Sunday, September 29, 2024

सद्य काळात शिवाजी राजांचे महत्व

सद्य काळात शिवाजी राजांचे महत्व (Relevance)


स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे जरी तीनशे वर्षांपूर्वी होऊन गेले असले तरी, त्यांचे कार्य, त्यांचे गुण आणि त्यांचे विचार हे कालातीत आहेत, आणि ते आजच्या काळातही ते कालबाह्य ठरत नाहीत. 


स्वराज्याची संकल्पना: आपली मातृभूमी, आपली माणसे, आपला देश यावर सर्वस्वी आपलीच सत्ता असावी, सार्वभौमत्व असावे, आपल्यावर कोणीही परकीयाने जुलूम करु नये ही महाराजांची स्वराज्याबद्दल असलेली कल्पना होती. त्यावेळी महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशच परकीय सत्तेखाली भरडला जात होता. महाराजांना हे अर्थातच मान्य नव्हते. तसा विचार करणार त्याकाळी अनेक असतीलही. पण स्वराज्याचा असा सर्वंकष  विचार करून तो प्रत्यक्षात आणणारे शिवाजी राजे हे एकमेव होते. त्यांची स्वत्वाची जाणीव एवढी तीव्र होती, की त्यांनी स्वतःची भाषा (राज्यव्यवहार कोष), स्वतः चे चलन (currency) प्रचारात आणले. 


लोक नायकत्व: त्यावेळी महाराष्ट्रातली जनता ही वैचारिक दृष्ट्या विखुरलेली होती. त्यांच्यात कुठेही एकीची भावना नव्हती. महाराजांनी या विखुरलेल्या प्रजेला एकत्र आणले. आपले विचार त्यांना सांगून, पटवून दिले. परकीय सत्ता ही जुलमी आहे, आपल्या हिताची नाही, ती उलथून टाकून स्वराज्याची स्थापना करणे कसे महत्वाचे आणि हिताचे आहे हेही त्यांनी जनतेला समजावले. आपण एकत्र आलो तर स्वराज्य निर्माण करणे शक्य आहे, हा जनतेचा विश्वास त्यांनी मिळवला. नेता हा कसा असावा त्याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिलेला आहे. 


सेना नायकत्व: सेनापती म्हणून महाराज हे अद्वितीय होते. आपले सैन्य लहान आहे, आणि शत्रूच्या मोठमोठ्या फौजांशी आपला सामना होणार आहे हे त्यांना माहित होते. म्हणूनच त्यांनी गनिमी काव्याची युद्ध पद्धती अवलंबिली. सह्याद्री पर्वत पाठीशी उभा होता, त्याचा त्यांनी पुरेपूर वापर केला. सैन्याची रचना, डावपेच, ऐन लढाईच्या वेळची शत्रूच्या बळाचा आणि हालचालींचा अंदाज, त्यानुसार आपल्या सैन्याची व्यूहरचना आणि हालचाल याबाबतीत महाराजांची विचारक्षमता ही केवळ अद्वितीय होती. 

तसेच, त्यांनी आरमाराचे महत्व ओळखले होते. पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्याशी सामना करायचा असेल तर सबळ आरमार असणे आवश्यक आहे हे त्यांनी ताडले होते. आणि त्यामुळेच त्यांनी आरमाराची निर्मिती केली. 

आत्मनिर्भर हा शब्द आज आपण वापरतो. पण शिवाजी राजे हे तीनशे वर्षांपूर्वीच आत्मनिर्भर होते. सैन्याला लागणारी शस्त्रास्त्रे, तोफा आणि दारुगोळा या सर्वांचे कारखाने महाराजांनी उभे केले होते. तसेच, आरमारासाठी लागणारी गलबते, होड्या इत्यादि बांधण्याची सोय केलेली होती. या युद्धसाहित्यासाठी त्यांना कधीही इतर कोणावरही अवलंबून राहावे लागले नाही. 


मुत्सद्देगिरी: महाराजांना एकाच वेळी अनेक शत्रूंचा सामना करावा लागला होता. आदिलशाही, निजामशाही, मोगल, इंग्रज, पोर्तुगीज या सर्व शत्रूंशी केवळ लढाईच्या मार्गाने सामना करणे हे अशक्य होते. त्यामुळेच त्यांनी मुत्सद्देगिरीने अनेकदा शत्रूला झुलवत ठेवले तर कधी झुकांडी दिली. वेळप्रसंगी माघार घेतली पण संधी येताच परत हल्ला करून शत्रूला नेस्तनाबूत केले. 


प्रजाहित: रयतेच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये याची काळजी घेणारा हा खऱ्या अर्थाने रयतेचा राजा होता. राजा हा राज्याचा उपभोगशून्य स्वामी असतो या तत्वाचे, शिवाजी महाराज हे उत्तम उदाहरण आहे. रयतेला बाह्य (आणि अंतर्गत देखील) शत्रूंपासून उपद्रव होऊ नये यासाठी महाराज सतत झटत राहिले. त्यांचे राज्य हे न्यायाचे राज्य होते. न्यायनिवाडा करताना महाराजांनी कधीही नाते संबंध किंवा मैत्री यांचा विचार केला नाही. 

एक राजा, सेनापती, मुत्सद्दी  कसा असावा याचा वस्तुपाठच शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आहे. त्यामुळेच, आजच्या काळाच्या संदर्भात आजच्या राज्यकर्त्यांना देखील त्यांचे हे गुण अनुकरणीय आहेत. 

त्याचबरोबर त्यांचे वैयक्तिक गुण - त्यांची मातृपितृ भक्ती, परस्त्री विषयी आदराची भावना, धाडस, शौर्य, दूरदृष्टी, राष्ट्रनिष्ठा - राज्यकर्त्यांबरोबरच सर्वसामान्य जनतेने देखील ध्यानात घेणे आवश्यक आहे. 

आणि म्हणून, शिवाजी महाराज हे आजच्या काळात देखील संबद्ध आणि समर्पक ठरतात. 

© नरेंद्र जोशी 

No comments:

Post a Comment