Saturday, July 22, 2023

बडा ख्याल आणि कशेडी घाट

 

भारतीय शास्त्रीय संगीतात बडा ख्याल या गोष्टीला फार महत्व आहे. ख्याल या शब्दाचा अर्थ - विचार. कोणताही राग व्यवस्थित, विस्तृत स्वरूपात मांडायचा असेल, तर त्यामागे एक निश्चित असा विचार असावा लागतो. तो विचार म्हणजेच ख्याल. त्यातील काव्य हे चार सहा ओळींचेच असते. पण तेच काव्य, त्यातील विचार खुलवून मांडलेला असतो. 

मला विचाराल तर, बडा ख्याल आणि घाटरस्ता यांच्यात मला खूप काही साम्य आढळते. मी मूळचा कोकणातला असल्याने, लहानपणापासून, घाट रस्त्यांची बऱ्यापैकी माहिती आणि आवड होती. मुंबई हुन कोकणात जाताना असंख्य घाट लागतात. त्यात, पोलादपूर ते खेडच्या दरम्यान असलेला कशेडी घाट हा सगळ्यात भारी.. खरोखरच एखाद्या बड्या ख्यालासारखा. त्या घाटाचे चढ-उतार आणि ख्याल पेश करणे, यात मला नेहमीच साम्य वाटत आले आहे. कसे ते पाहू. 

बडा ख्याल सुरु होतो तो, त्या त्या रागाची तोंड ओळख करून देणाऱ्या आलापीनंतर. आज कोणता ख्याल म्हटला जाणार आहे, याची उत्सुकता असते. गायकाने बंदिशीचा मुखडा म्हणायला सुरुवात केली, की श्रोते सावरून बसतात. जसे, पोलादपूर सोडले की बारीक सारीक वळणे घेऊन सावकाश गाडी घाटाच्या तोंडाशी येते. गायक जसा एखादी डौलदार आलापी घेऊन सफाईने समेवर येतो, तसेच एक वळण घेऊन गाडी कशेडी घाटात शिरते. विलंबित एक ताल सारखा एखादा पल्लेदार ताल निवडलेला असतो. पहिल्या आवर्तनातील ति - र - कि - ट - धिं  वरून एकूण ख्यालाची लय ठरते. मुखडा आणि अस्थाई एकदा म्हणून, गायक ख्यालाच्या पहिल्या समेवर येतो. माझ्या मते, हा पहिला, आणि सर्वात महत्वाचा टप्पा. गायक आणि तबलजी हे दोघे, कितपत समरस होत आहेत हे यावरून लगेच समजते. हे असे समरसून दाणकन समेवर आले, की रसिकांची पहिली दाद आलीच म्हणून समजा. घाटात देखील, पहिले वळण महत्वाचे. एकूण घाटरस्त्याचा अंदाज घेऊन, चालकाने सफाईने पहिले वळण पार केले, की मग घाटाची खरी मजा सुरु होते. 

मंद्र सप्तकात आलाप विस्तार करून गायक हळूहळू, एक एक वरचा स्वर लावत, रागाचा अवरोह चढू लागतो. इथे खरी गायकाची कसोटी लागते. केदार, हमीर, भैरव, मालकंस अशा रागांतील पुरुषी मर्दानगी, आणि आसावरी, बागेश्री, मुलतानी यासारख्या स्त्री-प्रकृती रागांतील नाजूकपणा हे दोन्ही परस्पर विरोधी भासणारे भाव, गायकाला तितक्याच ताकदीने दाखवणे आवश्यक असते.  

 घाटातील एक एक वळण, एक एक टप्पा पार करत गाडी वर चढू लागते. प्रत्येक वळणाशी निराळे दृश्य. निराळे सौंदर्य. सावकाशपणे, अशी एक एक सौंदर्यस्थळे दाखवत  पुढे नेणारा चालक, आणि सावकाशपणे रागातील सौंदर्यस्थळे उलगडून दाखवणारा गायक - ह्यात फरक सांगता येणार नाही. अर्थात,  हा थोडा धोक्याचा भाग आहे हेही खरेच. रागाचे स्वरूप एस्टॅब्लिश करताना, चुकून जरी वर्ज्य स्वर लागला, तर... घाटात देखील, अशी ' नजर हटी दुर्घटना घटी' झालं, तर मग कपाळमोक्षच. घाटात जसे इतर आगाऊ चालक हे ओव्हर टेक करायला बघतात, तसे इकडे, काही तबलजी आणि क्वचित काही पेटीवाले, हे गायकाला ओव्हर टेक करायला जातात. त्यांना ताब्यात ठेवणे आणि जास्त पुढे जाऊ न देणे हे गायकाचे कसबच म्हणायचे.

