Tuesday, May 30, 2023

फुलपाखरू

 फुलपाखरू -

स्टाफ रूम मध्ये आपल्या खुर्चीपाशी येऊन तिने हातातली पुस्तके आणि नोट्स टेबलावर टाकली. आणि खुर्चीवर बसकण मारली. क्षणभर थबकून तिने घड्याळाकडे पाहिले. चलो, निघायला हवं. फास्ट लोकल चुकली की मग घरी जायला उशीर. अर्थात घरी जाऊन तरी काय, कोण आहे तिथे माझी वाट पाहणारे? आणि काम तरी काय? उद्याच्या लेक्चरची तयारी, नोट्स काढणे... काहीतरी बनवून पोटात ढकलणे.. झालं.  संपला दिवस. गेले कित्येक दिवस, कित्येक महिने, वर्षं... अशीच संपलेली आहेत - नीरस, बेचव. 

पाण्याचा एक घोट घेऊन ती आवरा आवर करू लागली. इतक्यात, "काय विद्या बाई, निघालात का?" - देशपांडे सरांचा परिचित आवाज कानावर आला. मान वर करून पाहिले तर सर हसतमुखाने तिच्याकडे बघत, येत होते. 

"काय हे सर, मला अहो जाहो काय करता"?

देशपांडे सर - हेड ऑफ बायोलॉजी डिपार्टमेंट. तिच्यापेक्षा जवळ जवळ वीस वर्षांनी सिनिअर. पण अजूनही ते तिच्याशी बोलताना, तू-तुम्ही याच्या सीमारेषेवरच राहिले होते. 

"सर, तुम्ही रजेवर आहेत ना, महिन्याभराच्या ?" तिने थोड्या आश्चर्याने विचारले. 

"हो. पण माझी संशोधनाची फाईल इथेच विसरलो होतो. ती न्यायला आलो.  Absent minded professor" सर हसत म्हणाले. 

"रजेवर असताना संशोधन, सर?"

"नो नो. संशोधनासाठी रजा". सर पुन्हा हसले. 

"कसलं संशोधन?" काहीतरी विचारायचे म्हणून ती म्हणाली. 

"Metamorphosis. रूपांतर. सुरवंटाचे फुलपाखरात रूपांतर. त्यावर काढलेल्या माझ्या नोट्सची फाईल इथेच राहिली होती". 

रूपांतर.. तिचे विचारचक्र सुरु झाले. सुरवंटाचे फुलपाखरू होते. निसर्गाची किमया. इतक्या लहान कीटकाचे सुद्धा इतक्या सुंदर फुलपाखरामध्ये रूपांतर होते.... नाहीतर आपण.... 

"तुम्ही फार उदास असता हो, विद्या बाई. फार कोणाशी बोलत नाही तुम्ही." सरांच्या शब्दाने ती भानावर आली. 

"अहो, घर आणि कॉलेज. कॉलेज आणि घर. दुसरं काही आयुष्यच नाही तुम्हाला". 

खरं होतं सरांचं म्हणणं. सतत उदास राहणं, बोलणं चालणं नाही... यामुळे एक तुसडेपणा आला होता तिच्यात. 

"कसलं काय आणि कसलं काय". ती पुटपुटली. 

"काय कमी आहे हो तुमच्याकडे? इतक्या शिकलेल्या. प्रोफेसर. तीस म्हणजे काही फार वय नाही". 

तिने सरांकडे प्रश्नार्थक चेहेऱ्याने बघितले. 

"आणि लग्न वगैरे? त्या दृष्टीने विचारही नाही. प्रयत्न तर सोडाच". सर म्हणाले. 

"सर, यापूर्वी नव्हता का विचार केला? काय झालं त्याचं ?"

"पण ... "

"जाऊ द्या सर. एकदा हात पोळल्यावर पुन्हा... "

"प्रयत्न तर करा."

"केला होता की प्रयत्न गेल्या वर्षी. नाही पसंत पडला कोणी". 

"तुम्ही काकू बाई सारख्या राहिलात, तर काका साहेबच येतील तुमच्या वाट्याला". सर स्मित करून म्हणाले. 

