नववधु प्रिया मी बावरते -
मध्यंतरी मी कुठेतरी वाचलं की, तांबेच्या या कवितेला एक गर्भितार्थ आहे. नववधू आणि तिचा पती ही रूपके आहेत, अनुक्रमे जीवात्मा आणि मृत्यू यांची.
हे वाचून मी विचारात पडलो. खरंच तांबेंनी असा विचार केला असेल, की कोणातरी टीकाकाराची मल्लिनाथी आहे? तांबेंच्या कविता आणि त्यांची एकूण कल्पनाशक्ती पाहिली तर, पहिली शक्यताच जास्त वाटते. तसे पण, असे म्हणतात की तांबे एका गंभीर आजारातून बरे झाल्यानंतर त्यांनी मृत्यू विषयी अनेक अर्थगर्भ कविता लिहिल्या होत्या - जसे, जन पळभर म्हणतील हाय हाय.
तर, बघूया आपण, या नव्या दृष्टिकोनातून ही कविता कशी दिसते. हा दृष्टिकोन, ही कल्पना मूळची माझी नसली, तरी कल्पना विस्तार माझाच आहे.
नववधू प्रिया, मी बावरते; लाजते, पुढे सरते, फिरते
जीवात्मा आणि मृत्यू - यांचे मीलन व्हायची वेळ जवळ आलेली आहे. जीवात्म्याला हे कळलेले आहे. (म्हणजे घरघर लागलीय). पण अजूनही त्याची चलबिचल होतेय. पुढे जाऊ, की नको? असे होतेय. मला फारसा चॉईस नाहीये हे माहित आहे. पण तरीही..
कळे मला तू प्राण-सखा जरि,
कळे तूच आधार सुखा जरि
तुजवाचुनि संसार फुका जरि,
मन जवळ यावया गांगरते
जीवात्म्याला हे समजतेय, की मृत्यू हा अटळ आहे. या मायावी जगात मृत्यू हीच एक शाश्वत गोष्ट आहे. या सगळ्या मोहमयी आयुष्याची इतिश्री हे मृत्यूतच आहे. मृत्यू हाच खराखुरा मित्र. सगळ्या दुःखांतून मुक्त करणारा. आणि कधीही दगा न देणारा. (जिंदगी तो बेवफा है.. ). सगळं सगळं खरंय हो. पण तरीही, मृत्यूला जवळ करायला मन धजावत नाही. कारण? पुढच्या ओळीत दिलेले आहे -
मला येथला लागला लळा,
सासरि निघता दाटतो गळा,
बागबगीचा, येथला मळा,
सोडिता कसे मन चरचरते !
हे जग कसेही असले, कितीही मायावी असले तरी, मला इथला लळा लागलाय रे. इतकी वर्षे काढली इथे. मन रमले होते इथे माझे. हे घर, हा बागबगीचा, फार काय, इथली माणसे, त्यांच्याशी जुळलेले मनाचे अनुबंध - हे सगळं इथेच सोडून जायचे - नाही तयारी होत रे मनाची. गळा दाटून येतो.
जीव मनीचा मनी तळमळे
वाटे, बंधन करुनि मोकळे
पळत निघावे तुजजवळ पळे
परि काय करू ? उरि भरभरते
वासांसि जीर्णानि यथा विहाय - जुनी वस्त्रे टाकून आपण नवी वस्त्रे धारण करतो. तसे, आपले जुने, जीर्ण झालेले शरीर त्यागून, जीवात्मा नवे शरीर धारण करतो. साक्षात भगवंतांनीच म्हणून ठेवले आहे हे. या माझ्या जराजीर्ण शरीराचे बंध (एकदाचे) तोडून, मृत्यूच्या अटळ, पण आश्वासक अशा सहवासात निघून यावे, असे आत्म्याला सतत वाटते. पण काय करणार? मोहाचे पाश अजून सुटता सुटत नाहीत.
अता तूच भय-लाज हरी रे !
धीर देउनी ने नवरी रे :
भरोत भरतिल नेत्र जरी रे !
कळ पळभर मात्र ! खरे घर ते !
हे मृत्यो, आता तूच काहीतरी कर. माझ्याच्याने हा उंबरठा, ही जीवन मरणाची सीमारेषा नाही ओलांडवणार. आता तूच मला धीर देऊन, पलीकडे ने. माझे (आणि कदाचित इतरांचेही) नेत्र भरून येतील. पण हे सगळे दुःख, ही चिरविरहाची दाहकता क्षणभराचीच आहे. तुझे घर (म्हणजे मृत्युलोक, स्वर्ग, जे म्हणाल ते) हेच खरे घर. बाकीचे मायावी जग हे नश्वरच आहे.
मृत्यू या कल्पनेला अनेक कवीनी निरनिराळी रूपके दिलेली आहेत. माडगूळकरांनी, जग हे बंदिशाळा असून, मृत्यू म्हणजे त्यातून मिळालेली सुटका असे म्हटले आहे.
कुणा न माहित, सजा किती ते.
सुटकेलाही मन घाबरते - जो आला तो रमला
साहिर लुधियानवी - यांनी तर म्हटले आहे -
वो दुनिया मोरे बाबुलका घर, ये दुनिया ससुराल.
जाके बाबुलसे नजरे मिलाऊ कैसे.
देवाचे जग म्हणजे माझे माहेर. आणि ही नश्वर दुनिया म्हणजे जणू माझे सासर. इतकी पापे केली इथे.. आता माहेरी जाऊन (आकाशातल्या) बापाला काय तोंड दाखवू?
असो. पण आत्मा आणि मृत्यूला वधू-वराचे एवढे समर्पक, एवढे उदात्त रूपक देणारी तांबेंच्या कल्पनेची भरारी थक्क करणारी आहे. त्यांच्या प्रतिभेला प्रणाम.
© नरेंद्र जोशी
No comments:
Post a Comment