 अशा प्रकारे, राग विस्तार करत असताना, क्रमाक्रमाने आरोहस्वर लावत असताना, जेव्हा गायक वरचा सा (षड्ज) लावतो, तो त्या रागाचा हाय पॉईंट असे म्हणायला हरकत नाही. ज्याप्रकारे, घाटातल्या सर्वोच्च पॉईंट वरून घाटाचे संपूर्ण स्वरूप दिसते, तसेच, ख्यालाच्या या टप्प्यावरून रागाचे पूर्ण स्वरूप श्रोत्यांना दिसू लागते (किंबहुना, तशी अपेक्षा असते). वरचा सा लावल्यानंतर गायक अंतऱ्यात शिरतो. अंतरा पूर्ण झाला, की या टप्प्यावर तो तबलजीला, लय वाढवण्याची खूण करतो. जणू काही घाटाची उतरण सुरु होते. कशेडी घाटाची उतरण ज्या ठिकाणी सुरु होते, तिथे रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या भिंतीवर चुन्याचे मोठाले पांढरे पट्टे आखलेले आहेत. वर्षानुवर्षे मी ते पाहत आलो आहे. ते पट्टे दिसले, की उतार सुरु झाला असं समजायचं. उतारावर अर्थातच गाडी वेगाने जाते. त्या वेगात दिसणारे दृश्य (जे घाट माथ्यावरून पाहिले होते तेच) आता निराळ्या रूपात दिसू लागते. तशीच वळणे, पण वेगाने पार होतात. जसे, लय वाढल्यानंतर, गायक जलद आलाप, ताना घेऊन त्याच रागाचे निराळे रुप समोर ठेवतो. आता तबलजी देखील रंगात आलेला असतो. तो देखील, अजूनही विलंबित, पण थोड्या वाढलेल्या लयीमध्ये, आपला हात दाखवून घेतो. एक जबरदस्त तान घेऊन समेवर येत, गायक आपला बडा ख्याल थांबवतो... आणि तो आता कोणता छोटा ख्याल म्हणणार आहे, याची उत्सुकता असलेला तो क्षण येऊन ठेपतो.... 

आणि इकडे कशेडी घाट संपतो. खेड जवळ आले आता. पुढे काय? कोणता घाट?

असो. त्याबद्दल पुन्हा केव्हा तरी.... 

आजवर मी कशेडी घाट अनंत वेळा पार केला आहे. बहुतेकदा रात्री. कारण बहुतेक वेळा आम्ही रातराणीने कोकणात जात असू. (बाकी, रात्री धावणाऱ्या एस टी बसला रातराणी हे नाव देणाऱ्या माणसाच्या रसिकतेची दाद द्यायला हवी). आणि बहुतेक वेळा, रात्रीच्या वेळेस कशेडी घाट पार करताना, माझ्या डोक्यात मालकंस राग घुमत असे. आता, मालकंस हा रात्रीच गायला जाणारा राग आहे हे सामान्य ज्ञान त्यावेळी मला नव्हते. पण, बहुधा तो राग मी रात्रीच ऐकत आलेलो असल्याने असेल कदाचित, पण माझ्या बालबुद्धीने ते एक समीकरण बनवले होते (pre-association). आता, राग आणि त्यांच्या वेळा - यात खरोखरच काही तथ्य आहे, का आपले pre-association ? हा एक वेगळा विषय आहे (म्हणजे, दुपारी मालकंस ऐकला तर तो भयंकर वाटेल... कारण तो आपण नेहमी रात्रीच ऐकत आलो). असो. त्याबद्दल पुन्हा केव्हा तरी. 

तर, बडा ख्याल आणि घाट यांचे असे हे, माझ्या अल्प मतीने घडवून आणलेले अद्वैत रूप.  


- नरेंद्र जोशी 


No comments:

Post a Comment