स्थलांतर
अस्वस्थपणे आपले पंख हलवत, चोचीने नख्यांवर हलकेच टोकत त्याने इकडे तिकडे नजर फिरवली. आजपण फारसं कोणी फिरकणार नाही वाटतं - तो मनाशी म्हणाला.
"आजकाल कोणालाही फारसा रस राहिलेला नाही आपल्या संध्याकाळच्या सभेत. जेमतेम पाच-सात पक्षी आहेत आज इथे". जणू त्याचे विचार ओळखून, बाजूचा पारवा म्हणाला.
"तू तर पक्ष्यांचा राजा, आणि या आपल्या वसाहतीचा मुखिया आहेस ना, गरुडा? तुझा आदेश फारसा कोणी पाळत नाही वाटतं?"
गरुडाला ती कंमेंट फारशी आवडली नव्हती. पण तो गप्प राहिला.
"आजकाल प्रत्येक पक्ष्याला आपापल्या घरट्यातले प्रॉब्लेम फार झाले आहेत. वेळ नसेल मिळत". समजूतदारपणे कावळा बोलला.
"प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतात रे. पण आपण इथे आपले घरट्यातले नाही, तर सामायिक प्रॉब्लेम आणि त्यांचे निराकरण याच्यावर बोलायला जमतो ना? मग?" गरुड बोलला. "सगळ्यांनीच इंटरेस्ट घ्यायला पाहिजे".
इतका वेळ गप्प असलेले गिधाड म्हणाले, "ठीक आहे. आपण आता आजची सभा सुरु करू. आजचा पहिला विषय आहे: भक्ष्य आणि त्याची उपलब्धता. आपण घरटी करून राहतोय त्या भागात आजकाल फारसे भक्ष्य मिळत नाही. ते आणायला जरा लांब उडत जायला लागते. वाटेत येताना दांडगे पक्षी अडवतात. त्यांना आपल्या भक्ष्यातला काही हिस्सा द्यावा लागतो - खंडणी म्हणून".
"आता इथे दोन मुद्दे आहेत, खंडणी आणि लांब जावे लागणे" गरुड म्हणाला, "पहिला मुद्दा - खंडणी. त्याचं काय? का देतो आपण खंडणी?"
"नाही दिली तर ते आपलं भक्ष्य पूर्णच हिरावून घेतील. त्याबद्दल आपल्याला काहीतरी करायला हवं". कावळा म्हणाला.
"गरुडा, तुझी पक्षी सरकारमध्ये ओळख आहे ना? तिकडे तू तक्रार का नाही करत?" पारवा म्हणाला.
"पक्षी सरकारमध्ये तर त्या दांडग्या पक्ष्यांची देखील ओळख आहे. काही उपयोग होणार नाही". गिधाडाने परस्पर उत्तर दिले.
"आणि, लांब का बरं जावं लागतं? या डोंगराच्या पाठीमागेच तर एक कुरण आहे. फार लांब नाही". गरुडाने पुढे विचारले.
"हो, पण ते काही विशिष्ट पाखरांचे राखीव कुरण आहे. तिथे फक्त "त्या" पाखरांनाच जायची मुभा आहे". गिधाड बोलले.
"अरे पण, का?"
"त्यांच्यावर पूर्वी अन्याय झाला होता ना? म्हणून आता... "
"पूर्वी अन्याय झाला होता म्हणून आता आज ते आपल्याला आपल्या भक्ष्यापासून वंचित ठेवत आहेत का? हे कोणते लॉजिक?" गरुड काहीसा वैतागून म्हणाला.
"दादा, त्याबद्दल फारसं काही बोलण्यात अर्थ नाही आता. आहे हे असं आहे" गिधाड थोड्या निराशेने म्हणाले.
यावर गरुड काही बोलणार इतक्यात लांबून एक पक्षी हळूहळू धडपडत उडत आला आणि हुश्य करून फांदीवर बसला.
"काय रे, काय झालं?"
"जरासा पंख दुखावलाय, फार काही नाही" तो म्हणाला.
"कशाने रे?"
"अरे, इकडे सभेला यायला निघालो होतो. तोच समोरून एक धटिंगण पक्षी आला आणि सरळ धडक दिली की रे मला. नशीब फक्त एका पंखावरच निभावलं".
"पण एकाच पातळीवर, समोरासमोर पक्षी आले, तर दोघांनीही आपापल्या उजवीकडे वळायचं असा समस्त पक्षी सृष्टीचा वाहतूक नियम आहे ना?" गरुड जरा रागावून म्हणाला.
"हो". तो दुखावलेला पक्षी म्हणाला, "पण आजकाल वाहतुकीचे नियम पाळतच कोण इथे? मी इमाने इतबारे उजवीकडेच वळलो होतो. पण तो पक्षी तिरका आला तो नेमका माझ्या अंगावर".
"हं.. " गरुडाने हुंकार दिला.
"पुढली समस्या पाण्याची". गिधाड म्हणाले. "जवळचा पाणवठा आता आटत चालला आहे. बरेचदा कोरडा ठाक पडतो. लांबचा पाणवठा आहे, पण तिथेही आजकाल पक्ष्यांची खूप गर्दी होते, आणि ते सगळेजण उगाच दंगा करतात. खरं तर सगळ्यांनी थोडं शिस्तीने वागलं तर सगळ्यांना व्यवस्थित पाणी मिळेल."
"त्यातही राखीव पक्षी आहेतच का?" गरुडाने विचारले.
गिधाडाने फक्त मंद स्मित केले आणि म्हणाले, "पुढली समस्या...".
त्याला मधेच थांबवून गरुड म्हणाला, "आपण फक्त समस्यांचा पाढाच वाचणार आहोत, की त्यावर उपाय पण शोधणार आहोत?"
