रंगानुभूती - रंग आणि स्वर. हे दोन निराळे आहेत का? मला वाटतं, दोन्ही एकस्वरूप आहेत. फक्त, आपल्याला त्यांची जाणीव करून देणारी ज्ञानेंद्रिये निराळी. त्यांच्या अनुभूती निराळ्या. तसे असले तरी, या दोन्ही अनुभूतीतून मिळणारा आनंद मात्र अगदी तोच आणि तसाच. रंग आणि स्वर यांच्या द्वैतरूपाकडून अद्वैतरूपाकडे नेणारी, ही संदीप रानडे याची मैफिल होती. इथे संदीपचा एकेरी उल्लेख हा केवळ आपुलकीच्या भावनेतून आलेला आहे. अन्यथा, आदरार्थी अनेकवचन अपुरे पडेल. असो.
मैफिलीची सुरुवात संदीपने पुरिया कल्याण रागाने केली. विलंबित एकतालातील 'आज सोबन' हा बडा खयाल गाताना, त्याने पुरिया मधली हुरहूर आणि कल्याण मधील आनंद या दुहेरी भावना फार सुंदर रीतीने व्यक्त केल्या. त्यानंतर मनरंग रचित 'दिन रैन कछु ना सुहावे' हा छोटा खयाल. यातली गंमत म्हणजे, यातली सम. ही अनाघाती आहे. म्हणजे, समेवर कुठलाच शब्द येत नाही. कछु हा शब्द समेच्या 'धा' च्या किंचित नंतर येते. तसे पाहिले तर, या बंदिशीची सम, ही 'सुहावे' या शब्दातल्या 'हा' या अक्षरावर यायला हवी (तसं म्हणून बघा, हवं तर). पण, मेवाती घराण्यातले बहुतेक सर्व गायक हे, आधी म्हटल्याप्रमाणे (अनाघाती कछु) अशीच सम घेतात. अर्थात, यात चुकीचे काहीच नाही. बंदिश म्हणायची पद्धत वेगळी आहे.
नंतर संदीपने, वीणा वादिनी या कर्नाटकी शैलीतल्या, काहीशा अप्रचलित रागामधली एक स्वरचित रचना सादर केली.
चतरंग - या रचनेमध्ये चार गोष्टी येतात: शब्द, पखवाजाचे बोल, तराणा, आणि सरगम. आणि हे सगळे, एकसंध, एकजिनसी दिसायला हवे. त्यामुळे, चतरंग रचायला खूप कौशल्य असावे लागते. संदीपने मेघ मल्हार रागातली स्वरचित (नादरंग या टोपण नावाने लिहिलेली) चतरंग पेश केली. पर्जन्यकाळातले दृश्य-ध्वनी चित्रच जणू यातून आपल्या डोळ्यासमोर उभे राहिले. संदीप हा केवळ गायक नसून, संगीत रचना करणारा (याला संस्कृत मध्ये वाक् गेयकार असा सार्थ शब्द आहे) देखील आहे, हेच यातून सिद्ध झाले.
एकच राग. परंतु, बहुधा वदन्ति - म्हणजे, एकच बिहाग राग, पण तो निरनिराळ्या स्वरूपात समोर येऊ शकतो. याचा एक आविष्कार संदीपने दाखवला. बिहाग मधली 'लट उलटी सुलझा जा बालम' ही ठुमरी अंगाची बंदिश, आणि त्यानंतर 'या भवनातील गीत पुराणे' हे पटबिहाग रागातले नाट्यगीत (हा सावनी बिहाग होता असेही मला एका जाणकार व्यक्तीकडून समजले).
तदनंतर सादर केलेला, रामदास स्वामींचा अभंग. समर्थ रामदास स्वामी - म्हणजे मनाचे श्लोक असे एक समीकरण आहे. ते अर्थातच अपूर्ण आहे. समर्थांनी काही अभंग देखील रचले आहेत. त्यातलाच एक अभंग 'येथे का रे उभा श्रीरामा'. समर्थ जेव्हा पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेले होते, तेव्हा त्यांना विठ्ठलाच्या रूपात, त्यांचे इष्टदैवत म्हणजे प्रभू श्रीरामच दिसत होते. इथे राम कसा नाहीये, सीता माई कुठे गेली? असे प्रश्न पडणाऱ्या समर्थांना, शेवटी विठ्ठल-राम या द्वैताचा संदेह न रहाता, परमेश्वराच्या अद्वैतस्वरूपाचे आकलन होते, असा काहीसा या अभंगाचा मतितार्थ आहे.
घेई छंद मकरंद. हे नाट्यगीत दोन निरनिराळ्या स्वरूपात सादर केले गेले आहे. 'कट्यार काळजात घुसली' मधल्या पंडितजींचे, सालग वराळी रागातले हे भजन, खांसाहेब आक्रमक पद्धतीने म्हणतात. भीमपलास-धानीच्या सीमारेषेवर असलेली ही दुसरी रचना, संदीपने तितक्याच आक्रमक पद्धतीने सादर केली.
कधी संपूच नये असे वाटणाऱ्या या मैफिलीची सांगता, गुरुवर्य पंडित जसराज जी यांच्या दोन प्रसिद्ध रचना: 'बाजे रे मुरलीया बाजे' आणि माई सावरे रंग राची' यांनी झाली.
संदीपच्या गायनाबद्दल काय बोलावे? कोणत्याही कलाकाराकडे, किंबहुना त्याच्या कलेच्या सादरीकरणामध्ये तीन गोष्टी आवश्यक आहेत असे जाणकार म्हणतात - आदत, जिगर आणि हिसाब. संदीपच्या गाण्यात या तिन्ही गोष्टी पुरेपूर दिसून येत होत्या. समोर बसलेल्या श्रोतृ वर्गाबद्दल असलेली नम्रता ही पदोपदी जाणवत होती.
विवेक दातार (संवादिनी), रवि गुटाला (तबला) आणि योगेश अयाचित (तालवाद्ये) यांनी संदीपला यथार्थ साथ दिली.
विविध स्वराविष्कारांनी नटलेली मैफिल, आणि विविध रंगानी बनलेले रंगचित्र - यांची अनुभूती एकसारखीच आहे, हेच जणू सिद्ध करणारी ही रंगानुभूती.
धन्यवाद, संदीप.
धन्यवाद, EBMM .
No comments:
Post a Comment