Monday, October 21, 2024

मन रे इंद्रधनु

 रंग म्हणजे काय? रंग म्हणजे प्रकाशाचे पृथ:करण झाल्यावर दिसणारे विविध तरंग लांबीचे प्रकाश किरण. सात मुख्य रंग आणि अनेक रंगछटा. या सात रंगी रंगपटलाच्या दोन टोकांना असतात ते अनुक्रमे काळा आणि पांढरा रंग. सर्व रंगांचा समुच्चय म्हणजे पांढरा, आणि कोणत्याही रंगाचा अभाव म्हणजे काळा.

ही शास्त्रीय बाजू जरा बाजूला ठेऊन आपण जरा वेगळ्या दृष्टिकोनातून बघू.
मानवी मन - त्याच्यावर रंगांचा काय परिणाम होतो? अहो, ही तर एक सापेक्ष बाब आहे. एकच रंग - पण तो निरनिराळ्या माणसांच्या मनावर निरनिराळा परिणाम करून जातो. पिवळा रंग काही जणांना निराशाग्रस्त वाटतो, तर काहींना पिवळी हळद, तीसुद्धा लग्नात लावली जाणारी, आठवते. तर सगनभाऊंसारखा शाहीर त्यावर शृंगारिक 'पिवळ्या रंगाची लावणी' लिहून जातो. लाल रंग कोणाला क्रोधाचे प्रतीक वाटतो, तर कोणाला प्रेमाचे. तर, रंगांची दुनिया ही बरीचशी व्यक्तिसापेक्ष आहे. प्रत्येक रंगाची, प्रत्येक मनाला येणारी अनुभूती निराळी.
या रंगांच्या दुनियेतून जर हे रंगच नाहीसे झाले तर? तर.. माणसाच्या आयुष्यातलेच रंग पुसले जातील. आयुष्य निरर्थक होईल. नाही का?
T & D Dance( T & D dance )यांनी सादर केलेल्या, मन रे इंद्रधनु या कार्यक्रमात नेमका हाच विषय मांडला आहे. रंगनगरीच्या राज्यातले रंग एक एक करून राज्य सोडून जात आहेत. आणि त्यामुळे चित्रकाराला चित्र काढण्यासाठी रंगच मिळत नाहीत. इथून कथानक सुरु होते. एकेका रंगाची एकेक कथा आणि व्यथा. मग? पुढे काय होते? ते प्रत्यक्ष पाहिलेले बरे.
सर्व समावेशकता हा या कथानकाचा गाभा (किंवा पाया) आहे असं वाटतं. या कथानकात सिनिअर सिटिझन्स देखील येतात आणि लहान मुले देखील. सर्वाना यात सामावून घेतले आहे.
LGBTQ हा विषय आता तसा नवीन नसला तरीही, समाजात त्याला अजून पूर्णपणे मान्यता मिळालेली नाही. समलिंगी किंवा लिंगभेदाच्या सीमारेषेवर असलेल्या लोकांकडे अजूनही 'तसला' किंवा 'तसली' अशा नजरेनेच पाहिले जाते. त्यामुळे या मंडळींची जी अवस्था होते, तिला 'कुचंबणा' हा एकच योग्य शब्द आहे. इंद्रधनूमध्ये या विषयावर एक समर्पक स्किट सादर केलेले आहे.
अशी अनेक स्किट्स एकापुढे एक येत जातात, आणि त्या अनुषंगाने नृत्ये देखील. रंगनागरीचे कथानक आणि ही स्किट्स यांची मोठ्या कौशल्याने सांगड घातलेली आहे. सध्याच्या 'ज्वलंत' विषयावर देखील, कमळाबाई आणि दगडू शेठ यांचे एक स्किट धमाल करून जाते.
गाण्यांची निवड अतिशय चोखंदळपणे केलेली होती. आणि त्यावरील नृत्ये देखील सुरेख बसवली होती. सर्व नृत्यप्रकार यात आले - कथक, लावणी, भरतनाट्यम देखील.
लेखक म्हणून तेजस कानेटकर Tejas Kanetkar आणि दिग्दर्शक हेमाली गोंधळेकर Hemalika Gondhalekar यांचे मन:पूर्वक अभिनंदन. त्याचबरोबर इतर सर्व नृत्य दिग्दर्शिकांचे देखील अभिनंदन.
सोनार कितीही कसबी असला तरी, सोन्याचा असा स्वत:चा गुण असतोच की. यातले सर्व कलाकार, नर्तकी आणि नर्तक हे शंभर नंबरी आहेत. सर्वांचे कौतुक करावे तितके थोडे.
तांत्रिक बाजू - ध्वनी संयोजन, नेपथ्य आणि प्रकाशयोजना - निर्दोष आणि सफाईदार झाल्या आहेत.
एक उत्तम प्रयोग सादर केल्याबद्दल T & D चे अभिनंदन. त्यांच्याकडून अशाच दर्जेदार प्रयोगांची अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment