Saturday, December 24, 2022

संभवामि युगे युगे

.. अलार्मच्या आवाजाने तो भानावर आला. एयर बेसच्या बराकीत गडबड चालू होती. एयर रेडची तयारी... टार्गेट्स लोकेट झाली होती. आता फक्त उड्डाण करायचे आणि टार्गेटवर बॉम्ब आणि गोलियोंकी बौछार. त्याची ही पहिलीच खरीखुरी रेड असणार होती. त्यापूर्वी सरावासाठी अनेक रेड्स मारल्या होत्या. सर्वोत्कृष्ट ट्रेनी फायटर पायलट म्हणून त्याचा गौरव देखील झालेला होता. 

तरी पण.. तरी पण काहीतरी बिनसलं होतं त्याचं. तो अस्वस्थ होता. त्याच्या हालचाली मंद होत होत्या. फायटरचा गणवेश चढवायला इतका वेळ? आजपर्यंत कधीही असं झालं नव्हतं. काय असेल कारण? आत्मविश्वासाचा तर प्रश्नच नव्हता. पहिलेपणाचं टेन्शन? नोप. मरणाची भीती? कधी नव्हतीच मुळी. घरच्यांची काळजी? घर, संसार यावर तर तुळशीपत्र ठेवलेलं. मग आता काय? आज हात का थरथरत आहेत? सर्व गात्रे जणू गलितगात्र होऊन निष्क्रिय झाली आहेत. घशाला कोरड पडते आहे. 

"अच्छा. म्हणजे, सीदन्ति मम गात्राणि, मुखं च परिशुष्यति - असंच ना?"

कोण बोललं हे बघायला तो मागे वळला. 

"विंग कमांडर दण्डायुद्धपाणी - उर्फ दंडा. लांबलचक नाव आहे". स्मित करून तो ऑफिसर म्हणाला. सहा फूट उंची, सावळा वर्ण, पिकू लागलेले केस. चेहऱ्यावर करारी भाव - जे सैन्यातील या पोझिशनला येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर हमखास असतात - तरीही कुठेतरी मैत्रीचा, एक चार पावसाळे जास्त पाहिल्याचा भाव. 

"कालच इथे आलो, आणि टिळक कडून चार्ज घेतला. त्याला अर्जंट मीटिंगसाठी दिल्लीला जावं लागलं".

त्याचा प्रश्नार्थक चेहरा पाहून दंडा पुढे म्हणाले, "टिळक आणि मी एकाच बॅचमधले, आणि एकाच रँकचे अधिकारी. अरे तुरे करायच्या लेव्हलचे".  

त्याने कडक सॅल्यूट केला. 

"आताच्या रेडची जबाबदारी माझी आहे. तुझ्याकडून उशीर का होतोय , ते बघायला आलोय. तुझा तर अगदीच अर्जुनविषादयोग झालाय असं दिसतंय. ". 

"काही नाही सर, विचारात गढलो होतो". 

"कसला विचार?"

"तुम्ही ओळखलात ना ऑलरेडी तो विचार?"

"ओह. पण.. का बरं हा विचार? तो सुद्धा आत्ता या क्षणी?"

"हेच की - आता मी उड्डाण करणार, टार्गेटला हिट करणार, ते नष्ट करणार .."

"बरं मग? ही तर ऑर्डरच आहे. दगडावरची रेष. फॉलो इट ". 

".. आणि तिकडची माणसं पण मरणार". 

"अर्थातच. त्यात काय विशेष? ही लढाई आहे."

"हो पण.."

"तुझी तयारी नव्हती का हे सगळं फेस करायची? तुझं सिलेक्शन झालंच कसं इकडे फॉरवर्ड एरियामध्ये"? रागावर ताबा ठेवत दंडा म्हणाले. 

"तसं नाही सर. पण ती मरणारी पण माणसेच आहेत माझ्यासारखी". तो हलक्या आवाजात बोलला. 

"तुझं बोलणं तुला ऐकू येतंय का, एअर मन? अरे, ही लढाई आहे. तू सैनिक आहेस, आणि तो तिकडचा पण सैनिक आहे. तू तुझ्या मातृभूमीची सेवा करतोयस, आणि तो त्याच्या. तुझ्याकडे बॉम्बर आहे, तर त्याच्याकडे अँटी एयर क्राफ्ट गन. It's a fair game. भावना वगैरे आलीच कुठून इथे?."

"होय सर. खरं आहे. पण ते लोक कदाचित आपल्याच रक्ताचे..."

"मी समजलो नाही". दंडा मान हलवत म्हणाले. 

"नावावरून आपण दाक्षिणात्य दिसता. नाही समजणार या गोष्टी तुम्हाला... सॉरी. जरा जास्तच बोललो". 

हसून दंडा म्हणाले,"नावावरून आपण किती पटकन गृहीतके बनवतो. माझा जन्म दिल्लीजवळ मथुरेचा, आणि तरुणपण गुजरातमध्ये गेलेले. आणि नावात काय आहे रे? द्याल ते नाव. हजार नावे आहेत आपल्याकडे. बरं, पण दक्षिणेचा काय संबंध इथे?"

"फाळणी उत्तरेत झाली होती. समोरचा माणूस कदाचित आमच्याच गावातला असू शकतो. आमचे बाप, काका, मामा सगळे एकाच बावडीतले पाणी प्यायलेले असू शकतात. केवळ फाळणीमुळे आज एकमेकांसमोर ठाकलो आहोत. आणि आता त्यांच्यावर गोळ्या झाडायच्या... "

"हो, पण याबद्दल समोरच्याला काय वाटतं यावर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. तो असा विचार करतोय का?... आणि विचार करायची वेळ आता निघून गेलेली आहे. आपल्या बाजूने आपण संधी करायचा प्रयत्न केला होता. युद्धाची भाषा समोरच्याने केली". 

"बरोबर आहे ना सर. सगळं बरोबर". 

"आणि, तुझी त्याच्याशी तशी दुश्मनी असायचं काही कारणच नाही. निव्वळ परिस्थिती मुळे ही वेळ आली आहे. एक लक्षात घे, वैयक्तिक पातळीवर आपण कोणीही असू शकतो. परिस्थिती कोणाला कसे वागायला लावील, सांगता येत नाही. आज ते आणि आपण एकमेकांवर बंदुका रोखून उभे आहोत. पण लढाई संपल्यावर आपण एकमेकांच्या सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना गौरवास्पद citation देतोच की. दुश्मनी हे केवळ निमित्त आहे, परिस्थिती आहे". 

"एवढ्या मोठ्या मनुष्य हानीच जस्टिफिकेशन कसं देणार आपण? किंवा कोणीही?"

"कोणाच्याही मृत्यूचं जस्टिफिकेशन देताच येत नाही, माय बॉय. आणि ही तर लढाई आहे" दंडा म्हणाले. 

"पण हे टाळता नाही का येणार?"

"आता टाळणार? कसं ? too late! आणि ही भाषा तुझ्यासारख्या योध्याच्या तोंडी शोभत नाही." दंडा थोडे त्रासले होते. 

"शेवटी हे सगळं कशासाठी? जमिनीच्या एका तुकड्यासाठी?" तो म्हणाला. 

"हो. पण त्या जमिनीच्या तुकड्यावर गवताची काडी देखील उगवत नाही, असे कृपया मला सांगू नकोस". दंडा करारीपणाने म्हणाले. 

"तसं नाही सर" तो नरमाईने म्हणाला, "पण शेवटी जमीनच ना? आणि त्यापायी एवढा नाश,,,"

त्याचे वाक्य अर्धवट तोडून दंडा म्हणाले, "महाभारतचं युद्ध झालं ते एका हस्तिनापूरच्या प्रश्नामुळे. कौरव आणि पांडव, दोन्ही पक्षांना वाटत होते की आपला अधिकाराचा क्लेम बरोबरच आहे. त्यातून हस्तिनापूर हे काही फार मोठे राज्य नव्हते. जमिनीचा तुकडाच, म्हटलं तर. पण त्या एवढ्याशा तुकड्यापायी अठरा अक्षौहिणी सैन्याचा विनाश झाला. त्याचं जस्टिफिकेशन कसं देणार? तो देखील तुझ्यामते विनाकारणच असेल, नाही का?". 

तो निरुत्तर झाला. 

दंडा समजुतीच्या स्वरात पुढे म्हणाले,"नुसत्या जमिनीचा प्रश्न नाहीये हा. देशाचा स्वाभिमान, सार्वभौमत्व, संरक्षण आणि जनमत या गोष्टी देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. आणि त्यांचं रक्षण करणं हे, आणि केवळ हेच आपलं, तुझं आणि माझं कर्तव्य आहे. त्यापायी तुला दुसऱ्याचा, अगदी काका मामांचा सुद्धा जीव घ्यायची वेळ आली तर ते सुद्धा तुला करायलाच हवं."

त्याला पटलंय असं दिसत होतं. 

"एक लक्षात घे, याक्षणी लढाई हेच तुझं कर्म आहे. युद्ध चांगले की शांती, याचा विचार नंतर शांततेच्या काळात पण करता येईल". 

