चौदा जानेवारी. ही तारीख लक्षात रहाते ती दोन कारणांसाठी. एक, मकर संक्रांत, आणि दुसरे, पानिपतची तिसरी लढाई. त्याबद्दल थोडेसे...
पानिपत येथे एकूण तीन लढाया झाल्या पहिली, बाबर आणि इब्राहीम खान लोदी (१५२६). दुसरी, अकबर आणि हेमू (१५५६) आणि तिसरी, १४ जानेवारी १७६१ (पेशवे आणि अब्दाली). इथे लक्षात घ्यायला हवे, की या दिवशी मकर संक्रांत नव्हती. १७६१ साली मकर संक्रांत ही १० जानेवारीला होऊन गेली होती. यामागे एक शास्त्रीय कारण आहे. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी.
आता, पानिपत येथेच लढाया का झाल्या? त्याचे लॉजिक असे. खैबर खिंडीतून उतरून भारतात येणाऱ्या प्रत्येक आक्रमकाचे लक्ष्य एकच असे - दिल्ली. आता, त्याला दिल्लीच्या अलीकडे थोपवण्यासाठी, पानिपत हे सोयीचे ठिकाण होते. कारण, हा सगळा भाग सपाट मैदानी आहे. आमने सामने लढाई करायला सोयीचा. पहिल्या दोन लढाया याच लॉजिक प्रमाणे झाल्या.
तिसऱ्या लढाईच्या वेळी मात्र परिस्थिती निराळी होती. पेशव्यांचा तळ पानिपत नजीक पडला असला, तरी पेशव्यांची फौज अब्दालीचा अफगाणिस्तानचा मार्ग अडवून बसली होती, आणि अब्दालीने बागपत जवळ यमुना नदी पार करून, पेशव्यांचा दख्खनचा मार्ग रोखून धरला होता.
या लढाईची थोडक्यात पार्श्वभूमी अशी - अब्दाली हा अफगाण बादशहा. यापूर्वी देखील तो भारतात येऊन गेलेला होता. यावेळी त्याला नजीबखान रोहिल्याने पाचारण केले होते. जानेवारी १७६० मध्ये, दत्ताजी शिंदे आणि अब्दाली यांच्या फौजांची, बुराडी घाटाजवळ गाठ पडली. यात दत्ताजी शिंदे, 'बचेंगे तो और भी लडेंगे' असे म्हणत, धारातीथी पडला. आता, दत्ताजी शिंदे हा काही सामान्य शिपाई नव्हता. त्याच्या मृत्यूचा बदला घेणे आणि अब्दालीला रोखणे हे क्रमप्राप्त होते. त्याकरता, परतुड इथे पेशव्यांची मोठी फौज गोळा झाली. थोरल्या बाजीरावांचे बंधू चिमाजी अप्पा यांचे चिरंजीव सदाशिव राव (किंवा भाऊसाहेब) पेशवे यांच्याकडे सेनापतीपद सोपवले गेले. त्यांच्या बरोबर विश्वासराव (नानासाहेब पेशव्यांचे चिरंजीव) आणि समशेरबहादूर (थोरल्या बाजीरावांचे आणि मस्तानीचे चिरंजीव) हेही होते. नव्या धर्तीचा, मुख्य तोफखाना इब्राहिमखान गारदी याचा, आणि हुजुरातीचा, पारंपरिक तोफखाना लक्ष्मणराव पानसे यांचा होता.
कोणतीही मोठी फौज युद्धावर जात असेल, तर त्यांच्या सोबतीने यात्रेकरू, प्रवासी आणि इतर बिनलढाऊ लोक जात असत. त्याकाळी तशी पद्धत होती. पेशव्यांच्या मराठी फौजेसोबत देखील हे लटाम्बर होतेच. वाटेत त्यांना शिंदे (जनकोजी, महादजी), मल्हारराव होळकर वगैरे मातब्बर सरदार आपापल्या फौजांसोबत मिळाले.
या भल्या मोठ्या मराठी फौजेने सुरवातीला दिल्ली आणि मग कुंजपुरा या ठिकाणी मोठे विजय मिळवले, आणि अब्दालीला आपल्या तलवारींचे आणि तोफखान्याचे पाणी दाखवले. पुढे जेव्हा मराठी फौज कुरुक्षेत्राजवळ तीर्थ यात्रेच्या निमित्ताने गेली होती, तेव्हा अब्दालीने बागपत जवळ यमुना नदी ओलांडली, आणि त्याने मराठी फौजेचा दख्खन कडून येणारा मार्ग रोखला. दोन्ही फौजा पानिपतजवळ आमने सामने ठाकल्या.
सुरुवातीला काही किरकोळ चकमकी जरूर घडल्या. त्यात एक मोठे मराठी सरदार बळवंतराव मेहेंदळे (अप्पा बळवंत यांचे तीर्थरूप) हे कामी आले. तरीसुद्धा मोठी लढाई अजून झाली नव्हती. दरम्यान, मराठ्यांचे एक कमावीसदार गोविंदपंत बुंदेले यांचा मृत्यू झाला, आणि त्यामुळे मराठ्यांची रसद मोठ्या प्रमाणावर तुटली. उपासमार होऊ लागली. तेव्हा भुकेने मरण्यापेक्षा लढून मरावे असा विचार करून, पेशव्यांनी निकराच्या लढाईची तयारी केली. १४ जानेवारी १७६१ हा तो दिवस. सगळ्या फौजेने एकदम दिल्लीच्या दिशेने कूच केले. वाटेत अर्थातच, अब्दालीची फौज आडवी होतीच.
