे. त्याच्या आरपार बघण्याचा प्रयत्न करू नकोस. अन्यथा निराशाच पदरी पडेल". 

"हे मला आधी का समजले नाही?"

"बहुतेक सर्व मर्त्य मानवांची हीच अवस्था आहे. ते भूतकाळात तरी जगतात, नाहीतर भविष्य काळात". 

जीव गप्प झाला. 

"असो. तू फार प्रश्न विचारतोस. माझ्या सीमेपर्यंत आपण केव्हाच आलेलो आहोत. मला आता जायला हवं. त्या कुठल्याशा दोन देशांमध्ये युद्ध सुरु झाल्याची सूचना आहे. म्हणजे आज पुन्हा ओव्हर टाइम.. चलो. जातो मी. तू याच मार्गाने पुढे जात रहा". 

तो दिसेनासा झाला. 


© नरेंद्र जोशी


No comments:

Post a Comment