गिधाड म्हणाले, "उपाय.... उपाय एकतर दिसत नाहीत, आणि असलेच तर आपल्या शक्ती बाहेरचे आहेत".
"आपणच आपल्याला बदलले पाहिजे". एक बदक म्हणाले. "समस्या या आपल्या बाहेरच्या नाहीत, तर त्या आपल्या आतच आहेत".
"उगाच तत्वज्ञान पाजळु नकोस". गिधाड त्रासून म्हणाले. "मला माहित आहे, आपल्यापैकी बरेच जण त्या दोन पायांवर चालू शकणाऱ्या प्राण्यांच्या संपर्कात येत आहेत. आणि कळत नकळत त्यांच्यासारखे वागू लागले आहेत. वाण नाही पण गुण लागला आहे. नुसते तत्वज्ञान पाजळायचे. काम काही नाही करायचे. हे बदक देखील त्यातलेच दिसतेय".
"आणि तू तरी काय उजेड पाडतोयस रे गिधाडा?" बदक म्हणाले.
"समस्या एक तर सोडवा, किंवा ते शक्य नसेल तर ... तर जिथे या समस्या नाहीत अशा ठिकाणी उडून जा". गिधाड म्हणाले.
"हां म्हणजे स्थलांतर करा - असंच ना?" कावळा म्हणाला.
"आणि जाऊन जायचं कुठं ?" पारवा म्हणाला
चर्चेला आता फाटे फुटायला लागले असे दिसल्यावर गरुड जरा आवाज चढवून म्हणाला, "जरा थांबा. आपसात भांडायचे सोडुन जरा विचार करा. इथले जगणे खरोखरच दुरापास्त झाले असेल, आणि दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी जरा बरे जीवनमान असेल, तर तिकडे स्थलांतर करणे हा एक मार्ग आहे."
"पण कुठे?"
"ऎका. त्या पलीकडच्या फांदीवरची कोकिळा काल सांगत होती. सात नद्या आणि सात पर्वत ओलांडले की एक नवा प्रदेश लागतो. त्या कोकिळेची एक चुलत बहीण तिकडे गेलेली आहे. तिकडे अन्न भक्ष्य पाणी वगैरे मुबलक आहे. लोक बऱ्यापैकी शिस्तप्रिय आहेत. वाहतुकीचे नियम बऱ्याच अंशी पाळतात. आणि मुख्य म्हणजे तिकडे सगळ्यांना सगळीकडे मुक्त संचार करता येतो. राखीव कुरणे वगैरे मुळीच नाहीत."
"अच्छा. म्हणजे अगदी स्वर्गलोकच म्हणायचा की". बदक उपरोधाने म्हणाले.
"हां आता तिकडे जायला थोडा त्रास आहेच. तिकडे, बाहेरून येणाऱ्या प्रत्येक पक्ष्याची खूप चौकशी केली जाते म्हणतात. तुम्ही कोण आहात? काय करता? मारामाऱ्या करता का? तुमच्याकडे असे कोणते गुण आहेत, की ज्यांचा आमच्या प्रदेशाला फायदा होणार आहे? असे अनेक प्रश्न विचारले जातात म्हणे. आपण बाहेरचे आहोत हे तिकडल्या पक्ष्यांचा पटकन लक्षात येते. आणि अधून मधून ते चोच मारतात देखील. त्यांच्याकडेही आपापसात भरपूर मारामाऱ्या, वैर वगैरे आहेत." गरुड म्हणाला.
"पण मग, आपण ज्या प्रदेशात पैदा झालो, तो सोडून दुसऱ्या, परक्या प्रदेशात जायचे, म्हणजे आपल्या स्व-प्रदेशाशी प्रतारणा नाही का?" बदकाने पॉईंट उकरून काढला.
"तुम्ही दुसरीकडे राहायला गेलात, तरी आपल्या स्व-प्रदेशाशी, मातृभूमीशी कशी काय प्रतारणा झाली? आपण कोणत्या प्रदेशातले आहोत, ही भावना जपली, आणि त्याचा विसर न पडू दिला की झालं. आणि हेही लक्षात घ्या की, त्या नवीन प्रदेशातले जवळजवळ सगळेच पक्षी बाहेरून तिकडे गेलेले आहेत. सर्वांचीच मातृभूमी 'दुसरी कुठलीतरी' आहे. आपण एकदा का 'तिकडचे' झालो, की मग फारसा त्रास होणार नाही. ".
"तसा त्रास तर आपल्याला इथे पण होतोच की.. तो सुद्धा आपल्याच प्रदेशातल्या पक्षी बांधवांकडून". बदक प्रथमच थोडे सेन्सिबल बोलले.
"exactly". गरुड म्हणाला,"थोडासा त्रास तिथे पण होईल कदाचित. पण रोजचं जिणं थोडेतरी सुखकर होईल".
"पण तो प्रदेश फार लांब आहे ना?"
"आपल्यापैकी ज्यांच्या पंखांत बळ आहे, आणि ज्यांना आपल्या सद्य स्थितीच्या बाहेर पडून काहीतरी करायची इच्छा आहे, त्यांनी जाऊन पाहायला काय हरकत आहे?"
बराच वेळ कोणी काही बोललं नाही.
"ठीक आहे तर मग. स्थलांतर करायची वेळ, आणि संधी आलेली आहे असं ठरवून आपण आजची सभा इथेच समाप्त करू. न जाणो, पुढची सभा कदाचित त्या प्रदेशात होईल?"
सभा बरखास्त झाली. आणि स्थलांतर सुरु झाले.
No comments:
Post a Comment