Wednesday, January 3, 2024

पृथ्वीचे प्रेमगीत

पृथ्वीचे प्रेमगीत - 

कुसुमाग्रज हे एक अलौकिक प्रतिभा लाभलेले कवी होत. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे तर सर्वमान्य वैज्ञानिक सत्य आहे. पण, जे न देखे रवी, सो देखत है कवी - या उक्तीप्रमाणे, इथे कवी कुसुमाग्रज, या वैज्ञानिक सत्याच्या पल्याड जाऊन, त्या पृथ्वीला (आणि आजूबाजूच्या ग्रहताऱ्यांना) देखील काही भावभावना असू शकतील, तिच्या सूर्याभोवती फिरण्यामागे काही भावनिक कारणे देखील असू शकतील, अशी कल्पना मांडतात. कुसुमाग्रजांच्या प्रतिभेची ही अफाट भरारी थक्क करून सोडणारी आहे. 

सूर्याचा धगधगता, पुरुषी अवतार, आणि त्यावर भाळलेल्या पृथ्वीचे कोमल, स्त्री-सुलभ असे भावनिक रूप. ही मुख्य विचारधारा कल्पून, कवीने इथे अनेक खगोल शात्रीय सत्ये काव्यस्वरूपात मांडली आहेत.  

सुमंदारमाला या पल्लेदार वृत्तामध्ये लिहिलेली ही कविता, म्हणजे चेतन गुणोक्ति या अलंकाराचे उत्तम उदाहरण आहे. चेतन गुणोक्ति म्हणजे अचेतनावर चैतन्य स्वरूपाचा आरोप करणे (इथे आरोप हा शब्द निराळ्या अर्थाने वापरलेला आहे). 

यातल्या प्रत्येक कडव्यामध्ये एक एक वैज्ञानिक सत्य, पण अलंकारिक भाषेत व्यक्त केले आहे. काव्यात्मक भावना आधी सांगून, त्यातले वैज्ञानिक सत्य हे कंसात देत आहे. या कवितेचे रसग्रहण करण्याची यापेक्षा निराळी आणि अधिक परिणामकारक पद्धत मला तरी सुचली नाही. 


युगामागुनी चालली रे युगे ही

करावी किती भास्करा वंचना

किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी

कितीदा करु प्रीतीची याचना


हे भास्करा, वर्षांमागून वर्षे, युगे लोटली - मी तुझ्याभोवती भ्रमण करते आहे. का? तर निव्वळ तुझे लक्ष वेधून घेण्याकरिता. एकाच ठराविक परिघामध्ये धावत आहे. पण तुझे तर माझ्याकडे लक्षच नाही. अजूनपर्यंत तरी माझ्या पदरी वंचनाच आली आहे.  

(Big bang पासून ते आजपर्यंत, पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे. सूर्याचे गुरुत्वाकर्षण आणि मध्यमावर्ती बल - या परस्परविरोधी शक्तींमुळे, पृथ्वी सूर्यावर जाऊन कोसळतही नाही, आणि सूर्यापासून फार लांबही जात नाही - एका ठराविक कक्षेत फिरत राहिली आहे). 


नव्हाळीतले ना उमाळे उसासे

न ती आग अंगात आता उरे

विझोनी आता यौवनाच्या मशाली

ऊरी राहीले काजळी कोपरे


मित्रा, मी आता काही नव्हाळीतली नवेली नार राहिलेली नाही. माझं आता वय व्हायला लागलंय. देहावरच्या यौवनाच्या खाणाखुणा केव्हाच मिटल्या आहेत. ती तारुण्यातली ती धग , ती आग केव्हाच विझलीय. काजळी धरलेले काही कोपरे मात्र आत शिल्लक आहेत.  

(पृथ्वी निर्माण झाली त्यावेळी तो एक उष्णतेचा धगधगता, जळता गोळा होता. कालांतराने ही उष्णता कमी कमी होत गेली. आणि आता त्या उष्णतेच्या काही खाणाखुणा - अग्निजन्य खडक आणि प्रस्तराच्या स्वरूपात - शिल्लक आहेत). 


परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे

अविश्रांत राहील अन् जागती

न जाणे न येणे कुठे चालले मी

कळे तू पुढे आणि मी मागुती


परंतु, हे प्रियकरा, माझ्या हृदयातली, तुझ्यावरील प्रेमाची ज्योत मात्र अनंत कालापर्यंत तशीच तेवत राहील. मी अशीच तुझ्याभोवती फिरत राहीन - कुठे जातेय, कुठे येतेय - काही काही ठाऊक नाही मला. तू जिथे नेशील, जशी नेशील तशीच मी येईन. 

(सूर्य देखील एका जागी स्थिर नाही. आकाशगंगेच्या कल्पित मध्यबिंदू भोवती तो भ्रमण करत आहे. त्याच्या गुरुत्वाकर्षणात सापडलेली पृथ्वी (आणि सूर्यमालेतले बाकीचे ग्रह) देखील त्याच्या मागोमाग फिरत आहे). 


दिमाखात तारे नटोनी थटोनी

शिरी टाकिती दिव्य उल्काफुले

परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा

मला वाटते विश्व अंधारले


आजूबाजूच्या अवकाशात अनेक ग्रह तारे मोठ्या दिमाखाने चमकत आहेत. माझे लक्ष वेधून घेण्यासाठी असेल कदाचित, पण माझ्यावर उल्कारूपी फुलांचा वर्षाव करत आहेत. असे जरी असले तरी, तुझ्याशिवाय इतर कोणाचाही विचारही मी करू शकत नाही. तुझ्या तेजोमय अस्तित्वाविना हे विश्वच मुळी अंधःकारमय होऊन जाईल. 