"शांततेच्या काळात, म्हणजे दोन युद्धांच्या मधल्या काळात.." तो पुटपुटला. 

"तसे म्हण पाहिजे तर" दंडा म्हणाले, "पण आत्ता दुसरा विचार नको. पुढे हो, आणि उड्डाण घे. जिंकून परत आलास, तर योद्धा म्हणून गौरवला जाशील. अन्यथा.. सूर्यमंडळ भेदून जाण्याचे पुण्य प्राप्त करून, कायमचा अमर होशील"

त्याने परत सॅल्यूट केला आणि गणवेश चढवला. 

"Godspeed, my boy". असे म्हणून दंडा बाहेर पडले. 

******

रेड संपवून पायलट्स परत बराकीकडे चालले होते. आजची रेड पूर्णपणे यशस्वी झालेली होती. त्यामुळे सगळे जण उत्साहात होते. तो देखील.... बराकीत जाण्यापूर्वी इन-चार्जला रिपोर्ट करणे आवश्यक होते. म्हणून तो त्यांच्या ऑफिसमध्ये शिरला.. आणि थबकला. 

समोर विंग कमांडर टिळक हसत हसत उभे होते. 

"गुड जॉब, my boy. तुझी पहिलीच रेड होती. चांगलं काम केलास. कीप इट अप". 

"सर तुम्ही... "

"हो, मीच, विंग कमांडर टिळक. एवढ्यात विसरलास?"

"कधी आलात आपण परत?"

"कुठून?"

"आपण दिल्लीला गेलेले होतात ना ?"

"मी? कधी? दोन वर्षांपूर्वी होतो म्हणा दिल्लीला" टिळक मिश्कीलपणे म्हणाले. 

"नाही पण,  काल आपण दिल्लीला गेलात आणि विंग कमांडर दंडा  यांनी आपल्याकडून चार्ज घेतला".

"कोण हा दंडा ?"

"दण्डायुद्धपाणी - तुमच्याच बॅच चे अधिकारी आहेत ना?" 

"तुझे डोके ठिकाणावर आहे का?" विंग कमांडर टिळक गरजले. पूर्वी देखील एक टिळक असेच गरजले होते. त्याला पटकन आठवले आणि गम्मत वाटली. 

"मी कुठेही गेलेलो नव्हतो."  टिळक पुढे म्हणाले, "आणि दण्डायुद्धपाणी नावाचा कोणताही अधिकारी माझ्याच काय पण माझ्या आधीच्या आणि नंतरच्या बॅच मध्येही नव्हता. हे नावही मी कधी ऐकलेले नाही. तो इथे येण्याचा प्रश्नच नाही."

तो निरुत्तर झाला. 

"हे बघ", टिळक समजुतीच्या सुरात म्हणाले, "तुला स्ट्रेस आलेला दिसतो, किंवा तुझी झोप नीट झालेली नसावी. असं कर, आत्ता जाऊन विश्रांती घे. तुला एयर फिल्ड वर यायला थोडा उशीर लागला होता. त्यामुळे उड्डाण करायला सगळ्यांनाच उशीर झाला असता, किंवा फॉर्मेशन चुकू शकले असते. त्याबद्दल मी तुला सावकाश कधीतरी जाब विचारणारच आहे. पण आत्ता जाऊ शकतोस." 

सॅल्यूट करून तो बाहेर पडला. 

दण्डायुद्धपाणी - असा अधिकारीच नाहीये. मग तो कोण होता? 

दण्डायुद्धपाणी - म्हणजे ज्याच्या हातात दंड असे आयुध आहे असा तो - बहुव्रीहि समास. त्याला शाळेत शिकलेले व्याकरण आठवले.... म्हणजे.. म्हणजे..विष्णू . आणि तो अधिकारी काय म्हणत होता? मथुरेत जन्मला, आणि आणि तरुणपण गुजरातमध्ये - म्हणजे कदाचित द्वारकेत ??? आणि काय म्हणाला तो? तुम्ही द्याल ते नाव... हजार नावे आहेत आपल्याकडे... म्हणजे विष्णु सहस्र्नाम?

ओ माय गॉड ... म्हणजे *तो* होता? महाभारतातल्या अर्जुनाला केलेला उपदेश त्याने माझ्यातल्या अर्जुनाला केला, आणि माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिली.. माझ्यासारखे अनेक अर्जुन असतील या जगात. त्यांनादेखील असाच *तो* भेटतोच. उगाच नाही, तो म्हणाला होता - संभवामि युगे युगे. 


Ⓒ नरेंद्र जोशी 


No comments:

Post a Comment