सकाळी साधारण नऊच्या सुमारास लढाईला तोंड फुटले. प्रत्यक्ष लढाईचे वर्णन असलेली अस्सल कागदपत्रे फार थोडी आहेत. जी काही आहेत त्यावरून असे म्हणता येईल:
- सकाळी, इब्राहिमखान गारदी आपल्या तोफखान्यासह अतुल शौर्य दाखवत होता.
- फौजेची रचना न मोडण्याचा संकेत धुडकावून, काही मराठी फौजा पुढे सरसावल्या, आणि आपल्याच तोफखान्याच्या समोर आल्या. परिणामी, तोफखाना बंद पडला.
- दुपारपर्यंत मराठी फौजेची सरशी होत होती.
- तोफेचा गोळा लागून, विश्वासराव पेशवे मृत्युमुखी पडले. त्यामुळे धीर खचून, मराठी फौजेची पळापळ झाली.
- होळकर यांच्या फौजांनी माघार घेतली. जनकोजी शिंदे धारातीर्थी पडले, आणि महादजी शिंदे हे जखमी झाले.
- अखेर संध्याकाळच्या सुमारास, सदाशिवराव भाऊ हेही धारातीर्थी पडले.
परिणाम? अवघी दख्खन बुडाली. तीन मोत्ये गळाली. सत्तावीस मोहरा हरवल्या. खुर्दयाची गणतीच नाही. एकूण सवा लाख बांगडी फुटली.
महाराष्ट्रात एकही घर असे नव्हते, की ज्यातला पुरुष माणूस पानिपतावर कामी आला नाही. एक पूर्ण पिढी गारद झाली.
असे असले तरी, मराठी फौजेचे शौर्य, धैर्य हे तसूभरही कमी नव्हते. अनेक गोष्टी प्रतिकूल असताना देखील मराठी फौजेने जे शौर्य दाखवले, त्याला तोड नाही. याचा उल्लेख आणि गौरव स्वतः अब्दालीने देखील केला आहे.
यावेळी, दोन व्यक्तींबद्दल विचार मांडणे आवश्यक आहे.
एक, सेनापती सदाशिवराव भाऊ. हे लढवय्ये असले तरी, त्यांना उत्तर भारताची फारशी माहिती नव्हती. त्यांच्यावर अनेक आरोप केले जातात. त्यातला मुख्य म्हणजे, त्यांनी गनिमी काव्याची लढाई न करता, गोलाची लढाई केली, ज्याची मराठी फौजेला सवय नव्हती. परंतु, आपण पानिपतच्या रणभूमीचा विचार केला, तर लक्षात येईल की, हा सपाट मैदानाचा प्रदेश होता, जो गनिमी काव्याच्या लढाईला अगदीच गैरसोयीचा होता. तेव्हा या आरोपात काही दम नाही. सदाशिव रावांनी क्षात्र धर्माची शर्थ केली, आणि शेवटी सूर्यमंडळ भेदून गेले.
दुसरे, मल्हारराव होळकर. यांनी अनेकदा नजीबखानाला जीवदान दिले होते. तो शत्रू आहे हे माहित असून सुद्धा. तसेच, ते पानिपतावरून लढाई सोडून निघून गेले असाही आरोप आहे. आता, नजीबखान हा मराठ्यांचा उत्तर भारतातला एकमेव शत्रू होता. तो जर संपुष्टात आला तर आपले महत्व कमी होईल असे होळकरांना वाटत असे. म्हणून, त्यांनी नजीबाचा काटा पूर्णपणे कधीच काढला नाही. अर्थात, या काट्याचा नायटा होईल असा अंदाज त्यांना आला नसावा. होळकरांची निष्ठा १०० टक्के मराठी सत्तेकडेच होती. त्यात कोणतीही फट नव्हती. आपले अस्तित्व आणि महत्व टिकवून ठेवण्यासाठी केलेले हे एक राजकारण होते. त्यांनी पानिपतावरून पाय काढला, पण त्यालाही काही कारणे होती. एकतर, पेशव्यांचा जनाना (पार्वती बाई आणि इतर स्त्रिया) यांना सुखरूप पणे ग्वाल्हेर कडे नेणे हे एक मोठे काम. दुसरे असे, की होळकर हे गनिमी काव्याने लढणारे. पराभव होत आहे, असे लक्षात आले, तर तात्पुरती माघार घेणे, आणि योग्य वेळ की पुन्हा शत्रूवर हमला करणे हीच त्यांची युद्धनीती होती. सदाशिवरावांना हे फारसे पटले नाही. त्यांनी रणभूमीवरच वीरमरण पत्करले. हा केवळ मतभेदाचा भाग असावा. याच होळकरांनी पुढे माधवराव पेशव्यांना मोठीच मदत केली होती. त्यामुळे त्यांच्यावर आरोप करणे बरोबर नाही.
असो. मराठ्यांचे अपरिमित नुकसान झालेच, पण अब्दालीच्या पदरात देखील फार काही पडले नाही. तो रिकाम्या हाताने परत गेला.
पानिपतच्या या लढाईचे खरे लाभार्थी होते - इंग्रज. तत्पूर्वी १७५७ मध्ये प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी बंगालमध्ये घट्ट पाय रोवले होतेच. आता १७६१ नंतर त्यांना उत्तर भारतात आणि दख्खन मध्ये (माधवराव पेशव्यांचा, सुमारे दहा वर्षांचा कार्यकाळ वगळता) कोणीही मातबर शत्रू उरला नाही. नंतर ५० वर्षांच्या आत इंग्रज भारताचे राज्यकर्ते झाले यात काही नवल नाही.
असो. पानिपतावर शौर्य गाजवणाऱ्या आपल्या मराठी वीरांचे हे एक पुण्यस्मरण.
No comments:
Post a Comment