Monday, October 28, 2024

रयतेचा राजा

रयतेचा राजा -

छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. प्रजेच्या हितासाठी ते सदैव जागरूक असत. 

रयतेला राजाकडून काय अपेक्षा असते? काय हवे असते रयतेला? मूलभूत गरजा, संरक्षण, न्याय. महाराज हे पुरेपूर जाणून होते. आपण राजे आहोत आणि प्रजेचे हित जपणे हे आपले परम कर्तव्य आहे याची त्यांना पूर्ण जाणीव होती. आणि त्याकरता ते कटिबद्ध होते. 

महाराजांनी जमिनीची प्रतवारी करून, त्याप्रमाणे शेतसारा ठरवायची, दादोजी कोंडदेवांनी घालून दिलेली पद्धत कायम केली. याबाबतीत कोणावरही जुलूम होऊ नये याकडेच त्यांचा कटाक्ष होता. स्वराज्यामध्ये गोहत्या बंद केली गेली होती. त्यामुळे गाई वासरे निर्धास्तपणे नांदत होती. 

महाराष्ट्रात वर्षानुवर्षे वतनदारी पद्धत चालत होती. वतनदार हे स्वत:ला राजा समजून, रयतेला वेठीस धरत होते. महाराजांनी ही वतनदारी सरसकट बंद केली आणि रयतेला एका मोठ्या जोखडापासून मुक्त केले. 

स्वराज्यामध्ये न्यायदान हे काटेकोरपणे आणि समतोलपणे होऊ लागले. चोऱ्या, दरोडे, गुंडगिरीला आळा बसला. स्त्रियांवरील अत्याचार देखील आटोक्यात आले. अशा गुन्ह्यांना शिक्षा ही जबरदस्त होत असे. उदाहरणादाखल, रांझ्याच्या पाटलाने बद अमल केला होता. परस्त्रीला मातेसमान मानणाऱ्या महाराजांना हे सहन होणे शक्यच नव्हते. त्यांनी या रांझ्याच्या पाटलाला गिरफ्तार करून, त्याचे हातपाय तोडण्याचा हुकूम दिला होता. न्याय देताना त्यांनी नातीगोती देखील पाहिली नाहीत. त्यांचे एक मामा, संभाजीमामा मोहिते हे लाचखोरी करत असत असे कळले, तेव्हा त्यांनी मामांची देखील गय केली नाही. 

तसेच, कारभारामध्ये आणि न्यायदानात कोणीही ढवळाढवळ केलेली, महाराजांनी कधीही खपवून घेतली नाही. चिंचवडकर देव हे महाराजांचे अध्यात्मिक गुरु. या गुरु महाराजांनी परस्पर काही निवाडे करण्याचा उपद्व्याप केला होता. हे समजताच, महाराजांनी खुद्द आपल्या गुरूंना सुनावले: तुमची बिरुदे आम्हास द्या आणि आमची बिरुदे तुम्ही घ्या (म्हणजे, तुम्ही राज्य करा, आणि आम्ही पूजा अर्चा करत बसतो. 

या आणि अशा उदाहरणांमुळेच, हे राज्य न्यायाचे आहे, याबद्दल रयतेला एक विश्वास निर्माण झाला. 

तीच गोष्ट रयतेच्या रक्षणाची. बाह्य शत्रूंपासून होणारा त्रास तर कमी झालाच, पण अन्य कारणांमुळेही रयतेला त्रास होऊ नये याकरता महाराज सतत जागरूक असत. आपले लष्कर हे रयतेच्या रक्षणासाठी आहे हे खरेच.  पण, 'लष्करी चाकरी नफरी' हेही ते जाणून होते. लष्करी छावणी जिथे असेल तिथल्या आजूबाजूच्या रयतेला लष्कारापासून उपद्रव होण्याची शक्यता असे. त्याकरता महाराजांचे हे आज्ञापत्र पुरेसे बोलके आहे. 

रयतेस काडीचा आजार द्यावया गरज नाही. बहुत यादी धरून वर्तणूक करणे. अन्यथा.. मराठीयांची तो इज्जत वाचणार नाही, मग रोजगार कैसा. 

हे पत्र राज्याभिषेकापूर्वी काही दिवस लिहिलेले आहे. 

रयतेचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये याबाबतीत ते अतिशय आग्रही होते. आरमारासाठी लागणाऱ्या होड्या, गलबते बांधण्यासाठी लागणारी लाकडे - तीदेखील 'परमुलुखातून खरेदी करून आणावीत' अशी त्यांची आज्ञा होती. स्वराज्यातील प्रजेची झाडे तोडली जाऊ नयेत हाच त्यांचा इरादा होता. 


यामुळेच, रयतेला या आपल्या राजाबद्दल विश्वास होता. खऱ्या अर्थाने तो रयतेचा राजा होता. 

No comments:

Post a Comment