"आता या वयात काय? त्यातून मी काही चवळीची शेंग नाहीये. आणि दिसायला चार चौघींसारखी." 

"बरं लग्नाचं जाऊ द्या." सर विषय बदलून म्हणाले, "पण स्वतः साठी तरी, बदल करायला काय हरकत आहे?"

"म्हणजे?"

"दिसणं कोणाच्या हातात नाही. पण रहाणे तर आहे? नीटनेटकं राहायला तर काही हरकत नाही?"

"मला मेकअप करायला जमणार नाही". ती पटकन म्हणाली. 

"मी कुठे म्हणतोय मेकअप करा म्हणून? पण थोडे सौन्दर्याचे संस्कार, थोडं नीटनेटकं दिसणं, थोडे चांगले, आधुनिक फॅशन चे कपडे घालणं, यात तर काही वावगं नाही ना? चवळीची शेंग राहू दे. पण... आपल्या कॉलेजमध्येच जिम आहे. थोडा वेळ तिथे व्यायाम केला तर शरीर आणि मन हलकं होऊ शकतं". 

"काय करायचंय हे सगळं करून?" तिचा चेहरा बोलला. 

सर पुढे म्हणाले, "तुम्ही फार कोणाशी बोलत नाही. मित्र मैत्रिणी नाही. सोशल सर्कल तर दूरच. या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत, विद्या बाई". 

"मला व्हॅट्सऍप वर जायला सांगू नका सर. फार फालतू पणा चालतो तिथे". 

"आपल्या मेंदूमध्ये फिल्टर लावणं आपल्या हातात असतंच की". सरांना वादविवादात निरुत्तर करणे शक्य नव्हते. 

'"आपल्यात सकारात्मक बदल आपणच घडवायचा, विद्या बाई", सर पुढे म्हणाले. 

"सकारात्मक. किती गोंडस, आणि तितकाच गुळगुळीत झालेला शब्द आहे हा, सर." 

" बदल, रूपांतर हा निसर्गाचा नियमच आहे. त्याला विरोध करायला गेलात तर... "

"एवढं सोपं आहे का ते, सर?"

"अहो, साधा सुरवंट घ्या. त्याचे देखील फुलपाखरात रूपांतर होतंच ना? मेटा मॉर्फोसिस... " सरांनी त्यांचा आवडता विषय काढला. 

"मेटा मॉर्फोसिस - त्याच्या स्टेजेस - Larvae, Pupa.. आपणच शिकवतो हे विद्यार्थ्यांना. आणि आपणच विसरतो."

"पण.. "

"आपण, आपल्यासाठी हे बदल करणं जरुरीचं आहे, विद्याबाई. नाहीतर मग आपलं आयुष्य हे असंच वैराण, रुक्ष वाळवंट होऊन जाईल". 

"पण मला हे झेपेल का? उमलण्याचे सुख फिरोनि या फुला सोसेल का?"

"वा. अजून भावगीतं ऐकता वाटतं". सर हसून म्हणाले, "आणि नेमक्या वेळेला नेमके शब्द सुचतात की हो तुम्हाला. अगदीच काही अरसिक नाही तुम्ही". 

"हो म्हणजे.. अधून मधून ऐकते..." ती चाचरत म्हणाली, "पण मला हे उमलणे जमेल का?" तिने आपला मुद्दा सोडला नाही. 

"अहो, उमलून तर बघा.." सर उठून जाता जाता म्हणाले. 

रूपांतर - बदल - निसर्ग नियम .... तिचे विचार चक्र फिरू लागले. 

बाहेर पडताना तिने शिपायाला विचारले, "जिम सकाळी किती वाजता उघडतं रे?"

*******

देशपांडे सर रजेवरून परत कामावर आले होते.  टेबलावरचे पेपर्स चाळत असताना, दारावर टकटक झाली. सरांनी मान वर करून पाहिले, तर विद्या उभी होती. महिन्याभरात किती फरक पडला आहे हिच्यात.... ते मनाशी म्हणाले. कपाळावरची आठी, जाड भिंगाचा चष्मा, अस्ताव्यस्त केस... कशाचा मागमूस नाही आता. चक्क हसतमुख चेहरा, कानात रिंग्स.. आणि डोक्यावर गजरा देखील. 