तुवा सांडलेले कुठे अंतराळात

वेचूनिया दिव्य तेजःकण

मला मोहवाया बघे हा सुधांशू

तपाचार स्वीकारुनी दारुण


आता हा चंद्र - त्याला स्वतः चा असा प्रकाश नाही. तुझ्या अमर्याद तेजातून उधार उसनवार करून आणलेले तेज दाखवत तो माझ्याभोवती, एखादी तपश्चर्या केल्यासारखा फिरत असतो. 

(चंद्र हा सूर्याचाच प्रकाश परावर्तित करत असतो). 


निराशेत सन्यस्थ होऊन बैसे

ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव

पिसाटापरी केस पिंजारुनी हा

करी धूमकेतू कधी आर्जव


माझ्याकडून काही प्रतिसाद मिळत नाही म्हणून निराश झालेला धृव तारा, उत्तर दिशेला जाऊन, फुरंगटून बसला आहे - अगदी एका जागी. एखाद्या सन्यस्त योग्यासारखा. त्याउलट हा धूमकेतू - सतत केस पिंजारलेला. अगदी बेभरवशी. मधूनच कधीतरी येतो, आणि आर्जव करतो. 

(धृव तारा हा नेहमी उत्तर दिशेला, सप्तर्षींच्या पलीकडे दिसतो. तो बऱ्यापैकी अढळ असतो. किंबहुना उत्तरेला असलेल्या अढळ ताऱ्याला धृव म्हणतात. आणि धूमकेतूला नेहमी एक शेपटी असते आणि बहुधा ती सूर्याच्या विरुद्ध दिशेला असते. आणि त्याची कक्षा ही ठराविक नसते).  


पिसारा प्रभेचा उभारून दारी

पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ

करी प्रीतीची याचना लाजुनी

लाल होऊनिया लाजरा मंगळ


शुक्र आणि मंगळ हे तसे जवळचे ग्रह. त्यातला शुक्र हा तर भलताच प्रेमळ. पहाटे पहाटे, आपले तेजस्वी रूप दाखवून मला मोहित करायचा प्रयत्न करतो. तर दुसरीकडे हा लाजरा मंगळ. मूळचाच लालबुंद, लाजून अजूनच लालेलाल दिसतो. 

(शुक्र ग्रह हा पृथ्वीवरून दिसणारा सर्वात तेजस्वी ग्रह. बहुधा पहाटेच दिसतो. आणि मंगळ हा त्याच्या लालसर रंगाने पटकन ओळखू येतो). 


परी दिव्य ते तेज पाहून पूजून

घेऊ गळ्याशी कसे काजवे

नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा

तुझी दूरता त्याहुनी साहवे


हे भानो, हे सर्व इतरेजन तुझ्या स्वयंभू तेजापुढे फिकेच आहेत रे. तुझ्यासारखा तेजाचा पुंज डोळ्यासमोर असताना, सामान्य क्षुद्र काजव्यांचा विचारच कसा करू मी? या असल्या दुर्बळ, क्षीण मंडळी बरोबर शृंगार? छे छे - तो विचारही नको. त्यापेक्षा एकवेळ मी तुझा दुरावा सहन करीन. 


तळी जागणारा निखारा उफाळून

येतो कधी आठवाने वर

शहारून येते कधी अंग तूझ्या

स्मृतीने उले अन् सले अंतर


यौवन जरी सरलेले असले, तरी आत खोलवर कुठेतरी, काजळी धरलेल्या अंतरंगात एखादा निखारा धगधगत असतोच. तुझ्या आठवणीने तो निखारा एकदम उफाळून वर येतो. अर्थात, दर वेळी असं होतंच असं नाही. कधी कधी नुसतेच अंग शहारून येते. 

(ज्वालामुखी आणि भूकंप - या दोन नैसर्गिक घटनांचे काव्यमय रूप). 


गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे

मिळोनी गळा घालुनीया गळा

तुझ्या लाल ओठातली आग प्यावी

मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा


हे तेजोनिधी, तुझी ओढ इतकी तीव्र आहे, की कधी कधी वाटतं की - एकदा, फक्त एकदाच तुझ्या रौद्र रूपात मिसळून जावं. स्वतः ला झोकून द्यावं. तुझ्या अग्निमय ओठातली आग, अमृतासमान मानून प्राशन करावी. जळून जावं, भस्मीभूत व्हावं - पण एकदा तरी तुला कडकडून मिठी मारावी. क्षण एक पुरे प्रेमाचा, मग वर्षाव पडो मरणाचा. प्रेमाच्या उत्कटतेची परिसीमा गाठावी. 


अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्

मला ज्ञात मी एक धुलिःकण

अलंकारण्याला परी पाय तूझे

धुळीचेच आहे मला भूषण


पण.. पण.. मित्रा, तू अगाध आहेस. अमर्याद आहेस. तुझी महती फार मोठी. त्यामानाने मी अगदीच एखाद्या यःकश्चित धूलिकणाएवढी आहे रे. आणि तुझ्या पायाची धूळ बनणे मला अधिक भूषणावह वाटेल. 


प्रेमाची इतकी भव्य, आणि तितकीच उदात्त अभिव्यक्ती पाहिली की, कुसुमाग्रजांच्या प्रतिभेला सादर प्रणाम करण्यावाचून गत्यंतरच उरत नाही. 

No comments:

Post a Comment