Sunday, March 19, 2023

सुरोत्सव

 सुरोत्सव (महेश काळे ) - पँडेमिक नंतर (खरे तर ऑक्टोबर २०१९ नंतर) महेशचा हा बे एरिया मधला पहिलाच कार्यक्रम होता. इथे नोंद करायला हवी, की महेशचा एकेरी उल्लेख हा केवळ आत्मीयतेच्या भावनेतून आलेला आहे. जसा, आमचा गावस्कर, आमची लता तसा आमचा महेश. 

कार्यक्रमाची सुरुवात महेशने झिंजोटी रागाने केली. 'महादेव विश्वम्भर' ही  विलंबित झपतालातली, आणि 'सावरे सलोने से लागे नैन' ही खादीम हुसेन खान 'साजन पिया' यांची तीन तालातली, अशा दोन बंदिशी सादर केल्या. झिंजोटी राग पेश करणे जरा कठीण आहे. त्यामुळे तो फारसा ऐकायला मिळत नाही. महेशने झिंजोटीच्या गाभ्याला अचूक स्पर्श केला, आणि त्याचे सारस्वरूप प्रेक्षकांसमोर ठेवले. 

त्यानंतर आलेली रागमाला. बरेचदा असे होते, की एखाद्या प्रसंगी एखादी विशिष्ट व्यक्ती भेटणे अपेक्षित असते. आणि ती भेटली, की आपला आनंद द्विगुणित होतो. तसेच काहीसे या रागमालेचे झाले. हर हर प्रियादास यांनी रचलेली ही रागमाला अतिशय वैशिष्ट्य पूर्ण आहे. यात अठरा राग गुंफलेले आहेत. प्रत्येक ओळीची सुरुवात ही एका रागाच्या नावाने होते, आणि ती ओळ त्या रागात म्हटलेली आहे. उदाहरणार्थ,

हिंडोल गावत सब, ओडव कल्याण थाट 

भूपाळी सुध सूर रच 

छायानट राग गात 

... 

गम्मत म्हणजे, यात 'भैरवी भक्ती रस' या ओळीवर ही रागमाला संपत नाही. पुढे जौनपुरी आणि मधमात सारंग हे राग येतात. मला वाटतं, ही रागमाला (किंवा ही मैफिल) भैरवीवर संपूच नये, असे या कवीला सूचित करायचे असावे. 

१९९२ च्या 'सवाई गंधर्व' मध्ये गुरुवर्य अभिषेकी बुवांनी ही रागमाला सादर केली होती. तेव्हा ती मी प्रथम ऐकली होती. आज महेशने तितक्याच रंगतीने सादर केली. 

महेशच्या अलीकडच्या मैफिली या परस्पर संवादी (interactive) असतात. ही मैफिल देखील अपवाद नव्हती. महेशने यात प्रेक्षकांना समाविष्ट केले होते. त्याने एक सरगम म्हणून, ती प्रेक्षकांना म्हणायला सांगितली. सा ग म प, ग म प नी, रे सा.. या क्रमाने जाणारी सरगम, ही सालग वराळी कडे जायला लागली, तेव्हा हे काय आहे हे लगेचच ध्यानात आले. महेशने प्रेक्षकांकडून, मोठ्या खुबीने घेई छंद मकरंद हे गीत म्हणून घेतले. 

 मध्यंतरानंतरचा मैफिलीचा मूड थोडा 'लाईट' होता. इथे महेशने 'लागी कलेजवा कटार' ही काहीशा पहाडी अंगाची ठुमरी आधी पेश केली. आणि मग त्याने साधारण पणे त्याच अंगाने येणारी काही हिंदी गीते सादर केली. एसो गये परदेस पिया तुम -> वो जो अधुरी सी बात बाकी है -> तुझसे नाराज नही ऐ जिंदगी -> ओ रंगरेझ ... अशी फिल्मी/गैर फिल्मी गाण्यांची मालिकाच जणू रचली. यातले प्रत्येक गाणे हे जरी स्वतंत्र असले तरी, या ना त्या मार्गाने ते 'लागी कलेजवा कटार' शी जोडलेले आहे. या एक अतिशय अभिनव असा प्रयोग होता. 

निर्गुणी भजन. कुमारजींनी लोकप्रिय केलेला हा गायन प्रकार. कबीराचे 'निर्भय निर्गुण' हे निर्गुणी भजन महेशने कमालीच्या उत्कटतेने सादर केले. 'शून्य शिखर  पर अनहत बाजे जी, राग छत्तीस सुनाऊंगा'... महेश नेमके हेच करत होता. अनाहत नादातून निर्माण होणारे छत्तीस राग मी ऐकवीन (किंवा ऐकवू शकतो) असे जणू महेश नम्रपणे, पण अभिमानाने सांगत होता. 

चारुकेशी राग - रात्रीचे एक गूढ रम्य वातावरण डोळ्यासमोर उभे करतो. चंद्र आणि चांदण्याचे वर्णन असलेले 'हे सुरांनो चंद्र व्हा' हे गीत, अभिषेकी बुवांना  चारुकेशी मध्ये गुंफावेसे वाटले, यात नवल नाही. हा चारुकेशी राग, नीट म्हटला गेला नाही, आणि त्यातला पंचम जर झाकला गेला, तर त्याचा गुणिकंस होतो. महेशने मात्र इथे हे भान निश्चितच ठेवले होते. 

ज्याचा अंतपार वेदोपनिषदांना देखील समजला नाही, अशा निर्गुण निराकार, ईश्वराचा, विटेवर प्रकटलेला अवतार. दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले.. माझे मीपण, माझा अहंकार नष्ट करणारा, ईश्वर निष्ठ भक्तांच्या मांदियाळीत रमणारा तो - बाप रखुमा देवी वर. त्याचे स्मरण केल्याशिवाय आपली मैफिल पूर्ण होणारच नाही. त्या पंढरीच्या कानडा राजाला अशी काही साद घातली, की सर्व प्रेक्षकांच्या अंतस्थ आत्म्याला स्पर्शून गेली. 

मैफिलीची सांगता, भवानी दयानी या पारंपरिक भैरवीने झाली.  

सर्व साथीदारांनी अतिशय समर्पक अशी साथ केली. त्यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे.

महेश आणि त्याच्या साथीदारांचे आभार मानण्याचा औपचारिक पणा मी मुळीच करणार नाही. ह्या हृदयीचे त्या हृदयी मेळविल्यावर, औपचारिकता राहतेच कुठे?

आमच्या मनातली मैफिल संपणार नाही. ती अशीच चालू राहणार. 

- नरेंद्र जोशी  


2 comments:

  1. शब्दांची सुंदर गुंफण करत संपूर्ण मेहफिलच समिर आणलीत.ऐकणारे भाग्यवान.आजकाल पूर्ण काॅन्सर्ट चे रेकाॅर्डींग मिळत नाही न!!

    ReplyDelete