"ये बस ना". 

"काय सर, तुम्ही वरून आता तू वर आलात" ती हसून म्हणाली. 

"हो. मला वाटतं हा तुझ्या मधल्या बदलाचा परिणाम आहे. किती वेगळी दिसतेस तू आता. एका महिन्यात एवढा बदल. काय झालं तरी काय?" 

"काही विशेष नाही सर. आणि जर का बदल असेलच तर त्याचं श्रेय तुम्हालाच आहे" ती थोडी लाजत म्हणाली. 

"मी समजलो नाही, विद्या". सर थोडे गोंधळले होते. 

"सर, तुम्हीच तर मला हे मेटा मॉर्फोसिस बद्दल सांगितले होते ना?" विद्या म्हणाली. 

"मी? कधी? मी तर रजेवर होतो महिनाभर. " सर अजूनच गोंधळले. 

"सर असं काय म्हणताय? रजेवर गेल्यानंतर तुम्ही एक दिवस परत आला होतात, तुमची फाईल विसरला होतात म्हणून". 

"नाही हो. कसली फाईल? मला नाही आठवत". 

"तुमची फुलपाखरांच्या मेटा मॉर्फोसिस वरच्या संशोधनाची फाईल तुम्ही इथेच विसरला होतात". विद्या खट्याळपणे हसून म्हणाली, "आजपण तुमच्या आठवणीतली एखादी फाईल गहाळ झालेली दिसते.. absent minded professor". 

विद्या चक्क सरांची मस्करी करत होती. 

"तुझा काहीतरी घोटाळा होतोय, विद्या. माझी कोणतीही फाईल हरवली नव्हती. इंटरनेट आणि वर्ड असताना, आजकाल कागदावर कोण लिहितो? आणि मी संशोधन करत होतो. पण फुलपाखराच्या मेटा मॉर्फोसिस वर नाही, तर बेडकाच्या... टॅडपोल वगैरे". 

"पण सर... "

"आणि रजेच्या पहिल्याच दिवशी मी दिल्लीला गेलो तो काल आलो.  तुला कधी आणि कसा भेटणार होतो मी?"

"पण मग, त्या दिवशी माझ्याशी बोललात ते? त्याचे काय स्पष्टीकरण होऊ शकते?". विद्याचा पॉईंट बरोबर होता. 

थोडा पॉझ घेऊन सर म्हणाले, "हे बघ विद्या. मी या विषयातला जाणकार नाही. पण मला वाटतं, तुझ्याशी बोलत होतो, तो मी नव्हेच. ते होतं तुझं अंतर्मन. Sub conscious. लक्षात घे. बदल, रूपांतर हा निसर्गाचा नियम आहे. या ना त्या मार्गानं ते होणारच. तुझे जागृत मन विरोध करत होतं. पण तुझं अंतर्मन? त्या मनाला हा बदल हवा होता. त्या अंतर्मनानेच .... "

"म्हणजे, ते स्वप्न होतं ? की भास?" 

"तुला पाहिजे ते नाव दे." सर म्हणाले. "निसर्ग आणि मन... मानवाने कितीही वैज्ञानिक प्रगती केली, तरी सुद्धा या दोन गोष्टी अजूनही पूर्णपणे उलगडलेल्या नाहीत. मग त्यांच्यावर मात करणं तर दूरच".

क्षणभर कोणीच काही बोललं नाही. 

"थँक यू सर". विद्या मनापासून म्हणाली. "निघते मी. क्लासला घेऊन हॉर्टिकल्चर च्या टूर वर जायचं आहे". 

सर तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत हलकेच हसले. 

सुरवंटाचं फुलपाखरू होऊ घातलं होतं . 


Ⓒ नरेंद्र जोशी 

No comments:

Post a Comment