शिवराज्याभिषेक
पूर्वपीठिका: शिवाजी राजे हे रयतेचे राजे असले तरी, त्यांनी स्वतः ला राज्याभिषेक करून घेतलेला नव्हता. मुळातच त्यांना राजा म्हणून मिरवणे, ऐषोआराम, डामडौल वगैरे मध्ये फारसा रस नव्हता. म्हणूनच ते या बाबतीत काहीसे उदासीन होते. पुढे १६६३ मध्ये वेदशास्त्रसंपन्न गागाभट्ट जेव्हा महाराष्ट्रात आले, आणि महाराजांना भेटले, तेव्हा त्यांनी हा विचार मांडला की, राजियांनी चार चार पातशाया पालथ्या घातल्या असल्या, तरी जोवर राजे सिंहासनी बसत नाहीत आणि शिरावर छत्र चामर नाही, तोवर त्यांना जनमान्यता नाही. मराठीयांचा राजा सिंहासनावर बसलाच पाहिजे.
यामागे असाही एक विचार होता की, त्यावेळी, मराठ्यांची प्रतिमा ही एक लुटारू जमात अशीच होती (किंवा केली गेली होती, विशेषतः सुरतेच्या दुसऱ्या लुटीनंतर १६७०). त्या प्रतिमेला छेद देणे आवश्यक होते. मराठ्यांचा सार्वभौम राजा सिंहासनावर बसवून, आम्ही चोर दरोडेखोर नाही, स्वतंत्र राज्याचे पाईक आहोत - असा संदेश जाणार होता.
म्हणून, गागाभट्टांनी राजियांना सांगितले: राजे, आपण क्षत्रिय आहात. आणि क्षत्रियांनी राज्य करावे, अशी धर्माज्ञा आहे. तस्मात, तख्ती बसावे. आपले कार्य जेवढे बहुमोल आहे, तेवढाच, राज्याभिषेक हा संस्कार देखील महत्वाचा आहे.
... आणि राजीयांनी ते मानिले. राज्याभिषेकाची तयारी सुरु झाली. दीड गाव उंच आणि बहुत चखोट असलेला रायगड. हाच 'तख्तासी जागा करावा' असे ठरले. 'सेवेसी तत्पर' हिरोजी इंदुलकरांनी, अठरा कारखाने, बारा महाल, राजसभा, जगदीश्वर मंदिर, बाजारपेठ यांसह गड सजवला. बत्तीस मण वजनाचे सोन्याचे सिंहासन घडवले. गागा भट्टानी, राज्याभिषेक विधी साठी म्हणून, संशोधन करून, राज्याभिषेक प्रयोग या नावाचा एक ग्रंथ लिहिला. राज्याभिषेकासाठी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हा सुदिन मुक्रर करण्यात आला.
रायगडावर राज्याभिषेकासाठी सुमारे वीस हजार पाहुणे आले होते. यात हेन्री ऑक्सिन्डेन हा इंग्रज अधिकारी देखील होता.
आनंदनाम संवत्सरी, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी (६ जून १६७४) या शुभ दिनी, सूर्योदयाला तीन घटका अवधी असताना, म्हणजे पहाटे पाच वाजता, रायगडावर शिवाजी राजांचा राज्याभिषेक संपन्न झाला. राजे सिंहासनाधीश्वर झाले. राजा मराठ्यांचा झाला. राजा महाराष्ट्राचा झाला.
महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ एक संस्कार किंवा विधी नव्हता. मराठ्यांचा स्वाभिमान व्यक्त करण्याचा तो एक मार्ग होता. यानिमित्ताने महाराजांनी अनेक गोष्टी अमलात आणल्या. राज्याभिषेक शक असा एक नवीन शक (जसे शालिवाहन शक, विक्रम संवत) सुरु केला. तत्कालीन मराठी भाषेत अनेक फारसी शब्द प्रचलित झाले होते. ते काढून टाकून, त्यांना संस्कृत प्रतिशब्द देण्याचे निश्चित केले. त्याकरता, राज्यव्यवहार कोष सिद्ध करण्याची आज्ञा दिली. अष्टप्रधानांची फारसी नावे बदलून, संस्कृत प्रचूर नावे दिली. तसेच त्यांनी स्वतः च्या नावाने नाणी (करन्सी) काढायला सुरुवात केली. या गोष्टी लहान वाटत असल्या तरी, आपले स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व जगाला दाखवून देण्यासाठी या आवश्यक होत्या.
No comments:
Post a Comment